आज एकीकडे सैन्यदलात कार्यरत राहण्याचा परंपरेने चालत आलेला समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारी नव्या दमाची तरुणाई दिसते तर दुसरीकडे भारतीय सैन्य दलांत उच्च शिक्षणाचे आणि करिअरचे नवनवे, आकर्षक पर्याय उपलब्ध असतानाही सैन्य दलांमधील अधिकारीपदाची सुमारे १३ हजार पदे रिक्त असल्याचे चित्र दिसून येते. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून मांडलेली सद्यस्थिती-
प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कार संपादन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी-
२७ जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा बीमोड करताना वीरमरण पत्करलेल्या कर्नल एम. एन. राय यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस त्यांच्या ११ वर्षांच्या कन्येनं कुटुंबावर कोसळलेल्या या अतीव दु:खाच्या क्षणीदेखील गोरखा रेजिमेन्टला उद्देशून दिलेल्या ‘हो की होयना.. हो.. हो.. हो!’ या युद्धघोषाने सारा देश हेलावला.. हा क्षण प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जितका अभिमानास्पद होता, तितकाच तो काळजाला हात घालणारा होता.. मोठेपणी सन्यात भरती होऊन बाबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा मनोदय या कन्येने व्यक्त केल्याचे वृत्तही वृत्तवाहिन्यांवर झळकले. इतर कुठल्याही पेशापेक्षा अथवा व्यवसायापेक्षाही राष्ट्रप्रेमाचं, देशरक्षणाचं बाळकडू देशाच्या संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या पुढच्या पिढीला अधिक मिळत असतं, यात शंकाच नाही. इतकंच नाही तर संरक्षण दलात कार्यरत असलेल्यांची पुढची पिढीही देशरक्षणाचा वसा पुढे चालवतात. इतर कुठल्याही पेशापेक्षा पिढय़ानपिढय़ा एकाच पेशात असलेल्यांचं प्रमाण संरक्षण दलात लक्षणीय आहे. मात्र, आज पूर्वीपेक्षा तुलनेने करिअरचे अधिक पर्याय उपलब्ध असतानाही सन्याच्या गणवेशाची एक अनिवार ओढ त्यांच्या पुढच्या पिढीतही दिसून येते का, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न-
लहानपणापासूनच लष्करी जीवनातील साहस, शिस्त, असुरक्षितता, नव्या जागी, नव्या लोकांसोबत जुळवून घेण्याची सवय अशा गोष्टींचा परिचय सन्य दलातील पुढच्या पिढीला आपोआप होत असतो. सहकारी जिथे जवळचे नातलग बनलेले असतात, अशा वातावरणात कार्यालयीन माहोल हेच कुटुंब बनलेलं असतं. राष्ट्रप्रेम आणि देशरक्षणाचे संस्कार कळतनकळत रुजले जाऊन त्याचाच परिणाम म्हणजे नवी पिढीही सन्यप्रवेशाबाबत सकारात्मक असते. हे स्वाभाविक आहे हे खरं, मात्र, आज पूर्वीच्या तुलनेत करिअरचे नवनवे आणि आकर्षक पर्याय उपलब्ध असतानाही त्यांची नवी पिढी सन्यातच जाऊ इच्छिते का, या प्रश्नावर लेफ्ट. जनरल (निवृत्त)
डी. बी. शेकटकर यांनी सांगितले, ‘इतर कुठल्याही पेशापेक्षा वडिलांचा वारसा चालवीत सन्याधिकारी होण्याची परंपरा सन्यात निश्चितच अधिक आहे. याचे मुख्य कारण सन्याधिकारी असलेले वडील मुलांचे
‘रोल मॉडेल’ असतात आणि केवळ मुलगेच नाही तर सन्याधिकाऱ्यांच्या मुलीही सन्यात दाखल झाल्याची कित्येक उदाहरणे पाहायला मिळतात. संरक्षण सेवेत दाखल होण्यासाठी जी कठोर प्रवेशप्रक्रिया आहे, त्यात केवळ गुणवत्तेच्या आधारावरच निवड केली जाते, वडील अथवा इतर कुणी नातेवाईक सन्यात आहे म्हणून उमेदवाराला झुकते माप दिले जात नाही. प्रवेशप्रक्रियेचे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर सन्यात दाखल होताना जर त्या उमेदवाराच्या वडिलांनी एखाद्या रेजिमेन्टमध्ये सेवा बजावली असेल, तर तो उमेदवार त्या रेजिमेन्टमध्ये आपल्याला दाखल करून घ्यावं, अशी विनंती करू शकतो, बहुतांश वेळा ही विनंती विचारात घेतली जाते.’   
करिअरची निवड हा आज नव्या पिढीवर लादायचा, थोपवायचा विषय उरलेला नाही. मात्र, आज सन्यात भरती होणं याचा अर्थ केवळ आघाडीवर जाऊन लढणं असा होत नाही. आज जगभरात देशाची सुरक्षा, युद्धनीती ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निश्चित केली जात आहे. आजची संरक्षणव्यवस्था ही तंत्रज्ञानाच्या बळावर उभारली जात आहे आणि हे लक्षात घेत आज भारतीय सन्यात विविध स्वरूपाचे अद्ययावत प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांची आवश्यकता आहे. त्याकरता सन्य दलातर्फे बारावीनंतर सन्य प्रवेशाच्या थेट संधी  (डायरेक्ट एन्ट्री) योजनेमार्फत अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. या माध्यमातून पुणे, महू, सिकंदराबाद या ठिकाणी असणाऱ्या सन्य दलांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते.
समाजातील विविध स्तरांतील उमेदवारांप्रमाणेच सन्याधिकाऱ्यांची पुढची पिढीही तंत्रशिक्षणाद्वारे सन्यप्रवेश करत आहे. गेल्या महिन्यातच गया येथील ऑफिसर्स ट्रेिनग इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल झालेला पुण्याचा ओमकार भोसले हे याचेच उदाहरण. ओमकार हा सन्यात प्रवेश करणारा त्याच्या घरातील पाचव्या पिढीतील प्रतिनिधी आहे. या संदर्भात बोलताना त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल अनिल भोसले यांनी सांगितले, ‘लहानपणापासूनच संरक्षण दलाकडे ओढा असलेल्या ओमकारने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून ‘टेक्निकल एन्ट्री’अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), भूदल तसेच नौदलाच्या प्रवेश परीक्षा दिल्या. या तीनही परीक्षेत निवड झालेल्या ओमकारने भूदलाचा पर्याय निवडला आहे. पहिल्या वर्षी बेसिक मिलिटरी ट्रेिनग घेऊन पुढील चार वष्रे तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेईल. त्यानंतर इन्फन्ट्रीमध्ये दोन वर्षांची अटॅचमेन्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ओमकार भूदलात अधिकारी म्हणून दाखल होईल. त्याच्या उत्तम गुणांच्या जोरावर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्यायही ओमकारपुढे असतानाही त्याचा संरक्षण सेवेकडे कल असण्यामागचे नेमके कारण काय, या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचे वडील अनिल भोसले म्हणाले की, लहानपणापासूनच भोवतालच्या प्रेरक वातावरणाचे गारूड मुलांवर नक्कीच असते. देशसेवेची संधी, आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी, या व्यवसायाचा जाज्वल्य अभिमान आणि या पेशामुळे उंचावणारे जीवनमान या सर्व बाबींमुळे खरे तर प्रत्येक सन्याधिकाऱ्याच्या पुढच्या पिढीला मनातून सन्याधिकारी होण्याची तीव्र इच्छा ही असतेच. मात्र, प्रवेशपरीक्षांची काठिण्यपातळी आणि विविध टप्पे यातून काहीजणच प्रत्यक्ष अधिकारी होऊ शकतात. ओमकार हा त्यापकीच एक.’
सन्यप्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या पुण्यातील ‘अपेक्स अकॅडमी’चे  कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांनी सन्याधिकारी निवड प्रक्रियेबाबत एक सकारात्मक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की, संरक्षण दलात कनिष्ठ श्रेणीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे अधिकारी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. उच्च पदावर विराजमान होण्याची उत्कंठा आणि आकांक्षा या नव्या पिढीत दिसून येते.
गेल्या काही वर्षांपर्यंत असं चित्र होतं की, कोकण अथवा सातारा-कोल्हापूर पट्टय़ातील एखादे गाव असे असायचे, जिथे घरटी एखादी व्यक्ती तरी सन्यात असायची. सन्यात सेवा बजावण्याचा वडिलोपार्जति वारसा त्यांना पुढे चालवायचा असायचा. ही जशी अभिमानाची बाब होती, तशी कर्तव्याची खूणही होती. मात्र त्याचबरोबर कमावण्यासाठी गावाबाहेर पडण्याचा तो एकमेव रस्ता होता. आज मात्र कामाच्या संधी शोधण्यासाठी गावातील नवी पिढी शहरांत, निमशहरी भागांमध्ये स्थलांतरित होताना दिसते आणि त्यामुळेच त्यांच्यापुढे उन्नती साधण्यासाठी संरक्षणात दाखल होणं हा केवळ एकमेव रस्ता उरलेला नाही. याचाच परिणाम म्हणून सन्यात भरती होण्याचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत रोडावलंय- अधिकारी स्तरावरही आणि निम्न स्तरावरही.
साताऱ्यात राज्य सरकारच्या महाराष्ट्र एक्स सíव्हसमन कॉर्पोरेशनतर्फे सन्यात जवान, कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना त्यांच्या मेस्को करिअर अकॅडमीतर्फे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक कर्नल (निवृत्त) दिलीप रानडे यांनी या संदर्भात आपले निरीक्षण नोंदवताना सांगितले की, सन्यभरतीच्या वेळेस आजही ४०० जागांसाठी ४० हजार इच्छुक असतात, त्यामुळे निम्न स्तरावर तरी सन्यप्रवेशाचा ओढा कमी झाला आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, निवडचाचणीत यातील कमीजण तग धरतात. जवान भरतीदरम्यान सन्यातील जवानांच्या मुलांना प्राधान्यक्रम मिळतो. १५ टक्के जागा त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात. त्याला ‘रिलेशन भरती’ असे संबोधले जाते, असेही रानडे यांनी सांगितले.
आज सन्य दलातील विविध अधिकारीपदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असले तरी परीक्षाप्रक्रियेची काठिण्यपातळी लक्षात घेता सन्यात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण तुटपुंजेच आहे. याबाबत टिप्पणी करताना कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर म्हणाले, ‘वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या रेजिमेन्टमध्ये अथवा त्यांच्यासारखाच कार्यक्षम अधिकारी होण्याचे प्रमाण आधीच्या पिढीत अधिक असायचे. आज पूर्वीच्या तुलनेत शहरी, निमशहरी भागात करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे गलेलठ्ठ वेतन आणि सुरक्षितता याकडे नव्या पिढीचा
कल वाढू लागल्याने संरक्षण दलात जायला उत्सुक असणाऱ्या मुलांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांच्या
पुढच्या पिढीतील मुलांची संख्या तुलनेने कमी
झाली आहे.’
‘आज सन्य प्रशिक्षण सक्तीचे करून हा प्रश्न सुटण्याची चिन्हे नाहीत, कारण मुळात युवावर्गाची मानसिकताच तयार झालेली नाही,’ असे सांगताना लेफ्ट. जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर म्हणाले, ‘सन्यात जाऊ इच्छित नाही, कारण उच्च शिक्षण घ्यायचे आहे, अशी सबब आता युवा पिढीला पुढे करता येणार नाही. कारण अभियांत्रिकी शिक्षणाच्या संधीसोबतही आज सन्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली जाते. सिकंदराबाद येथील कॉलेजमध्ये व्यवस्थापनाचा एक वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सन्याधिकाऱ्याला एमबीए पदवी प्रदान केली जाते तर महू येथे वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करून एमफिल पदवी प्राप्त करण्याची संधीही सन्याधिकाऱ्यांना उपलब्ध असते. अशा पदवीमुळे तुमची व्यक्तिगत अर्हताही वाढतेच, त्याचबरोबर केडरमध्ये पदोन्नती मिळतानाही ही पदवी लक्षात घेतली जाते.’
 आज भारतीय सन्य दलांमध्ये अधिकाऱ्यांची सुमारे १३ हजार पदे रिक्त आहेत. देशरक्षण हा कदाचित एकमेव असा पेशा असेल जो आऊटसोर्स करता येणार नाही, हे लक्षात घेतले तर कर्तव्यपूर्तीसोबत मानमरातब, उच्च शिक्षणाच्या संधी, उत्तम जीवनमान देणाऱ्या सन्य अधिकारी होण्यासाठी आजचा युवावर्ग सरसावेलही, मात्र तोपर्यंत देशरक्षणात आज व्यग्र असणाऱ्या पिढीचे उत्तराधिकारी- आपल्याला मिळालेल्या बाळकडूच्या जोरावर सन्यात दाखल होत देशाच्या रक्षणाची आघाडी सांभाळत राहतील.. आपली शौर्यपरंपरा कायम राखतील..    
सुचिता देशपांडे, suchita.deshpande@expressindia.com