यंदाच्या (२०१६-१७ वर्षांच्या) एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियला सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली प्रवेश परीक्षा, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे अलीकडेच घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होईल आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होणे, त्यामधील काही चुका झाल्यास दुरुस्त करणे, तसेच ठरावीक काळामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन) करून घेणे, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन आपल्याला प्रवेश हव्या असलेल्या संस्थांचा पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरून देणे आणि शेवटी मिळालेल्या संस्थेमध्ये प्रवेश घेणे असे टप्पे पार पाडले जातील. या प्रत्येक टप्प्याची माहिती प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनीला असणे आवश्यक आहे. एमबीए अभ्यासक्रमाचे प्रत्येक संस्थेतील ८०% प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होत असल्यामुळे फॉर्म भरण्यातील एखाद्या चुकीमुळे किंवा प्रत्येक टप्प्याची दिलेली मुदत न पाळल्यामुळे केंद्रीय प्रवेश पद्धतीमधून बाद होण्याची शक्यता असते. सरकारकडून मिळणाऱ्या अनेक सवलती केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेशावर अवलंबून असल्यामुळे या पद्धतीतून बाद झाल्यास या सवलती मिळत नाहीत. याशिवाय व्यवस्थापन कोटय़ामध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास अधिक शुल्क भरावे लागण्याची शक्यता असते. यामुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वानी तंत्र शिक्षण विभागाकडून मिळणारे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचायला हवे व त्यातील तारखांची नोंद करून घ्यायला हवी.
एमबीए अभ्यासक्रमासाठी दर्जेदार शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळवणे हे प्रत्येकाचेच ध्येय असते. गेल्या काही वर्षांत एकूणच देशस्तरावर विचार केल्यास असे दिसते की, या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींपेक्षा अधिक असल्यामुळे, अनेक जागा रिक्त राहत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. आपल्याही राज्यात अनेक संस्थांमध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या जागा रिकाम्या राहात आहेत. यामुळे अभ्यासक्रमाविषयी काही गैरसमज निर्माण होतात- या अभ्यासक्रमाची मागणी कमी झाली आहे, तसेच एमबीए झालेल्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. खासगी व सरकारी क्षेत्रात एमबीए झालेले विद्यार्थी- विद्यार्थिनी घेत नाहीत असे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. यातून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिकच कमी झाली आणि कित्येक संस्थांपुढे अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. यामागील वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
एमबीएच्या रिक्त जागांमागचे कारण हे अभ्यासक्रमाची मागणी किंवा करिअरच्या संधी कमी झाल्या असे नसून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनी अपेक्षित दर्जा प्राप्त करू शकलेल्या नाहीत, हे आहे.
गेल्या काही वर्षांत उपलब्ध जागांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली हे जरी खरे असले तरी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही तितकीच वाढली हेही खरे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षित व्यवस्थापकाची गरज आहे. मग ते खासगी क्षेत्र असो किंवा सरकारी- निमसरकारी क्षेत्र असो. सहकार क्षेत्रामध्ये तसेच ग्रामीण भागामध्यही प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत गरज आहे. परंतु या संधी प्राप्त करण्यासाठी केवळ एमबीएची पदवी पदरी असणे पुरेसे नाही. केवळ पदवी आहे म्हणून नोकरी मिळेल हा विचार पूर्णपणे सोडून देणे ही आजची गरज आहे. व्यवस्थापकाला आवश्यक असणारी कौशल्ये विकसित केली नाहीत तर केवळ पदवीचा काहीही उपयोग होऊ शकत नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आज एमबीए क्रमिक तासिकांना न बसता केवळ परीक्षेपुरती हजेरी ठेवणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. साहजिकच असे विद्यार्थी नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यास साध्या प्रश्नांना सामोरे जातानाही त्यांची भंबेरी उडते आणि त्यामुळे नोकरी मिळण्याची त्यांची आशा मावळते. नोकरी मिळत नसल्याने संपूर्ण अभ्यासक्रमाचीच बदनामी होते.
या सर्व बाबींचा विचार केल्यास असे स्पष्ट होते की, विद्यार्थ्यांनी एमबीए अभ्यासक्रमासाठी संस्थेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी. सर्व संस्थांना भेट देणे अशक्यप्राय असले तरी काही संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घ्यायला हवी. ज्या संस्था प्रवेशासाठी शुल्कामध्ये मोठय़ा प्रमाणावर सवलती देतात किंवा तासिकांना न बसण्याची सवलत देतात, अशा संस्थांपासून लांब राहणे हे करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
एमबीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे आणि म्हणून एखादी संस्था जर नोकरी करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सवलत देणार असेल तर अशा सवलतीमुळे आपल्यात करिअरचे नुकसान होईल हे आपण समजून घ्यायला हवे.
करिअरच्या दृष्टीने दर्जेदार संस्थेची निवड होणे महत्त्वाचे ठरते. ऑप्शन फॉर्म भरून देण्यासाठी अद्यापही पुरेसा वेळ आपल्याकडे आहे. या वेळेचा उपयोग करून विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षणसंस्थांची माहिती जमा करता येईल. पदवी परीक्षा संपल्यानंतर अशा भेटी देता येतील. एमबीए झाल्यानंतर ज्याप्रमाणे विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होतात तशाच प्रकारे स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्यासुद्धा अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र त्याकरता आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत अनुकूल बदल करणे महत्त्वाचे ठरते.
चांगल्या व्यवस्थापकांची मागणी दिवसेंदिवस जशी वाढत जाणार आहे तसेच नव- उद्योजकांनाही विविध संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. याकरता शॉर्टकट न शोधता, कौशल्य विकसनावर भर देऊन मेहनत केल्यास व्यवस्थापनात उत्तम करिअर घडवता येणे शक्य आहे.
प्रभारी संचालक व अधिष्ठाता, इंडसर्च पुणे
nmvechalekar@yahoo.co.in 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management taking the course
First published on: 28-03-2016 at 01:02 IST