|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख – साक्षरतेच्या बाबतीत देशात अव्वल असलेल्या केरळ राज्यामधील एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून कोट्टायम येथील महात्मा गांधी विद्यापीठ ओळखले जाते. गांधी जयंतीला, २ ऑक्टोबर, १९८३ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. केरळच्या मध्य भागामध्ये उच्च शिक्षणाची गरज पूर्ण करण्याची महत्त्वाची जबाबदारी हे विद्यापीठ सातत्याने पार पाडत आहे. केवळ पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमांवरच भर न देता, औद्योगिक क्षेत्राच्या नेमक्या गरजा लक्षात घेत नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याकडे या विद्यापीठाने लक्ष दिले आहे. गेल्या तीन दशकांच्या काळामध्ये या विद्यापीठाने आंतरविद्याशाखीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. केरळमधील इतर विद्यापीठांच्या तुलनेत मोठय़ा संख्येने असलेली विद्यापीठ-संलग्न महाविद्यालयांची संख्या हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणून विचारात घेतले जाते. विद्यापीठामार्फत या महाविद्यालयांसाठी राबविली जाणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया हेही या विद्यापीठाचे एक वेगळेपणच ठरते. जाणीवपूर्वक करण्यात आलेली आंतरविद्याशाखीय, तसेच आंतरविद्यापीठीय केंद्रांची उभारणी हेही या विद्यापीठासाठी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. विद्यापीठांसाठीच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’च्या क्रमवारीमध्ये २०१८ सालासाठी या विद्यापीठाला देशात ३४वे स्थान देण्यात आले आहे.

संकुले आणि सुविधा – कोट्टायम शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अथिरामपुझा येथील प्रियदर्शनी टेकडीच्या परिसरात ११० एकरांच्या परिसरात या विद्यापीठाचे मुख्य संकुल कार्यरत आहे. कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की हे जिल्हे, तसेच पथनमथिट्टा व अलप्पुझा जिल्ह्य़ांचा काही भागही या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो. विद्यापीठाच्या मुख्य संकुलाव्यतिरिक्त एकूण सात संकुले या सर्व ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कार्यरत आहेत. विद्यापीठांतर्गत १७ विभाग, १ आंतरराष्ट्रीय व आंतरविद्यापीठीय केंद्र, ७ आंतरविद्यापीठीय केंद्रे, १० आंतरविद्यालयीन केंद्रे चालतात. त्याशिवाय ७७ अनुदानित संलग्न महाविद्यालये, १० स्वायत्त महाविद्यालये, २०० विनाअनुदानित संलग्न महाविद्यालये व १९९ संशोधन संस्थांचा शैक्षणिक कारभारही हे विद्यापीठ नियंत्रित करते. विद्यापीठाच्या मुख्य संकुलामध्ये पाच वसतिगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यापकी दोन वसतिगृहे ही विद्यार्थ्यांसाठी, तर तीन वसतिगृहे ही विद्यार्थिनींसाठी आवश्यक त्या सोयी पुरवितात. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या जोडीने विभाग पातळीवरील २२ ग्रंथालये आणि ४ अभ्यास केंद्रेही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहेत. विद्यापीठामध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवरील पाठय़वृत्त्यांव्यतिरिक्त विद्यापीठामार्फत स्वतंत्रपणे १७५ पाठय़वृत्त्या दिल्या जातात. विद्यापीठाची पीएचडी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, मात्र इतर कोणत्याही पाठय़वृत्तीची संधी न मिळालेल्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी या पाठय़वृत्ती एक महत्त्वाची बाब ठरतात.

अभ्यासक्रम

या विद्यापीठामध्ये एकूण १७ स्कूल्स उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्कूल ऑफ बिहेव्हिरल सायन्सेस, स्कूल ऑफ बायोसायन्सेस, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, स्कूल ऑफ डिस्टन्स सायन्सेस, स्कूल ऑफ एन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस, स्कूल ऑफ गांधीयन थॉट अँड डेव्हलपमेंट स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड पॉलिटिक्स, स्कूल ऑफ इंडियन लीगल थॉट, स्कूल ऑफ लेटर्स, स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस स्टडीज, स्कूल ऑफ प्युअर अँड अ‍ॅप्लाइड फिजिक्स, स्कूल ऑफ पेडॅगॉजिकल सायन्सेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्सेस, स्कूल ऑफ टुरिझम स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ लाइफ लाँग लìनग अँड एक्स्टेन्शन्स, डिपार्टमेंट ऑफ पिट्रिंग अँड पब्लिशिंग यांचा समावेश होतो. त्याअंतर्गत विद्यापीठाने उद्योग-व्यवसायातील कौशल्यांची मागणी ओळखून अनेक विषयांमध्ये विशेष अभ्यासक्रम करून दिले आहेत. त्याआधारे बी.ए. अभ्यासक्रमासाठीचे ५२, बी.एस्सी.साठीचे ४३, बी.कॉम.साठीचे १४, एम.ए.साठीचे २७, तर एम.टेक.साठीचे ६ विशेष अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिहेव्हिअरल सायन्सेसअंतर्गत एम. एस्सी. डिसॅबिलिटी स्टडीज अँड रिहॅबिलिटेशन सायन्सेस, एम.एस्सी. सायकोलॉजी आणि पीजी डिप्लोमा इन इंडियन साइन लँग्वेजेस हे वेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ बायोसायन्सेसमध्ये एम.एस्सी. बायोफिजिक्ससह संशोधनासाठी एम.फिल. बायोसायन्सेस आणि पीएचडी फिजिओलॉजी हे अभ्यासक्रमही चालविले जातात. स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित एम.एस्सी., एम.फिल. आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या जोडीने एम.टेक. पॉलिमर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. स्कूल ऑफ एन्व्हायर्न्मेंटल सायन्सेसमध्ये एम.एस्सी. इन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंटचा एक वेगळा अभ्यासक्रम चालविला जातो. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंडियन लीगल थॉट्समध्ये विद्यार्थ्यांना एलएलबी अभ्यासक्रमासह पाच वर्षे कालावधीचा बीबीए. एलएलबी हा अभ्यासक्रमही चालतो. स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड पॉलिटिक्समध्ये विद्यार्थ्यांना एम.ए. पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या वेगळ्या अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध आहे. त्याशिवाय अर्थशास्त्रावरील विशेष अभ्यासासह इंटरनॅशनल रिलेशन्समधील पीएचडी मिळविण्याची संधीही या स्कूलमध्ये उपलब्ध आहे. स्कूल ऑफ सोशल सायन्सेसअंतर्गत सोशल ट्रान्स्फॉम्रेशन अँड एम्पॉवरमेंट, ह्य़ुमन इकॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री या विषयांमधील एम.फिल.साठीचे संशोधन करणे शक्य आहे. स्कूल ऑफ टुरिझम स्टडीजमध्ये मास्टर ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम चालतो. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना टुरिझम स्टडीज, हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि परकीय भाषांचा अभ्यास एकत्रितपणे करणे शक्य होत आहे.

borateys@gmail.com