News Flash

सागरी जीवशास्त्राचा अभ्यास

मरिन बायोलॉजिस्ट हे एकटय़ाने अथवा सांघिकरीत्या काम करत असतात.

समुद्रातील जीवसृष्टीच्या विविध घटकांचा अभ्यास ज्या क्षेत्रात केला जातो, त्या सागरी जीवशास्त्रया क्षेत्राचे स्वरूप आगळेवेगळे आणि आव्हानात्मक आहे. मरिन बायोलॉजिस्ट आणि मरिन कॉन्झव्‍‌र्हेशनिस्ट या करिअरचे स्वरूप विशद करणारा लेख..

मरिन बायोलॉजिस्ट  हे सागरी प्राण्यांचा अभ्यास करतात. समुद्राच्या पाण्यात.. प्रसंगी तळ गाठत आजवर ज्या प्राण्याची नोंद झालेली नाही, अशांचा शोध घेणे, समुद्री प्राण्यांबाबत संशोधन करणे, त्यांच्या स्थलांतराचा पॅटर्न अभ्यासणे आणि विविध माशांमधील संदेशवहनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे अशा प्रकारचे काम मरिन बायोलॉजिस्ट करतात. पर्यावरणीय आणि हवामानातील बदलांचा सागरी प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासातही त्यांना रुची असू शकते. पर्यावरणातील बदलांचा सागरी परिसंस्थेवर कसा विपरीत बदल होतो, याविषयीचा अभ्यास  अनेक सागरी जैवशास्त्रज्ञ करत आहेत.

मरिन बायोलॉजिस्ट हे एकटय़ाने अथवा सांघिकरीत्या काम करत असतात. कधी ते इतर विद्याशाखांच्या अभियंत्यांसोबत, तंत्रज्ञांसोबत अथवा वैज्ञानिकांसोबतही काम करतात. एखाद्या सरकारी संस्थेसाठी सल्लागार, महाविद्यालयात प्राध्यापक आणि पाण्यातील नवनव्या तंत्रज्ञानांच्या निर्मितीवरही ते काम करू शकतात.

काही मरिन बायोलॉजिस्ट मत्स्यालयांमध्ये नोकरी करतात. तिथल्या प्राण्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. काही पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थांसोबत काम करतात तर काही समुद्री जैवशास्त्रज्ञ मत्स्यालये आणि फिशरीज येथे व्यवस्थापनाच्या कामांमध्ये हातभार लावतात.

मरिन बायोलॉजिस्टच्या कामाचे स्वरूप थरारक, साहसी असते. या क्षेत्रात अध्ययनाच्या, संशोधनाच्या विविध संधी प्राप्त होऊ शकतात. या व्यवसायाद्वारे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात हातभार लागू शकतो. या क्षेत्रात नोकरी मिळवणे तुलनेने कठीण असून काही ठरावीक क्षेत्रांतच यासंबंधीच्या संधी उपलब्ध आहेत. सागरी पर्यावरणाच्या क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांचे जाळे असल्याने अशा ठिकाणी स्वयंसेवेची संधीही तुम्हाला प्राप्त होऊ शकते.

शैक्षणिक अर्हता

जीवशास्त्राचा दांडगा अभ्यास, संवादकौशल्य, श्रवणकौशल्य, निरीक्षण कौशल्य, विश्लेषण करण्याची क्षमता यांसोबतच साहसाची आवड आणि सागरी प्राण्यांविषयी जिव्हाळा असणे अत्यावश्यक ठरते. या क्षेत्रात येण्यासाठी बारावीत भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा आणि जीवशास्त्राचा अभ्यास करायला हवा.  जीवशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर या क्षेत्रातील प्राथमिक स्वरूपाच्या नोकऱ्या तुम्हाला करता येतील. जीवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर सल्लागार, अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रांत प्रवेशासाठी दारे खुली होतील. महाविद्यालयांमध्ये अध्यापन करण्यासाठी  मरिन बायोलॉजीमधील पीएच.डी. प्राप्त असणे आवश्यक आहे.

कामाचे स्वरूप

समुद्र संवर्धनाचे काम करणारे तज्ज्ञ डायव्हिंग, संशोधन करणे, सागरी जीवनाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक प्रयोग करणे, माहितीचे निरीक्षण, विश्लेषण करणे आणि सविस्तर अहवाल तयार करणे अशा प्रकारचे काम करतात. भटकंती करून अत्यंत मूलभूत स्तरावरील नैसर्गिक विविधता सविस्तरपणे समजून घेतल्याखेरीज या क्षेत्रात तज्ज्ञता प्राप्त होणे मुश्कील आहे.

मरिन बायोलॉजिस्टला सागरी विज्ञानाचे ज्ञान प्राप्त असणे आवश्यक आहे, तसेच समुद्रावर आणि महासागरांवर अवलंबून असलेल्या प्राणिजगताच्या गरजा, कामाचे प्राधान्यक्रम याची खडान्खडा माहिती असणे आवश्यक ठरते. त्यासोबत त्यांना अर्थशास्त्राचा, समुद्री कायद्यांचा आणि धोरणांचा गाढा अभ्यास असणे आवश्यक ठरते. यामुळे सागरी प्राणी आणि परिसंस्थांच्या संवर्धनात मरिन बायोलॉजिस्ट मोठी भूमिका बजावू शकतात.  वनस्पतींचे संशोधन, प्राण्यांचे संशोधन आणि पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांद्वारेही ते पर्यावरणातील संवर्धनात सहभाग नोंदवू शकतात.

मरिन कॉन्झर्वेशन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी समुद्रीशास्त्रातील शैक्षणिक अर्हता असावी, तसेच तपशीलवार ज्ञानही हवे. संशोधनाची कौशल्य, माहितीच्या विश्लेषणाची क्षमता असणेही आवश्यक ठरते. समुद्रातील प्राणिजगताचे निरीक्षण करण्यासाठी डायव्हिंग यायला हवे. सागरी जगात धोक्यात आलेल्या प्राणिजातींच्या संवर्धनासाठी पावले उचलता यायला हवी.

इच्छुकांचा वनस्पतीशास्त्राचा, प्राणिशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा अभ्यास हवा. पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर जीवशास्त्र अथवा परिसंस्था विषय शिकणे आवश्यक आहे. संवर्धनाचे लकाम करणाऱ्यांचा पर्यावरणाचा आणि  सागरी कायद्यांचा अभ्यास असणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:05 am

Web Title: marine biology study
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये पीएच.डीसाठी शिष्यवृत्ती
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय
Just Now!
X