राज्यातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा येत्या ७ मे रोजी होईल. या परीक्षेचे स्वरूप यंदा बदलले आहे. परीक्षापद्धतीतील आणि अभ्यासक्रमातील नव्या बदलांची माहिती तसेच विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन-                                                                                                              
यंदा ७ मे रोजी राज्यात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा होईल. या प्रवेश परीक्षेचे स्वरूप यंदा पुन्हा एकवार बदलले  आहे. गेली दोन वष्रे ही परीक्षा ‘नीट’च्या धर्तीवर चुकीच्या उत्तराला गुण वजा करण्याच्या (निगेटिव्ह मार्किंग)  पद्धतीसह होत होती. या वर्षी मात्र तिचे स्वरूप बदलून ही परीक्षा फक्त बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल तसेच या परीक्षेतील ‘निगेटिव्ह मार्किंग’ पद्धत रद्द करण्यात आली आहे. हा बदल विद्यार्थ्यांना सुखावह जरी वाटत असला तरी ही पद्धत रद्द झाल्याने याचा निकालावर होणारा परिणाम पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवा.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असली तरी प्रत्यक्षात मात्र अकरावी-बारावीचा सविस्तर अभ्यास करणे अत्यावश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम परस्परांशी संबंधित असतो. अनेक पाठांचा मूलभूत भाग अकरावीमध्ये अभ्यासाला आहे आणि त्यापुढील भागाचा अभ्यास बारावीत करावा लागतो. अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम  सविस्तर जाणून घेतला तर लक्षात येते की काही धडय़ांची नावे सारखी आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर भौतिकशास्त्र या विषयाचा ‘circular motion’ या नावाचा धडा अकरावी आणि बारावी अशा दोन्ही वर्षांत आहे. अकरावीत या धडय़ाचा अभ्यास गांभीर्याने न केलेला विद्यार्थी प्रवेश परीक्षेतील या घटकावरचा प्रश्न सोडवू शकत नाही. म्हणून अभ्यास करताना तसेच उजळणी करताना विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार करावा.
 या बदलाचा आणखी एक फटका असा बसतो की, महाराष्ट्र वगळता राष्ट्रीय पातळीवरील वैद्यक प्रवेशासाठी होणाऱ्या नीट, एम्स, आम्र्ड फोस्रेस, बीएचयू, सीएमसी  अशा परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थी इतर राज्यांतील मुलांशी स्पर्धाच करू शकत नाहीत. ही समस्या ‘निगेटिव्ह मार्किंग’ पद्धत रद्द केल्यामुळे येते.
प्रा. अनिरुद्ध जाधव यांच्या मते, खरे तर बारावीचे बहुतांश विद्यार्थीही आधी अस्तित्वात असलेल्या अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रवेशपरीक्षा आणि ‘निगेटिव्ह मार्किंग’ पद्धतीसाठी अनुकूल होते. आधीच्या पद्धतीनुसार राज्यातील मुलांचे राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेत पात्र ठरण्याचे प्रमाण नक्की वाढले असते.
‘निगेटिव्ह मार्किंग’ पद्धत रद्द झाल्यामुळे एक मोठा बदल या वर्षांच्या निकालामध्ये दिसून येईल. तो म्हणजे एकाच मार्कावर अनेक विद्यार्थी असतील. अशा वेळेस ‘टाय ब्रेकर’चा वापर करण्यात येतो. या ‘टाय ब्रेकर’मध्ये सर्वप्रथम दोन समान मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या जीवशास्त्र विषयाचे मार्क लक्षात घेतले जातात आणि त्यांची तुलना केली जाते. ज्याचे मार्क जास्त त्याला पुढचा गुणानुक्रमांक (rank)  दिला जातो. त्यानंतर अनुक्रमे रसायनशास्त्र विषयाच्या आणि नंतर दहावीच्या एकूण मार्कावरून ‘टाय ब्रेकर’ ठरवला जातो. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पद्धतीत समान गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त नसते. पण आता चुकीच्या उत्तराला गुण वजा करण्याची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) नसल्याने ही समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावेल. म्हणून सध्याच्या गुणदान पद्धतीत बारावी परीक्षेतील मार्काचे महत्त्व वाढणार आहे. चांगला गुणानुक्रमांक मिळवायचा असेल तर बारावीतही चांगले मार्क मिळवायला हवेत.
बहुपर्यायी प्रश्न सोडवणे आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील वर्णनात्मक दीर्घ व लघुत्तरी प्रश्न लिहिणे यात फरक असतो. आपल्याला शाळेत आधीपासून वर्णनात्मक प्रश्न लिहिण्याची सवय असते, पण प्रवेश परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतात. म्हणूनच हे प्रश्न कमीतकमी वेळेत अचूक सोडविण्याचे तंत्र शिकायला हवे. वैद्यक प्रवेश परीक्षेत १८० मिनिटांत २०० प्रश्न सोडवावे लागतात. साधारणत: या परीक्षेतील ७० ते ८० टक्के प्रश्न  पाठय़पुस्तकावर आधारित असतात. सविस्तर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता येतात. म्हणूनच हे प्रश्न म्हणजे जणू पात्रता फेरीसारखे असतात. यापुढचे १५ ते २० टक्के प्रश्न मात्र थोडे अवघड असतात आणि या प्रश्नांमध्येच खरी चुरस असते. हे प्रश्न नियमित पाठय़पुस्तकांतील नसतात. साधारणत: विचारलेले प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात. अशा प्रश्नांचे उत्तर देता यावे, म्हणून त्या त्या विषयाचे अधिक ज्ञान देणारी पुस्तके वाचणे आवश्यक आहे. उर्वरित पाच टक्के प्रश्न कुणालाच आत्मविश्वासाने सोडवता येत नाहीत. म्हणून पेपर सोडवताना वेळेचे  नियोजन अशा तीन प्रकारच्या प्रश्नांना समोर ठेवूनच
करायला हवे.
साधारणत: प्रत्येक प्रश्न ५० सेकंदांत सोडवावा लागतो. पण ७० ते ८० टक्के सोपे असलेले प्रश्न प्रत्येकी २५ सेकंदांत सुटतात. हे प्रश्न सोडवून उरलेला वेळ १५ ते २० टक्के प्रश्नांना देता येतो. पेपर साधारणपणे तीन
फे ऱ्यांमध्ये सोडवता येतो. पहिली फेरी ७० ते ८० टक्के सोप्या प्रश्नांची असते. ही फेरी शक्यतो पहिल्या २० मिनिटांत पूर्ण व्हायला हवी. त्यानंतरची ४० मिनिटे थोडय़ा अवघड म्हणजे १५ टक्के प्रश्नांसाठी राखून ठेवावीत. हे प्रश्न असे असतात, ज्यात दोन पर्याय बाद ठरतात आणि उर्वरित दोनपकी नेमके उत्तर कुठले याविषयी संभ्रम वाटतो. आता उरलेले १० ते १५ प्रश्न अवघड म्हणजे- तीन पर्यायांपैकी नेमके उत्तर कुठले, अशा प्रकारात मोडणारे असतात. थोडक्यात हे प्रश्न बऱ्यापकी नशिबाच्या जोरावर सोडवावेत, असे असतात. अशा प्रश्नांची संख्या दहापेक्षा अधिक नसते. अशा प्रश्नांसाठी शेवटची
२० मिनिटे राखून ठेवावीत.
परीक्षेच्या आधी अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणे  महत्त्वाचे असते. कारण अभ्यास करताना आपण एका धडय़ावरचे, एकाच प्रकारचे प्रश्न सोडवतो तेव्हा ते सोपे वाटतात. पण असे वेगवेगळ्या धडय़ांवरचे प्रश्न एकत्रित सोडवताना गोंधळ उडतो. वेगवेगळ्या पाठांवरचे प्रश्न सोडविण्याचा मेंदूला सराव व्हावा, म्हणून  महिनाभर दररोज किमान एक प्रश्नपत्रिका तरी विद्यार्थ्यांनी सोडवावी. असा सराव करताना प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील लगेचच आणि अचूक उत्तर येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण बघावे आणि हे प्रमाण वाढवत न्यावे. पेपर सोडवताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सतत एखाद्या धडय़ावरच्या किंवा घटकावरच्या प्रश्नांची आपली उत्तरे चुकत असतात. म्हणून पेपर सोडवताना अशा वारंवार चुकणाऱ्या घटकांची यादी करावी आणि परीक्षेआधी १५ दिवस त्या घटकाचा अधिक अभ्यास करावा. त्या घटकाची जास्त उजळणी करावी.
अभ्यास करताना आणि सराव प्रश्नपत्रिका सोडविताना गेल्या १० वर्षांच्या प्रश्नांच्या ट्रेंडवरून आपल्याला कुठल्या भागावर आणि कुठल्या पद्धतीचे प्रश्न अधिक विचारले जातात याचाही अंदाज येतो. अशा घटकाला ‘high yeild topics’ म्हणतात. या घटकांचा अत्यंत सविस्तर अभ्यास करण्यावर परीक्षेआधीच्या दिवसांमध्ये अधिक भर द्यावा.
बहुपर्यायी प्रश्न सोडवताना काही क्लृप्त्या उपयोगी पडू शकतात. सहसा नंतरचा आणि जास्त माहिती असलेला पर्याय अचूक असतो. कारण तो पर्याय योग्य असण्याकरता परीक्षकाला त्यात जास्त माहिती देऊन  तो अचूक लिहावा लागतो. जेव्हा दोन पर्यायांमधील उत्तराबाबत गोंधळ होतो तेव्हा आपल्या मनात सगळ्यात आधी जे उत्तर येते ते सहसा योग्य असते, कारण आपले सुप्त मन अजाणतेपणी बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. except व following is not, अशा नकारार्थी पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकण्याचा
संभव जास्त असतो, म्हणून अशा
प्रकारचा प्रश्न दोनदा वाचावा आणि तो प्रश्न लक्षपूर्वक सोडवावा. पर्यायांमध्ये All of the above हे उत्तर बरोबर असण्याची शक्यता जास्त असते आणि none of the above  हे उत्तर असण्याची शक्यता
कमी असते.
सरतेशेवटी परीक्षेच्या दिवशी तुमचे मन जितके शांत, तितके तुमची उत्तरे अचूक येण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून परीक्षेच्या दिवशी काहीही अभ्यास न करता शांत राहणे, आदल्या दिवशी आठ तास शांत झोप घेणे आणि पेपर सुरू असताना एक तास झाल्यावर एक मिनीट ब्रेक घेऊन शांत बसणे अशा गोष्टींचा फायदा होतो. चांगला नियमित अभ्यास, आत्मविश्वासाला या सर्व सूचनांची जोड दिल्यास यश तुमचेच आहे.     
amolaannadate@yahoo.co.in