19 February 2020

News Flash

शब्दबोध : मेहनत

मेहनत म्हणजे कष्ट, श्रम याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ शब्दकोशात दिले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

मेहनत म्हणजे कष्ट, श्रम याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ शब्दकोशात दिले आहेत. असं असलं तरी खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थानेही मेहनत हा शब्द वापरला जातो. ‘मेडिकलला प्रवेश मिळवायचा असेल तर फार मेहनत घ्यावी लागते’ किंवा ‘शास्त्रीय संगीतात नाव कमावण्यासाठी गाण्याची मेहनत लागते’, आदी वाक्यांमध्ये मेहनत हा शब्द खूप प्रयत्न किंवा अभ्यास या अर्थाने घेतला जातो.

या शब्दाचा उगम मिहनत या अरबी शब्दातून झाला आहे, असे शब्दकोशात म्हटले आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मते, या शब्दाचा एक वेगळा अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे. हा शब्द मेह आणि नत या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. मेह म्हणजे लघवी करणे, मूत्रनिदान असे अर्थ गीर्वाण लघुकोशात आहेत. नत म्हणजे वाकलेला. जिच्यापुढे मेह रोग नत होतो म्हणजेच ज्याच्यामुळे मेह रोगावर विजय मिळवता येतो ती गोष्ट म्हणजे मेहनत. व्यायामामुळे, कष्टामुळे घाम भरपूर येतो आणि मूत्राचे प्रमाण घटते. म्हणून व्यायाम, कष्ट यांसाठी मेहनत शब्द वापरला जातो, असे या तज्ज्ञांचा सिद्धांत सांगतो. ज्या व्याधीत मेहाचे म्हणजेच लघवीचे प्रमाण भरपूर वाढते त्याला प्रमेह म्हणतात. मधुमेह म्हणजे डायबिटिस. या व्याधीत मूत्राचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले असते. आयुर्वेदातील प्रमेह म्हणजेच मधुमेह. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते आणि मूत्रातही शर्करा असते. जे लोक फारसे कष्ट करत नाहीत, श्रम टाळतात अथवा ज्यांचा व्यवसाय बैठा आहे अशा लोकांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. प्रमेहावर विजय मिळण्यासाठी शारीरिक कष्ट करणे आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीच्या काळी अशा रुग्णांना व्यवसाय बदलण्याचा सल्ला दिला जाई. त्या दृष्टीने गुरे वळणे, शेतीत राबणे अशी कामे योग्य. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही.

‘चराति चरतो भग:’ म्हणजे चालणाऱ्याचे भाग्य उजळते असे एक सुभाषित आहे. हल्ली अनेकांच्या कामाचे  कामाचे स्वरूप बैठे असते. या व्यक्तींना रक्तदाब, स्थौल्य आणि मधुमेह या व्याधींचा त्रास होऊ नये म्हणून व्यायाम किंवा शारीरिक श्रम अर्थात मेहनत करणे गरजेचे असते. असो मेहनत या शब्दाचा अर्थ शोधताना बरीच मेहनत करून झाली आहे!

First Published on August 23, 2019 12:07 am

Web Title: mehanat word sense abn 97
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : स्त्रीप्रश्न आणि महिला सक्षमीकरण
2 यूपीएससीची तयारी : जातवास्तवाचा अभ्यास
3 एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा भूगोलाची तयारी
Just Now!
X