‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेमध्ये करिअर समुपदेशक आणि विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञांशी विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनसोबत प्रश्नोत्तरांची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.

– संकलन-

पूर्वा साडविलकर, मानसी जोशी

छायाचित्र- दीपक जोशी

करिअरची निवड हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तो निर्णय भावनेच्या बळावर  नव्हे तर सर्वागिण विचार करून घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घ्यावीच आणि क्षमताही तपासून पाहावी. उत्तम करिअर घडण्यासाठी आधी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक असते, असा सल्ला, करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी आणि बारावीच्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांना कोणती शाखा निवडावी याबाबत संभ्रम असतो. नातेवाईक आणि पालकांच्या सांगण्यानुसार मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याप्रसंगी विद्यार्थानी गोंधळून न जाता पालकांशी स्पष्टपणे बोलावे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे, दहावीला आणि बारावीला अभ्यासक्रमातील विषयांचे क ठीण, मध्यम आणि सोपे असे वर्गीकरण करून शाखेची निवड करावी. महाविद्यालयाची निवड करताना तेथील वातावरण बघणे गरजेचे आहे. योग्य विषयांची अचूक निवड भविष्याला योग्य दिशा देण्याचे काम करते.

कला शाखेमध्ये पदवी शिक्षण घेताना परदेशी भाषांची आवड असल्यास त्या भाषेचे प्रशिक्षण घेता येते. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज आणि जपानी या परदेशी भाषेच्या अनुवादकांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात शिकवताही येते. सध्या स्पर्धा परीक्षेचे महत्त्व मुलांमध्ये वाढलेले आहे. या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत काम करता येते. या परीक्षेची तयारी अकरावीपासून करणे गरजेचे आहे. कला शाखेचे विषय स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा द्यायची असल्यास कला शाखेची निवड करावी. सोबतच पत्रकारिता आणि माध्यमांतील करिअर करण्यासही कला शाखा उपयोगी पडते.

वाणिज्य शाखेची पदवी घेताना विद्यार्थी सीए, सीएस करू शकतात. अ‍ॅक्चुरीसारखा कठीण मार्गही आहे. सोबतच सध्या वाणिज्य शाखेतून करण्यासारखे टॅक्सेशन, लॉ या विषयांवरील अनेक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

विज्ञान शाखेचा विचार करताना भौतिकशास्त्र आणि गणिताची आवड आहे का याची खात्री करूनच या शाखेची निवड विद्यार्थ्यांनी करावी. यातून पुढे अभियांत्रिकी, शेती, वैद्यकशास्त्र, स्थापत्यशास्त्र आणि लष्करातील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. वेगवेगळ्या क्षेत्रांच्या नाटा, सीईटी आणि जेईई यासारख्या पात्रता परीक्षा आहेत.

विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, डॉक्टर या पारंपरिक  क्षेत्रांव्यतिरिक्त शेती, पत्रकारिता, जाहिरात आणि कायदे या क्षेत्रांचाही विचार करावा.

एखादे विशेष अभ्यासक्रम निवडताना मात्र त्यात पुढे नोकरीच्या कशा आणि कोणत्या संधी आहेत, याची खात्री जरूर करून घ्यावी. उदा. पर्यावरणसंबंधातील एखाद्या विशेष अभ्यासक्रमानंतर नोकरीच्या संधी केवळ परदेशात उपलब्ध असतील तर भारतात राहण्याचे ध्येय ठरवलेल्या विद्यार्थ्यांला ते कठीण जाईल. किंवा परदेशात जाण्यास उत्सुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांने तिथे उपयोगी पडतील, असेच अभ्यासक्रम निवडावेत. अभ्यासक्रमाचे शुल्कसुद्धा विचारात घ्यावे, कारण ते भरण्याची आपल्या पालकांची आर्थिक स्थिती आहे की नाही, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावे. एकूणच वेगळे अभ्यासक्रम जरूर करावेत परंतु तो अभ्यासक्रम किती वर्षांनी तुम्हाला अर्थक्षम बनवणार आहे, याचाही जरूर विचार करावा. म्हणजे नंतर होणारा अपेक्षाभंग टाळता येईल.

शेवटी अतिशय  महत्त्वाचे, अभ्यास करताना मोबाइल लांबच ठेवा. तो जितका लांब ठेवाल, यश तितकेच जवळ येईल.

टीव्ही पत्रकारिता – ग्लॅमरमागची मेहनत

टेलिव्हिजनवरील पत्रकारितेचे सर्वानाच आकर्षण वाटते. वृत्तवाहिनीवर बोलणारा अँकर तर बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो. अनेकांना त्यांच्यासारखे प्रसिद्ध व्हायचे असते. एबीपी माझाच्या पत्रकार ज्ञानदा कदम यांनी याच ग्लॅमरमागची मेहनत, वृत्तवाहिनीतील करिअरच्या संधी उलगडून दाखवल्या.

टीव्हीवर बोलणारा अँकर पाहून अनेकांना वाटते की, आपणही यांच्यासारखेच बोलावे. आपल्यालाही हे सहज जमू शकते. पण हे तितकेसे सोपे नाही. इथे प्रसिद्ध व्हायचे, तर मेहनत हवीच. पत्रकारितेत यायचे तर मुळात वाचन दांडगे हवे. एकाच क्षेत्रातील नव्हे तर सर्वच क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींची माहिती हवी. अभ्यास करून मगच एखाद्या गोष्टीत मत मांडावे. उगाच वायफळ बोलण्याला अर्थ नाही. चुकीची माहिती कधीच सांगू नये. त्याऐवजी गप्प बसावे.

विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आज उपलब्ध आहेत. गरवारे इन्स्टिटय़ूट, झेविअर्स कॉलेज, रानडे इन्स्टिटय़ूट, केसी कॉलेज, मुंबई विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी पत्रकारितेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते अभ्यासक्रम करून या क्षेत्रात आल्यास नक्कीच फायदा होतो. कारण येथे पत्रकारितेच्या सर्व माध्यमांचे तंत्र समजावून सांगितले जाते. शिकता शिकताच विद्यार्थ्यांनी कामाला सुरुवात करायला हवी. अनेक वृत्तपत्रांमध्ये कॉलेजच्या, तिथल्या उपक्रमांच्या, स्नेहसंमेलनांच्या बातम्या विद्यार्थीच करत असतात. त्या वृत्तपत्रांत जाऊन संबंधित वरिष्ठांना भेटावे. आपला बायोडेटा देऊन आपल्या लिखाणाची एखादी प्रत देऊन किंवा मेल करून ठेवावी. म्हणजे आपले लिखाण कसे आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीचे लिखाण जमते, याची महिती संपादकीय विभागातील वरिष्ठांना मिळू शकेल. अगदी टीव्ही पत्रकारिता करायची तरीही चांगले लिहिता येणे आवश्यक आहेच. कारण लिहिण्याने आपले विचार पक्के होतात. ते मुद्देसूद मांडण्याची सवय होऊ लागते. लिखाणानंतर पुढची पायरी बोलणे आहे. टीव्ही पत्रकारिताच करायची तर आपणच आपले लहान लहान व्हिडीओ तयार करा. त्यात आपल्या आजूबाजूच्या लहानसहान घटनांची बातमी बनवा. तो तुमच्या कॉलेजचा कार्यक्रम असेल नाहीतर लग्न. पण यामधून आपल्याला बोलण्याची सवय होते. सभाधीटपणा येतो. लोकांसमोर बोलण्याचे धाडस येते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर किंवा होत असताना एखाद्या वृत्तवाहिनीमध्ये उमेदवारीही करू शकता. ती उमेदवारी करत असताना केवळ दिलेले काम करून मग घरी जाऊ नका. वृत्तवाहिनीचे काम समजून घ्या. वेगवेगळ्या विभागांचे काम कशा प्रकारे चालते ते पाहा. आपल्या काही नवीन कल्पना असतील तर त्या वरिष्ठांकडे मांडा. त्यासाठी घाबरू नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संयम राखा. आपल्यातली प्रतिभा जिवंत ठेवा.

पत्रकारितेचे क्षेत्र छान आहे, कारण इथे आपल्या आवडीची गोष्ट आपल्या कामाचा भाग असते. मॅच बघणे, सिनेमा बघणे या गोष्टी कामाचा भाग असतात. त्यामुळे पत्रकारितेचे काम कधीच कंटाळवाणे होत नाही.

हे क्षेत्र मुलींसाठीही सुरक्षित आहे. उशिरा बसून काम करावे लागते, थांबावे लागते परंतु तुमची संस्था चांगली असेल तर त्यांच्याकडून मुलींसाठी त्यांना सुखरूप घरापर्यंत पोहोचवण्याची सोयही केली जाते.

पण काम करण्याची तयारी आणि जिद्द हवी. कारण इथे ऑफिसमध्ये जाण्याची वेळ ठरलेली असते, मात्र परत येण्याची नाही.