17 November 2019

News Flash

वैद्यकीय क्षेत्रातील संधी

लोकसत्ता मार्ग यशाचा या करिअर कार्यशाळेमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांनी हजेरी लावली.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता मार्ग यशाचा या करिअर कार्यशाळेमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांनी हजेरी लावली. करिअरची निवड करताना येणारा ताण कसा हाताळावा, वैद्यकीय क्षेत्रासारख्या रुळलेल्या वाटेवर करिअरसंधी कशा आहेत, लेखनासारख्या हटके विषयात करिअर कसे करावे अशा अनेक प्रश्नांना या कार्यशाळेत उत्तरे मिळाली.

वैद्यकीय क्षेत्रातील संधी

वैद्यकीय क्षेत्रात यायचे म्हणजे नेमके काय करायचे, करिअरच्या कोणत्या संधी आहेत, याबद्दल डॉ. अमोल अन्नदाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. अमोल अन्नदाते

वैद्यकीय क्षेत्रातील पैसा पाहून डॉक्टर व्हायचे, असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. आपल्याला डॉक्टरच का व्हायचे आहे, ते स्वत:ला विचारा. इथे शिकण्यासाठी हुशारी आणि चिकाटी हवी, मेहनत करण्याची तयारी हवी. त्याचसोबत संयम हवा. रुग्णाच्या भावना समजून काम करणे जमले पाहिजे. अगदी असामान्यच बुद्धिमत्ता हवी, असे नाही. परंतु अभ्यास करण्याची तयारी नक्कीच हवी. या क्षेत्रात एमबीबीएस, एमडी, मग उमेदवारी असे सगळे करण्यात आठ ते दहा वर्षे घालवावी लागतात. तेवढा वेळ करिअरला देण्याची आपली तयारी आहे का, याचा विचार करा.

वैद्यकीय क्षेत्रातील जवळपास सर्वच अभ्यासक्रमांकरता नीट (NEET) ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत नकारात्मक गुणपद्घती असते. त्यामुळे कोणते प्रश्न सोडवायचे नाहीत, हे आधी समजले पाहिजे. ज्या उत्तरांबद्दल तुम्हाला खात्री आहे, तेवढेच प्रश्न सोडवा. नाहीतर उगाच हवेत बाण मारू नका. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनीटाचाही वेळ नाहीतर केवळ ५४ सेकंद आहेत, हे ध्यानात घ्या. त्यामुळे जास्तीतजास्त बहुपर्यायी प्रश्न आणि पेपर्स सोडवण्याचा प्रयत्न करा. दररोज झोपण्यापूर्वी मी अमुक इतके प्रश्न सोडवलेच पाहिजे असा दंडक स्वत:ला घालून घ्या. उत्तरे लिहिताना ३ टप्पे करा. पहिल्या टप्प्यात ज्या प्रश्नांबद्दल पक्की खात्री आहे, ते सोडवा. पुढच्या टप्प्यात ज्या उत्तरांबद्दल ५०टक्के खात्री आहे, असे प्रश्न सोडवा. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ज्यांचे उत्तर जवळपास माहिती नाहीच असे प्रश्न ठेवा. या तिसऱ्या टप्प्यासाठी वेळ जास्त लागणार आहे, शिवाय यातीलच नेमके कोणते प्रश्न सोडवायचे नाहीत हे ठरवणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रश्न सोडवलाच पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. त्यामुळे नकारात्मक गुणपद्धतीचा फटका बसतो आणि गुणानुक्रम खाली जातो. या परीक्षेसाठी शक्यतो ३ प्रयत्न करावेत. त्यात यश मिळाले नाही तर मात्र पर्याय दोनचा विचार करावा, असे मी सांगेन. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच असेल. नीटप्रमाणेच एम्स (AIIMS), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजची परीक्षा (AFMC) आणि सीएमसी वेल्लोर कॉलेजची परीक्षा (CMC Vellore)  या परीक्षांची काठिण्यपातळी नीटपेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यात तुम्हाला किती गुण मिळोत वा न मिळोत पण अनुभव दांडगा मिळतो. आर्मीच्या मेडिकल कॉलेजचा मार्गही चांगला आहे. केवळ दिवसातून तासभर कवायत आणि व्यायाम व शारीरिक शिक्षणाला द्यावा लागतो. परंतु

यातून देशसेवा करण्याचीही संधी मिळते.

वैद्यकीय शिक्षणासाठी एमबीबीएस हा काही एकमेव पर्याय नाही. होमिओपॅथी, आयुर्वेद, दंतवैद्य, फिजिओथेरपी, युनानी, पंचकर्म आदी अनेक पर्याय आहेत. सोबतच नर्सिगसारखे प्रचंड मागणी असेलेले क्षेत्र आहे. फार्मसीचा रस्ताही चांगला आहे. तसेच बायोटेक्नोलॉजी, बायोमेडिकल, फूड टेक्नोलॉजी यांसारखे थेट वैद्यकीय नाही, पण त्यावर आधारित काही अभ्यासक्रम करता येऊ शकतात. त्याचसोबत हल्ली हॉस्पिटल मॅनेजमेंटमधल्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. पॅरामेडिकल्सना मोठी मागणी आहे. ऑक्युपेशन थेरपी, एक्स-रे टेक्निशिअन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, लॅब टेक्निशिअन, डायलेसिस टेक्निशिअन अशा अनेक व्यवसायांना भरपूर वाव आहे, मात्र त्यातील उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे. पशुवैद्यक क्षेत्राची मागणीही दिवसेंदिवस वाढते आहे.

परदेशात शिकायला जायचे तर रशिया, फिलिपाइन्स, जॉर्जयिा, चीन, जपान या ठिकाणचे वैद्यकीय शिक्षणाचे पर्याय चांगले आहेत. तेथील विद्यापीठांशी त्यांच्या संकेतस्थळांवरून थेट संबंध साधता येतो. शक्यतो एजंट टाळा. परंतु तेथे शिकल्यानंतर पुढे भारतात काम करण्याआधी एक परीक्षा द्यावी लागते.

एमबीबीएससाठीचे महाविद्यालय निवडताना जिथे जास्तीत जास्त काम असेल, रुग्ण येत असतील, असे निवडल्यास उत्तम. त्यामुळे तुम्हाला भरपूर अनुभव मिळेल. अर्थात दमछाकही होईल. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना कमी लेखू नका. उलट तेथे रुग्णांची संख्या जास्त असते, शिवाय आजारांतही विविधता अभ्यासायला मिळते. एकूणच डॉक्टरांचा पैसा बघून नव्हे तर पॅशन बघून या क्षेत्रात या!

आनंददायी करिअर हवे!

करिअरची निवड करताना येणारा ताण कसा हाताळावा, याविषयी मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.

डॉ. राजेंद्र बर्वे

एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो म्हणजे करिअर घडले असे होत नाही. तुम्ही स्वत:च्या मनातील ताण कसा कमी करू शकता, तुम्ही किती जणांशी संपर्क साधू शकता, तुम्ही लोकांमध्ये किती लवकर मिसळता, तुम्ही किती मोकळे मनाने बोलता, तुमच्यामध्ये किती लवचीकता आहे हे ओळखणे म्हणजेच करिअर घडविणे होय. त्यामुळे केवळ एखादा अभ्यासक्रम शिकूनच करिअर घडते असे नसते.

मुलांचे करिअर घडत असताना पालकांनीही काही ठोस भूमिका घेणे आवश्यक असते. अमुक ते शिकूच नका किंवा शिकाच अशी काही सक्ती पालकांनी करू नये. लादलेल्या करिअरमध्ये यश मिळेल पण काम करण्याचा आनंद नाही. त्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवता येत नाही. या लादलेल्या करिअरमध्ये तो प्रचंड ऊर्जेने काम करू शकत नाही. अशा करिअरला काही अर्थ उरत नाही. अनेक वेळा पालक मुलांना मोकळीक देतात. त्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते करण्यास सांगतात. मात्र, कधी कधी मुलांकडूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मुलांनीही ज्या क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे तेच निवडावे.

करिअर घडविण्यासाठी तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. एक म्हणजे क्षमता. दोन कामांतील आनंद आणि तिसरा मुद्दा आहे, व्यक्तिमत्त्वाचा. एखादे करिअर करण्याची आपली क्षमता आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे व्हायचे आहे, यूपीएससी पण तेवढा अभ्यास करण्याची क्षमता नाही, आवड नाही. असे असून उपयोगाचे नाही. दुसरे म्हणजे त्या करिअरमध्ये काम करताना आनंद मिळेल का आणि तिसरे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व त्या करिअरला साजेसे आहे का. निरनिराळे अनुभव घ्यायला आपल्या मनाची तयारी आहे का, नवे विचार आपल्याला पटापट सुचतात का, कल्पनाशक्ती चांगली आहे का, वेळा पाळायला आवडतात का, संवाद साधायला आवडतो का अशा निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपले व्यक्तिमत्त्व ओळखता येते. प्रत्येक करिअरमध्ये तणाव असतो, परंतु तो तणाव आपण कितपत झेलू शकतो हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ताणाला नियंत्रित करू शकाल तर नक्कीच तुम्ही नक्कीच यशस्वी करिअर घडवू शकता.

जर आयुष्यात व्यक्तिमत्त्व विकास, क्षमता, कामातील आनंद ओळखला तर करिअर घडवणे, अवघड नाही. करिअर घडवताना या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. आयुष्य जगताना आनंदी राहा. आपल्याकडे असलेली क्षमता लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.

लिहिते व्हा!

मालिका लेखनातील करिअरच्या काय संधी आहेत, याविषयी मालिका लेखनात यशस्वी करिअर करणारे लेखक शिरीष लाटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शिरीष लाटकर

मालिका लिखाणाचे क्षेत्र असते, याचीच मुळात विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. परंतु मालिका लेखनात प्रचंड संधी आहेत. त्यातही प्रादेशिक भाषांतील संधी मोठय़ा आहेत. टीव्हीचे जग प्रचंड विस्तारले आहेत. मालिका म्हणजे जणू भस्मासुर झाला आहे. आज दररोज जवळपास १८० मालिका दिसतात. त्यांच्यासाठी मजकूर निर्माण करावा लागतो. त्यासाठी माणसंही तितकीच हवीत. मात्र ती नाहीत. त्यामुळेच आहेत ती आठ-दहा नावे परत परत लिहितात.

लेखक होणे फार कठीणही नाही आणि सोपेही नाही. ज्याला व्यक्त व्हावेसे वाटते, तो कुणीही लेखक होऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रयत्न आणि सातत्य हवेच. महत्त्वाचे म्हणजे वाचन हवे. मालिका लेखनात सुरुवात होते ती, एका कल्पनेपासून ज्याला किडा म्हणतात. हा कल्पनेचा किडा डोक्यात वळवळला आणि तो त्या वाहिनीला पटला की मग पुढे मालिकेची तयारी सुरू होते. त्याआधी पहिले २०० भाग तयार होतात. त्याची पटकथा तयार होते. संवाद लिहिले जातात. मग हळूहळू मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून ती गोष्ट वळवली जाते. फिरवली जाते.

तुम्हाला कथा लिहायला, सांगायला जमत असेल तर तुम्ही कथा लिहू शकता. त्यावर पटकथा बांधायला जमत असेल तर ते करू शकता आणि दुसऱ्याने लिहिलेल्या कथेवर चुरचुरीत संवाद लिहिता येत असतील तर लेखक बनू शकता. लेखक म्हणून करिअर करायला येता तेव्हा तुम्हाला ठरवायला लागेल की, नक्की कोणत्या गोष्टीत मास्टर व्हायचे आहे, की तीनही गोष्टी करायच्या आहेत.

लिखाणाचे तंत्र शिकण्याचा कोणताही ठोस अभ्यासक्रम असा नाही. जो केल्यानंतरच लेखक होता येईल. परंतु त्याचे अभ्यासक्रम आहेत, काही कार्यशाळा होत असतात ज्या केल्यानंतर निश्चितच तुम्हाला उपयोग होईल. विविध संस्था, मान्यवर लेखक अशा कार्यशाळा आणि अभ्यासक्रम घेत असतात. त्याचा उपयोग करून घ्या. परंतु आधी पदवीधर व्हा. ते शिक्षण अर्धवट सोडून कृपया येऊ नका. कारण तुमच्याकडे एखादी पदवी असणे, अतिशय गरजेचे आहे. शिक्षण चालू असताना काम करता येईल पण ते अर्धवट सोडून मात्र काम करू नये, असा सल्ला मी देईन.

आपल्याला लिहायला आवडत असेल तर आधी लिहायला सुरुवात करा. दररोज एखादा विषय घेऊन लिहा. जो प्रकार लिहायला आवडतो तो लिहा. मग ती कथा असेल नाटक, एकांकिका असेल किंवा संवाद असतील पण लिहायला लागा. अनेक लेखकांना सहाय्यकाची जरूर असते.

त्यांच्याकडे जरूर उमेदवारी करा. त्या कामात अनुभव मिळेल, तंत्र शिकायला मिळेल आणि नेमके काम कसे चालते, हे पाहायला मिळेल. तुम्हाला एखाद्या लेखकाकडे काम मागायला जायचे असल्यास फोनवर मेसेज करू नका. तर रीतसर ई मेल करा. त्यात आपल्याला नेमके कसे काम करायचे आहे. आपण काय लिहितो, त्याचा नमुना इ. गोष्टी व्यवस्थित मांडा. यातून तुमची व्यावसायिक दृष्टिकोन दिसून येतो.

या क्षेत्रात काम करताना अनपेक्षित बदलांसाठी कायम तयार राहावे लागते. उदा. एका मालिकेचे शूटिंग चालू असताना त्यातील महत्त्वाच्या पात्राची तब्येत अचानक बिघडली. मग रातोरात त्या मालिकेची दुसऱ्या दिवशीची स्क्रिप्ट बदलावी लागली. अशा बदलांसाठी कायम तयार राहावे लागते.

एखादी नवी गोष्ट तुम्हाला सुचल्यास ती आधी स्वत:च स्वत:ला मेल करून ठेवा. त्यामध्ये वेळ आणि तारीख येते. त्या गोष्टीच्या स्वामित्वाबाबत काही वाद झाल्यास हा मेलचा पुरावा ग्राह्य़ धरला जातो.

फिल्म रायटर असोसिएशनसारख्या संस्थेत जाऊन आपल्या कल्पनेचे, कलाकृतीचे हक्क स्थापित करा. नोंदणी करा. त्यासाठी आधी संस्थेचे सभासदत्व घ्या. संस्थेकडे नोंद असेल तर तुमच्या कल्पनेची चोरी होऊ शकत नाही. ऑनलाइनही नोंद करता येऊ शकते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे होऊनही कधी ना कधी आपल्या कल्पनेची चोरी किंवा काही कटू गोष्टी घडू शकतील, याची तयारी ठेवा. पण त्यामुळे निराश होऊ नका. कारण लोक तुमची कल्पना चोरू शकतात. बुद्धी नाही. ती धारदार ठेवण्यासाठी सतत वाचत राहा. अभ्यास सुरू ठेवा.

First Published on June 29, 2019 12:02 am

Web Title: lokstta marg yashacha career workshop abn 97 2