‘ग्रासरूट इनोव्हेटर’ या सदरामध्ये आपण लौकिकार्थाने शास्त्रज्ञ नसलेल्या पण तरीही समाजाच्या गरजा, समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी संशोधन करणाऱ्या तुमच्या-आमच्यातल्या ‘संशोधक’ व्यक्तींचा आणि त्यांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतो.
आज मात्र खरोखरच ‘शास्त्रज्ञ’ असलेल्या एका व्यक्तीची आणि त्याने केलेल्या संशोधनाची ओळख आपण करून घेणार आहोत. यामागचं कारण असं की, या शास्त्रज्ञाने असं एक उपकरण तयार केलं आहे, जे समाजात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या समस्येचं मूळ शोधण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतंय. इतकंच नाही तर ते सर्वसामान्यांना परवडणारं आणि सहजगत्या वापरता येण्याजोगंसुद्धा आहे.
मेरठमध्ये जन्मलेल्या या शास्त्रज्ञाचं नाव आहे, मनु प्रकाश. आय. आय. टी., कानपूर येथून मनु प्रकाश यांनी संगणकशास्त्र अभियांत्रिकी या विषयातून बी. टेक्. ही पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तिथेच पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर स्टॅनफोर्ड वूड्स इन्स्टिटय़ूट फॉर दी एन्व्हायर्न्मेंट या संस्थेमध्ये जैवअभियांत्रिकी या विषयाचे ते साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायला लागले.
लहानपणापासून मनु प्रकाश यांना आगीचं खूप आकर्षण होतं. शाळेला मोठी सुट्टी लागली की, ते आपल्या आजीकडे खेडेगावी जाण्यासाठी आतुर व्हायचे; कारण त्या ठिकाणी त्यांच्या स्वप्नांना पंख फुटायचे. फटाक्यांचे रॉकेट करून उडवण्यात त्यांना खूप मजा वाटायची. आपल्या उपजत गुणांना अनुसरून ते अभियांत्रिकी शाखेकडे वळले.
पारंपरिक खेळण्यांमधून सृजनशील निर्मिती होऊ शकते, यावर मनु प्रकाश यांचा दृढ विश्वास. त्यामुळेच पारंपरिक कठपुतळ्यांच्या खेळापासून प्रेरणा घेऊन त्यांनी रोबो कठपुतळीची निर्मिती केली. या कठपुतळीचं एकस्वसुद्धा त्यांना मिळालं.
संगणक अभियांत्रिकीप्रमाणेच प्रकाश यांनी सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा कशा सुलभतेने पुरवता येतील याविषयी संशोधन करायला सुरुवात केली. उदाहरणच द्यायचं तर नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मलेल्या ‘प्रीमॅच्युअर’ बाळांसाठी ‘पोर्टेबल ट्रान्सपोर्ट इनक्युबेटर’ची निर्मिती त्यांनी केली. या पोर्टेबल ट्रान्सपोर्ट इनक्युबेटरच्या साहाय्याने लहान बाळाला सुरक्षितरीत्या स्थलांतरित करता येतं. ग्रामीण भागामध्ये हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरलं आहे.
दक्षिण आफ्रिका आणि घाना या देशांमधून प्रवास करत असताना पाराविरहित थर्मामीटरची गरज त्यांच्या लक्षात आली. मग मनु प्रकाश यांनी ‘फॅबलॅब’ या संशोधन प्रयोगशाळेच्या मदतीने पाराविरहित थर्मामीटर तयार केले.
मनु प्रकाश यांनी आत्तापर्यंत तयार केलेल्या उपकरणांमध्ये जणू ‘मास्टरपीस’ ठरवा असं एक उपकरण त्यांनी नुकतंच तयार केलं आहे. हे उपकरण म्हणजे एक मायक्रोस्कोप आहे. पण मनु प्रकाश मात्र त्याला ‘फोल्डस्कोप’ असं संबोधतात. यामागचं कारण म्हणजे, कागदाच्या विशिष्ट प्रकारे घडय़ा घालून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करण्याच्या ‘ओरिगामी’ या जपानी कला प्रकारावर आधारित या मायक्रोस्कोपची रचना करण्यात आली आहे. थोडक्यात, मनु प्रकाश यांनी तयार केलेला मायक्रोस्कोप चक्क कागदापासून तयार केलेला आहे.
आíथक निधीअभावी, दळणवळणाच्या असुविधांमुळे सर्वसामान्यांपर्यंत किंवा ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहोचत नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी अतिशय स्वस्त, सहज वापरता येईल असे आणि ने-आण करायला, हाताळायला सोपे पडेल असं उपकरण तयार करायला हवं, हा ‘फोल्डस्कोप’ तयार करण्याचा मूळ उद्देश.
वैद्यकीय क्षेत्रात सध्या वापरले जाणारे मायक्रोस्कोप हे वजनाला अतिशय जड, मोठे आणि वापरायला, ने-आण करायला अडचणीचे ठरणारे आहेत. त्यामुळेच विकसनशील देशांमध्ये असे मायक्रोस्कोप मोठय़ा प्रमाणावर वापरले जात नाहीत, पण मनु प्रकाश आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेला फोल्डस्कोप कागदाचा असल्यामुळे त्याची किंमत आहे अवघी एक डॉलर, म्हणजे सुमारे ६० रुपये आणि वजन आहे केवळ आठ ग्रॅम! या कागदी मायक्रोस्कोपमुळे सूक्ष्म वस्तू तब्बल दोन हजार पट मोठी दिसू शकते. त्यामुळे या मायक्रोस्कोपच्या मदतीने रक्ताच्या नमुन्याचे निरीक्षण करून मलेरिया आणि त्याचबरोबर इतरही अनेक रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म जीवांचं अस्तित्व शोधता येतं.
या फोल्डस्कोपचा प्रमुख घटक अर्थातच कागद हा आहे. त्याशिवाय यामध्ये लहान आकाराचं पण अतिशय जास्त वर्धनीय क्षमतेचं बहिर्वक्र िभग, एक एलईडी दिवा आणि बॅटरी यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या रंगाचे विशिष्ट आकारातले कागदी तुकडे दिलेल्या सूचनेनुसार जुळवले की, फोल्डस्कोप तयार होतो.   
मनु प्रकाश यांच्या या ओरिगामी मायक्रोस्कोपचं मूळ त्यांच्या बालपणात आहे, असं ते सांगतात. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आपल्या भावाच्या तुटलेल्या चष्म्याची िभगं वापरून कागदी नळकांडय़ाच्या मदतीने मायक्रोस्कोप तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. हा प्रयत्न तेव्हा फसला खरा, पण आता तयार झालेल्या ‘फोल्डस्कोप’ची बीजं त्या प्रयत्नामध्ये होती.  
फोल्डस्कोपची यशस्विता आणि उपयुक्तता तपासण्यासाठी जगभरातल्या सुमारे १३० देशांमधल्या १० हजार लोकांना मनु प्रकाश यांनी आपण तयार केलेले फोल्डस्कोप वापरायला दिले आहेत. या सगळ्या लोकांकडून मिळालेल्या मतांवरून या उपकरणात योग्य त्या सुधारणा केल्या जातील आणि मग हे उपकरण प्रत्यक्ष वापरासाठी सर्वदूर उपलब्ध करून दिलं जाईल.
जेव्हा साधनसामग्रीचा तुटवडा असतो, तेव्हाच सृजनशीलतेला खरा वाव मिळतो, असं मनु प्रकाश यांचं म्हणणं आहे. या सृजनशीलतेच्या बळावर वापरायला सोपी आणि अत्यंत स्वस्त अशी उपकरणं त्यांनी तयार केली आहेत. आपल्या देशातल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी या उपकरणांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
स्मार्टफोनचा उपयोग करून आपल्या तोंडाचं स्कॅिनग करू शकेल असं उपकरण विकसित करण्याचे प्रयत्न मनु प्रकाश सध्या करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणाबरोबरच जीवन सुखी करण्यासाठी आणि आनंद मिळण्यासाठी केला पाहिजे, अशी धारणा असलेल्या या संशोधकाला मानाचा मुजरा!     
hemantlagvankar@gmail.com