‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेबविश्व आणि लेखनातील करिअरविषयी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मोलाचा  सल्ला दिला.

– संकलन-

पूर्वा साडविलकर, मानसी जोशी

नावीन्यातही सातत्य हवे!

भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपा या लोकप्रिय वेब चॅनल आणि डिजिटल कंटेट क्रिएशन करणाऱ्या कंपनीचे सारंग साठय़े यांनी वेबविश्वातील करिअरविषयक विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या.

सारंग साठय़े

इंटरनेट, समाजमाध्यमे या गोष्टी आता आपल्या रोजच्या आयुष्यातील झाल्या आहेत. त्यांना आपण आपल्या आयुष्यापासून वेगळे काढू शकत नाही. या समाजमाध्यमांवर पडीक तर सगळेच असतात; पण तिथल्या करिअरच्या व्यासपीठाचा सुयोग्य वापर करून घेणारे थोडेच. कारण हे करिअर सोपे नाही.

भाडिपाच्या यशाबद्दल बोलताना सारंग म्हणाले, आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा एकही दुसरे मराठी चॅनल नव्हते किंवा मराठी कंपनी कार्यरत नव्हती. जे कोणी असतील त्यांच्याकडे सातत्य नव्हते जे आमच्याकडे होते. कारण वेबविश्वात करिअर करायचे तर सातत्य हवेच. इथे सातत्याने काम करत राहिलात तर आणि तरच तुम्ही टिकण्याची शक्यता असते. कारण या क्षेत्रात जशी प्रसिद्धी झपाटय़ाने मिळते तशीच ती जाऊही शकते. कारण दररोज नवीन माध्यमं, त्यावरील नव्या गोष्टी, नवे लोक येत असतात. इंटरनेटचा हा पसारा भलामोठा आहे. त्यामुळे इथे टिकायचे तर सातत्य आणि नावीन्य हवेच.

आपला प्रेक्षक कोण आहे, हे आधी ओळखायला हवे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त नवीन कंटेंट कसा तयार करता येईल, त्यात वेगळेपणा कसा आणता येईल, शिवाय तो रोजच्या घटनांसोबत, बातम्यांसोबत कसा जोडला जाईल, याचा अभ्यास हवा. आपण हाताळत असलेला विषय आपल्या प्रेक्षकाला त्याच्या जीवनाशी, दैनंदिन घडामोडींशी जोडलेला आणि आकर्षक वाटायला हवा. आम्ही भाडिपा सुरू केले तेव्हा लक्षात आले की, मराठी तरुणांसाठी काही खास स्पेस नाही. त्यांच्या जगातील माणसे, वस्तू, परिस्थिती यांच्यासंदर्भात अनेक गमतीजमती आहेत, गोष्टी आहेत, घटना आहेत; पण इंटरनेटवर त्यातल्या कशाचेच तितकेसे प्रतिबिंब पडलेले नाही. मग मराठी तरुणाला त्याच्या निरनिराळ्या पॅशन्सना स्पेस देण्यासाठी भाडिपातर्फे आम्ही कार्यक्रम आणले ज्यांचे जोरदार स्वागत झाले.

आजच्या तरुणांसाठी वेबविश्वातल्या करिअरचा पर्याय उत्तम आहे. कारण हे तंत्रज्ञान वापरूनच ते मोठे झाले आहेत. त्यांच्या वयासोबतच हे इंटरनेटचे विश्व बहरले आहे, बहरत आहे; पण इथे यायचे तर इथले तंत्र शिकायला हवे. त्यासाठी यू टय़ूबवर, गूगलवर अनेक उत्तम मोफत टय़ुटोरिअल्स उपलब्ध आहेत. एडिटिंगसारख्या क्षेत्रातले काही मूलभूत अभ्यासक्रम आहेत. माहिती भरपूर उपलब्ध आहे. तिचा योग्य वापर करून घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे सतत जगात नवीन काय सुरू आहे, याची आपल्याला जाणीव हवी. त्याची माहिती करून घेण्याची असोशी हवी. कधी तरी लिहिले म्हणजे तुमचा ब्लॉग यशस्वी होत नाही किंवा सलग ४-५ व्हिडीओ टाकले नि मग बरेच महिने काहीच दिले नाही की त्या चॅनलचे फॉलोअर्स निघून जातात. हीच गोष्ट इन्स्टाग्रॅमचीही. या सगळ्या समाजमाध्यमांनी त्यांच्याकडे करिअर करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईला भरपूर स्पेस दिली आहे. ते भरपूर मदतही करतात. त्या सगळ्याचा वापर करून घ्यायला हवा.

महत्त्वाचे म्हणजे सुरुवात कशी करावी किंवा एखाद्या कंपनीकडे काम करायचे तर कसे सांगावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी फेसबुक, ट्विटरवर वगैरे मेसेज टाकू नका, तर रीतसर मेल लिहा. त्यासंबंधित व्यक्तीचा किंवा कंपनीचा अधिकृत मेल आयडी दिलेला असतो. त्यावर नीट मेल लिहा. आपली माहिती, आपल्याला काम कोणते आणि का करायचे आहे, त्याची माहिती लिहा. सतत मेल पाठवण्यापेक्षा काही दिवस जाऊन त्याचे रिमाइंडर्स देत राहा.

सातत्य, नावीन्य आणि कष्टाची तयारी असेल तर वेबविश्व तुमचेच आहे!

लेखकाची जबाबदारी मोठी

कोणतीही कलाकृती आधी लेखकाच्या मनात जन्माला येते. त्यामुळे लेखकाचे महत्त्व निराळेच. ती कथा असो, कादंबरी, लेख, नाटक, चित्रपट, मालिका किंवा वेबसीरिज. लेखनामध्ये करिअरच्या वाटा कोणत्या आहेत, ते सांगण्यासाठी गेली १५ वर्षे नाटक, चित्रपट, मालिका आणि आता वेबसीरिज या माध्यमांत ताकदीने लिहिणारे लेखक सचिन दरेकर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये आले होते.

सचिन दरेकर

लिखाण हे एक उत्तम आणि पूर्णवेळ करता येईल असे करिअर आहे, हे बहुतेकांना अजूनही माहिती नाही. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर, भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे. लेखक म्हणून काम करायचे असेल तर, इच्छा आणि सातत्य असणे गरजेचे आहे.

लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे, तेही उत्तम. अर्थात हे एका दिवसात येत नाहीच. त्यासाठी वर्षांनुवर्षे काम करावे लागते. लेखणी झिजवावी लागते; पण आंधळेपणाने लिहिणे नव्हे किंवा शुद्धलेखन काढणे नव्हे. आपल्या कल्पना लढवून त्यात नावीन्य आणून आपले लिखाण दर्जेदार करावे लागते. या क्षेत्रासाठी काही ठोस शिक्षण नाही किंवा शिक्षण नसेल तर यात करिअरच होऊ शकणार नाही, असे नाही; पण सातत्य हवेच. आपले विचार स्पष्ट मांडता आले पाहिजेत. त्यासाठी विचारांची बैठक पक्की हवी. त्यासाठी उत्तम वाचन हवे. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त माहिती घ्याच, पण जे माहिती नाही, त्याचीही माहिती घ्या.

सुरुवात करताना एखाद्या प्रथितयश लेखकाकडे उमेदवारी करा. चांगल्या लेखकांनी घेतलेल्या लेखन कार्यशाळांना हजेरी लावा. आपले निरीक्षण खूप चांगले असायला हवे. लेखक होण्यासाठी बाहेरचे जग ओळखणे गरजेचे आहे, बाहेरच्या लोकांमध्ये वावरणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठ लेखकांसोबत काम करताना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळते. लेखक होण्यासाठी कोणत्याही क्षेत्राचे शिक्षण घेतले तरी चालते, परंतु त्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे तसेच सतत लिहीतदेखील राहिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर, ती गोष्ट करण्यासाठी परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. तीच गोष्ट लेखनाची. महत्त्वाचे म्हणजे स्वान्तसुखाय लेखन करून पैसे देणारे करिअर घडवता येईल, याची खात्री नाही; पण सातत्य ठेवल्यास, एक काम म्हणून लेखन केल्यास नक्कीच करिअर आहे.

वेबविश्वात संधी भरपूर!

ब्लॉगर म्हणून सुरुवात केलेल्या आणि सध्या सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणाऱ्या प्रिया आडिवरेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समाजमाध्यमांवर यशस्वी करिअर कसे घडवावे, याच्या टिप्स प्रिया यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

कॉलेजला असताना एका साध्या ब्लॉगपासून मी सुरुवात केली. सुरुवातीला खरेतर यात करिअर करायचे, असा काही विचार नव्हता, पण मला लिहायला आवडते. त्यामुळे त्यातच करिअर करावे, हा विचार होता, शिवाय ब्लॉगला मिळणारा प्रतिसादही वाढायला लागला होता. मग हळूहळू एकएक करत मी या वेबविश्वात प्रवेश केला. सुरुवातीला एखादी वेबसाइट किंवा वेबअ‍ॅड्रेस विकत घेण्यासाठीचे पैसेही नव्हते गाठीशी. मग बाबांकडून घेऊन स्वत:च्या बचतीतील पैसे वापरून एक वेबसाइट तयार केली. मी अगदी साध्या साध्या गोष्टींतून पुढे गेले. आपल्या चुकांतून शिकत गेले. इंटरनेटचे, समाजमाध्यमांचे तंत्र माहिती नव्हते. त्यासाठीचे भरमसाट फीचे अभ्यासक्रमही परवडणारे नव्हते. मग यू टय़ूब, गुगलवरील मोफत टय़ुटोरिअल्स पाहिली. त्यातून शिकले.

आज तरुणांनी समाजमाध्यमांना मनोरंजनापेक्षा व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे. अनेकजण या समाजमाध्यमांवर आपला भरपूर वेळ घालवतात. त्यातला थोडासा वेळ जरी त्याचे तंत्र शिकण्यात घालवला तरी तुम्हाला उत्तम करिअरची संधी मिळेल. या क्षेत्रात संधींची कमी नाही. दिवसेंदिवस नवनव्या संधी येत आहेत. फक्त त्या ओळखायला हव्या. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, वेबसाइट तयार कशी करतात, इमेज कशा अपलोड कराव्या अशा सगळ्याच लहान-मोठय़ा गोष्टींची उत्तरे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्या शोधा आणि वापरा.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल कंटेन्ट क्रिएटर्सच्या अकाउंट्सवरून एखाद्या ब्रँडची, त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात केली जाते. मग त्या कंपन्या आपल्या फॉलोअर्सच्या अर्थात आपण किती जणांपर्यंत ते प्रॉडक्ट पाठवू शकतो त्या ताकदीचा अंदाज घेतात त्यानुसार पैसेही मिळतात. फॉलोअर्स मिळवताना आपल्या पोस्टमध्ये सातत्य आणि नावीन्य हवे, दर्जा हवा. तो असेल तर फॉलोअर्स कायम राहतात.

समाजमाध्यमावर काम करताना यातील ट्रेंड्सची माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर व्यक्तींनी लिहिलेले ब्लॉग्स आणि त्यांची माहिती, अकाउंट्स (प्रोफाइल) याचा अभ्यास केला पाहिजे. परदेशी ब्लॉगर्सचे ब्लॉग्स आणि संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.  त्यामुळे जगातील नवीन ट्रेंड्सची माहिती मिळायला मदत होते.

अर्थात या क्षेत्रात करिअर करताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. पटकन प्रसिद्धी मिळेल, पण ती कायम राहण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागतो. माझे पालक सुदैवाने याबाबतीत अतिशय सकारात्मक होते. त्यांचा कायमच पाठिंबा लाभला, पण सगळ्यांचेच असतील असे नाही. त्यासाठी आपले काम उत्तम, दर्जेदार असणे आणि आपण त्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.