02 June 2020

News Flash

आडदरा

महाराष्ट्रातील गोंड, कोरकू, धीवर, पारधी अशा अनेक आदिवासी जमाती हजारो वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहत आल्या आहेत.

शब्दबोध डॉ. उमेश करंबेळकर 

महाराष्ट्रातील गोंड, कोरकू, धीवर, पारधी अशा अनेक आदिवासी जमाती हजारो वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहत आल्या आहेत. त्यामुळे रानातील लता-वेली, पशू-पक्षी, फुले-फळे हे सर्व त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनलेले असतात. केवळ पशुपक्षीच नव्हे तर नदी-ओढे, धबधबे, सरोवरे, जंगल, जमीन, तारे, नक्षत्र यांनाही त्यांच्या जीवनात खास स्थान असते. साहजिकच या सर्वाना त्यांच्या भाषेत अर्थपूर्ण नावेही असतात. काही वेळा या नावांचा उगम संस्कृतातून झाला असण्याचीही शक्यता असते. पण विशेष म्हणजे त्यांत क्लिष्टता नसते. त्या वनवासी समूहाच्या भाषेत येताना ते साधे, सरळ व सुगम होऊन येतात. पुलंनी आपल्या ‘काही अप- काही डाऊन’ या लेखात याचे सुरेख वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘गावंढी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात. प्लॅटफॉर्मचा फलाट करतील तर स्टेशनचं ठेसन. स्टेशनाचं ठेसन झाल्याबरोबर त्यात जीव आला’ असे पु.लं.नी  लेखात म्हटले आहे. अर्थात हे केवळ इंग्रजी शब्दांपुरते मर्यादित नाही हा. संस्कृत शब्दांनाही हे वर्णन लागू पडते. महत्तर या संस्कृत शब्दाचे प्राकृतात म्हातारा असे रूपांतर झाले. तसेच काही तरी आद्र्रा नक्षत्राच्या बाबतीत घडले असावे. या नक्षत्राला गोंड भाषेत आडदरा म्हणतात. ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली अनेक वर्षे कोरकू, गोंड, धीवर अशा आदिवासी जमातींच्या सान्निध्यात राहिले. त्यांच्या भाषेतील अनेक अर्थपूर्ण आणि अनोळखी शब्द त्यांनी आपल्या साहित्यात वापरले. आपल्याला त्यांची ओळख करून दिली. ‘आडदरा’ हा असाच एक अर्थपूर्ण शब्द. या शब्दाची उत्पत्ती सांगताना चितमपल्ली म्हणतात, आडदरा हे केवळ आद्र्राचं अपभ्रष्ट रूप नसून त्यालाही अर्थ आहे. ऋतू बदलला की रानातील निसर्गही बदलतो. आद्र्रा नक्षत्रावर साधारणत: जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे उन्हाळ्यात दिसणाऱ्या दऱ्या आद्र्रा नक्षत्र लागलं की नजरेआड होतात म्हणून आद्र्राचे नाव पडले, आडदरा. बोली भाषेतील शब्दही कसे अर्थपूर्ण असतात हे यावरून आपल्या लक्षात येतेच आणि त्याच वेळी एकविसाव्या शतकातही या बोलीभाषा टिकून राहणे किती आणि का गरजेचे आहे याची जाणीवही होते.

एकप्रकारे आडरानात पडलेल्या आडदरा शब्दाला चितमपल्लींनी बाहेर काढलं आणि साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणलं हे या शब्दाबरोबरच आपलेही भाग्य म्हणायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 4:03 am

Web Title: maharashtra tribal history akp 94
Next Stories
1 गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी
2 घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग
3 अर्थविश्वाचा केंद्रबिंदू
Just Now!
X