News Flash

अर्थविश्वाचा केंद्रबिंदू

स्थापनेनंतर लगेचच म्हणजे सन १९०० साली एलएसईने स्वत:ला ‘युनिव्हर्सटिी ऑफ लंडन’सोबत जोडून घेतले.

|| विद्यापीठ विश्व : प्रथमेश आडविलकर

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स (विद्यापीठाची ओळख) -सामाजिक शास्त्रातील शिक्षण-संशोधनासाठी जागतिक स्तरावर नामांकित असलेले इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स ज्याला नेहमी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) या नावाने संबोधले जाते हे एक प्रमुख शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा अडतिसावा क्रमांक आहे. या जगविख्यात विद्यापीठाची स्थापना इसवी सन १८९५ साली जॉर्ज बर्नार्ड शॉ, ग्रॅहॅम वॉलेस, वेब्ब दाम्पत्य या फेबियन सोसायटीच्या सदस्यांनी केलेली आहे. युनिव्हर्सटिी ऑफ लंडन या देशामधील केंद्रीय विद्यापीठाशी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स संलग्न आहे. स्थापनेनंतर लगेचच म्हणजे सन १९०० साली एलएसईने स्वत:ला ‘युनिव्हर्सटिी ऑफ लंडन’सोबत जोडून घेतले. मात्र, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स या स्वतंत्र नावाने २००८ पासून एलएसईने पदवीदान करावयास सुरुवात केली. सध्या एलएसईमध्ये दीड हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास अकरा हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. विशेष म्हणजे यातील आठ हजार विद्यार्थी हे १४८ देशांमधून आलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. म्हणूनच एलएसईचा कॅम्पस हा शंभर भाषा बोलणारा बहुभाषिक परिसर आहे.

 अभ्यासक्रम –लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अठ्ठावीस प्रमुख विभाग आणि संशोधन संस्था आहेत. यामध्ये अकाऊंटिंग, अ‍ॅन्थ्रोपोलॉजी, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक हिस्टरी, युरोपियन इन्स्टिटय़ूट, फायनान्स, जेन्डर स्टडीज, जिओग्राफी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, ग्लोबल अफेअर्स, गव्हर्नमेंट, हेल्थ पॉलिसी, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल हिस्टरी, इंटरनॅशनल इनइक्व्लिटीज, इंटरनॅशनल रिलेशन्स, लँग्वेज सेंटर, लॉ, मॅनेजमेंट, मार्शल इन्स्टिटय़ूट, मॅथेमॅटिक्स, मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, मेथडॉलॉजी, फिलॉसॉफी लॉजिक अ‍ॅण्ड सायंटीफिक मेथड, सायकोलॉजिकल अ‍ॅण्ड बिहेवेअरल सायन्स, सोशल पॉलिसी, पब्लिक पॉलिसी, सोशिओलॉजी, स्टॅटिस्टिक्स या अठ्ठावीस विभागांचा समावेश आहे.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी तीन ते चार वर्षांचा आहे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स या सर्व विभागांच्या माध्यमातून ४२ पदवी अभ्यासक्रम, अध्यापनातून २५३ पदव्युत्तर अभ्यासक्रम तर संशोधनातून ११९ पदव्युत्तर अभ्यासक्रम, ४३ एक्झिक्युटिव्ह आणि १२७ समर स्कूल्स एवढे अभ्यासक्रम सर्व स्तरांवर चालवते.

याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडे लँग्वेज सेंटर, प्रोफेशनल आणि ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स यांसारख्या अभ्यासक्रम पर्यायांची भरपूर उपलब्धता आहे. पदवी वा पदव्युत्तर स्तरावर विषय निवडीसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र कार्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आयईएलटीएस, जीआरई, टोफेल, सॅट, जीमॅट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सुविधा –एलएसईकडून व युके शासनाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.आर्थिक मदतीचा एक भाग म्हणून एलएसईने विद्यार्थ्यांना अर्धवेळ कामाची अनेक संधी विद्यापीठाच्या आवारातच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एलएसईने आपल्या परिसरात विद्यार्थ्यांना विविध दरांमध्ये वेगवेगळ्या सोयींसह वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

याशिवाय विद्यार्थी खासगी निवासाचा पर्यायही निवडू शकतात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी करिअर मार्गदर्शन केले जाते. विद्यापीठाच्या आवारात कॅफेटेरिया, रेस्टॉरंट, पब, नाइट कॅफेज आणि इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय कॅम्पसमध्येच जिम, एक्सरसाईज स्टुडिओ, विविध क्लब्स, प्रदर्शने, व्याख्याने, कॉन्सर्टस्, परफॉर्मन्सेस इत्यादी सोयींसह दंतचिकित्सा आणि आरोग्य केंद्राची सुविधा, वैयक्तिक क्रीडाप्रकारांपासून ते सांघिक खेळांपर्यंत जवळपास सर्व खेळांच्या सुविधा, त्यातील क्लब्ज आणि सोसायटीज एलएसईच्या आवारात स्थित आहेत.

वैशिष्टय़ –एलएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये अठरा नोबेल विजेत्यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राजकारण या क्षेत्रांमधील जागतिक स्तरावर चमकले आहेत. येथील प्राध्यापकवर्ग हा जागतिक दर्जाचा आहे. विद्यापीठाकडे जसे दीडशे देशांमधून विद्यार्थी प्रवेश घेतात तसेच जगभरातील जवळपास शंभर देशांमधील अध्यापक येथे अध्यापन कार्यासाठी एकत्रित आलेला आहे. एलएसई ही संस्था रसेल ग्रुप, कॉमनवेल्थ युनिव्हर्सटिीज असोसिएशन व युरोपियन युनिव्हर्सटिीज असोसिएशन इत्यादी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची सदस्य आहे. ही संस्था दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील विद्यापीठांच्या सुवर्ण त्रिकोणाचा (गोल्डन ट्रँगल) एक भाग मानला जाते.

itsprathamesh@gmail.com   संकेतस्थळ – http://www.lse.ac.uk/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:16 am

Web Title: london school of economics and politics akp 94
Next Stories
1 भारतीय राज्यघटना
2 गट क मुख्य परीक्षा  चालू घडामोडींची तयारी
3 राजकीय व्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया
Just Now!
X