News Flash

एमएचटी- सीईटी : तयारीच्या दोन परस्परविरोधी पद्धती

यंदा २०१६ सालासाठी महाराष्ट्रात अभियांत्रिकीसाठी एमएचटी-सीईटी पुन्हा नव्याने सुरू झाली.

बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेनंतर वैद्यक आणि अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याकरता संबंधित सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये (सीईटी) उत्तम कामगिरी बजावणे आवश्यक ठरते. या प्रवेशपरीक्षांविषयीचे मार्गदर्शन करणारी लेखमालिका..

यंदा २०१६ सालासाठी महाराष्ट्रात अभियांत्रिकीसाठी एमएचटी-सीईटी पुन्हा नव्याने सुरू झाली. गेली दोन वर्षे (२०१४, २०१५ साली) अभियांत्रिकीसाठी स्वतंत्र सीईटी नव्हती. एमएचटी-सीईटी ही गणित, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राची प्रवेश परीक्षा असते, ज्याद्वारे राज्यातील साडेतीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांत ६५ टक्क्यांच्या राज्य कोटय़ाद्वारे चार वर्षांच्या बीई आणि बी.टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

एप्रिल २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या धक्कादायक निर्णयानंतर त्याच वर्षी जून महिन्यात राज्यात घाईघाईने एमएच- सीईटी पहिल्यांदा घेण्यात आली. या सीईटीमुळे २००५ – २०१३ सालादरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षांना असलेले महत्त्व कमी झाले. आता पुन्हा हीच व्यवस्था लागू करण्यात येत आहे.

अभियांत्रिकी शाखेत जाऊ इच्छिणाऱ्या राज्यातील सुमारे २.४ लाख विद्यार्थ्यांना राज्यातील साडेतीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयात दीड लाखांहून अधिक प्रवेश जागा उपलब्ध आहेत. त्यातील दर वर्षी ५० हजार प्रवेश जागा रिक्त राहतात. मात्र, हे  समजून घ्यायला हवं, की महाराष्ट्रातील साडेतीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी जेमतेम ५० महाविद्यालये ‘अ’  श्रेणीची मानली जातात. ज्यामध्ये शैक्षणिक दर्जा, सहविद्यार्थी आणि नोकरीची संधी व पदव्युत्तर अभ्यासासाठी प्रवेश जागा याबाबत समाधानकारक स्थिती असते. त्यामुळे अटीतटीची स्पर्धा ही ‘अ’ श्रेणीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी असते.

आताच्या एमएच- सीईटीमध्ये केवळ बारावीच्या पीसीएम (पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अभ्यासक्रमातील ५७ पाठांचा समावेश आहे. या एमएचटी-सीईटीमध्ये दोन प्रश्नपत्रिका आहेत. त्यातील पेपर १ हा दीड तासांचा असून त्यात पदार्थविज्ञान, रसायनशास्त्रावर १०० मार्काचे ५० प्रश्न विचारले जातात. पेपर २ हा गणिताचा असून तोही दीड तासांचा असतो. त्यात १०० मार्काचे ५० प्रश्न असतात. प्रश्नांचे स्वरूप हे बहुपर्यायी स्वरूपाचे (सिंगल आन्सर मल्टिपल चॉइस क्वेश्चन) असते आणि या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसणारी, एमएचटी-सीईटी ही देशातील एकमेव प्रवेश परीक्षा ठरली आहे.

असे लक्षात येते की, एमएचटी-सीईटीच्या तयारीच्या परिणामकारक अशा दोन मूलभूत पद्धती आहेत. त्या दोन्ही पद्धतींची परस्परांशीच स्पर्धा आहे आणि त्या दोन्ही पद्धतींपैकी कोणती अभ्यासपद्धत अधिक परिणामकारक ठरेल, हे पाहणे २०१६ नंतर स्वारस्यपूर्ण ठरेल.

पहिल्या अभ्यासपद्धतीनुसार, विद्यार्थ्यांने एमएचटी-सीईटीची तयारी अकरावीपासून करावी, ज्यात बारावीच्या अभ्यासक्रमाचा पाया असलेल्या अकरावीतील अभ्यासघटकांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. नंतर, विद्यार्थ्यांना बारावीचा अभ्यासक्रम अभ्यासावा आणि एमएचटी-सीईटीची काठिण्यपातळी लक्षात घेत फॉम्र्युला बेस्ड बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याचा सराव करावा. त्यानंतर क्रॅश कोर्स आणि एमएचटी-सीईटीच्या टेस्ट सीरिजद्वारे विद्यार्थ्यांला परीक्षेला सामोरे जायची रणनीती आणि परीक्षेच्या वेळेचे व्यवस्थापन कौशल्य सुधारता येईल. या पद्धतीनुसार दोन वर्षे सलगपणे विद्यार्थी महाविद्यालयीन परीक्षांवर आणि मुख्यत: एमएचटी-सीईटीच्या ५७ पाठांवर आपले लक्ष केंद्रित करेल. ही दोन वर्षे हा विद्यार्थी जेईई आणि इतर कुठल्याही राष्ट्रीय स्तरावरील इतर कुठल्याही प्रवेशपरीक्षांच्या तयारीकडे लक्ष देणार नाही.

एमएचटी-सीईटीच्या अभ्यासाची दुसरी पद्धत म्हणजे विद्यार्थ्यांने अकरावीपासून जेईईचा अभ्यास करावा आणि अकरावी आणि बारावीचे मिळून ११० पाठ अभ्यासावेत. या पद्धतीनुसार विद्यार्थी अकरावीपासून पहिले १६-१८ महिने प्रत्येक पाठाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्या संकल्पनांचे उपयोजन करण्यावर भर देईल. अशा प्रकारे विद्यार्थी पहिल्या १६ महिन्यांत समस्या निवारणाच्या क्षमतेवर आपले लक्ष केंद्रित करेल. जर विद्यार्थ्यांला जेईई स्तरावरील कुठल्याही पाठावरील प्रश्न सोडवता आले तर तर त्या विद्यार्थ्यांला एमएचटी-सीईटीचा कुठल्याही पाठावरील कुठलाही प्रश्न सोडवता येईल. अशा पद्धतीने सीइटीचा अभ्यास करण्याची ही केंद्रिभूत कल्पना आहे.

मात्र, एमएचटी-सीईटीच्या टेस्ट सीरिजचा सराव करणे गती आणि परीक्षेचे टेम्परामेंट येण्याकरता गरजेचे आहे. म्हणूनच एमएचटी-सीईटी देण्याआधी चार-सहा महिने एमएचटी-सीईटीच्या मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणे आवश्यक ठरते.

२००५ – २०१३ दरम्यान एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळवण्यासाठी या दोन्ही पद्धती उपयुक्त ठरल्या, असे अनेक विद्यार्थ्यांच्या यशोगाथेवरून लक्षात येते. म्हणूनच २०१६ नंतरही या दोन्हीही पद्धती विद्यार्थ्यांना यश मिळवण्याकरता परिणामकारकच ठरतील अशी अपेक्षा करायला वाव आहे आणि म्हणूनच या दोन्ही अभ्यासपद्धतींची परस्परांमधील चुरसही कायम राहील.

मात्र, पहिली अभ्यासपद्धती अनुसरण्याचा एक तोटा आहे- जेईई अथवा राष्ट्रीय स्तरावरील इतर कुठल्याही प्रवेशपरीक्षेच्या तुलनेत एमएचटी-सीईटी ही खूपच सोपी परीक्षा आहे. एमएचटी-सीईटीतील प्रश्न हे माहितीच्या आधारे अथवा फॉम्र्युलावर आधारित आणि म्हणूनच नमुन्यावर आधारित असे असतात. मात्र, जेईईच्या परीक्षेचा लंबक हा ज्ञात संकल्पना ते अज्ञात समस्या असा असतो. चार वर्षांच्या अभियांत्रिकी अथवा त्यानंतरच्या परीक्षांची मूलभूत संकल्पनाही हीच असते. म्हणूनच जेव्हा विद्यार्थी जेईईच्या दुसऱ्या अभ्यासपद्धतीने अभ्यास करतो, तेव्हा अभियांत्रिकीच्या अभ्यासातही त्याला गती प्राप्त होते आणि त्याचा संबंधित विषयाचा पाया भक्कम असतो, मूलभूत संकल्पना सुस्पष्ट असतात. मात्र, जो विद्यार्थी केवळ एमएचटी-सीईटीचा अभ्यास करतो, त्याला चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या वेळेस आटापिटा करावा लागतो किंवा त्याच्या पुढय़ात एटीकेटीसारख्या अभ्यासासंबंधीची आव्हाने उभी राहण्याची शक्यता अधिक असते.

म्हणूनच केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यापुरता अल्पकालीन असा प्रवेशपरीक्षांचा विचार केला, तर दोन्हीही अभ्यासपद्धती परिणामकारक ठरतील. मात्र, दीर्घकालीन दृष्टिकोनातून जेईईच्या पद्धतीनेच अभ्यास करावा, असा विद्यार्थ्यांना माझा सल्ला राहील.

mdurgesh@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2016 1:20 am

Web Title: mht cet preparation of the two different methods
टॅग : Cet
Next Stories
1 नोकरीची संधी
2 ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची- ‘मॅट- २०१६’
3 महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा- २०१६
Just Now!
X