जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता पाठय़वृत्ती अशी ओळख संपादन केलेली नाइट सायन्स पाठय़वृत्ती जागतिक दर्जाच्या एमआयटी विद्यापीठातर्फे दिली जाते. एमआयटी विद्यापीठ आणि जेम्स नाइट फाउंडेशनतर्फे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वैद्यक आदी विषयांत उत्कृष्ट पत्रकारिता करत असलेले जगभरातील पत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या पाठय़वृत्तीसाठी २०१६-१७ वर्षांकरता संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाठय़वृत्तीविषयी :

मानवी जीवनाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयांतील नवनवे  संशोधन व तंत्रज्ञान  पत्रकारितेद्वारे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे अशा हेतूने एमआयटी विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग व जेम्स नाइट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम’ १९८३ साली सुरू करण्यात आला.

या पाठय़वृत्तीच्या माध्यमातून जगभरातील निवडक  पत्रकारांना एमआयटी, हार्वर्ड, केंब्रिज व ग्रेटर बोस्टन यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळते. नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम हा एकूण नऊ महिन्यांचा असून यामध्ये दोन सत्रांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होणारा हा कार्यक्रम पुढील वर्षांच्या मे महिन्यापर्यंत चालतो. दर वर्षी संस्थेकडून एकूण दहा पाठय़वृत्ती बहाल केल्या जातात. या पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला

७० हजार डॉलर एवढे विद्यावेतन, इतर विविध भत्ते, संशोधनासाठीची अनुदानित रक्कम तसेच मूलभूत आरोग्य विमा यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतात. पाठय़वृत्तीधारकाने दिलेल्या मर्यादित कालावधीत  अभ्यासक्रम अथवा संशोधन पूर्ण करणे अपेक्षित आहे. पाठय़वृत्तीच्या या संपूर्ण कालावधीदरम्यान पाठय़वृत्तीधारकाला कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक लेखन करता येणार नाही.

आवश्यक अर्हता :

ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पूर्णवेळ पत्रकार असावा. अर्धवेळ पत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. पत्रकारांव्यतिरिक्त लेखक, संपादक, लघु चित्रपट किंवा चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व छायापत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. वर्तमानपत्राव्यतिरिक्त नियतकालिके, दूरदर्शन, नभोवाणी किंवा डिजिटल माध्यमे या इतर माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीदेखील या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्जदार पत्रकारितेच्या ज्या कोणत्याही क्षेत्रात (विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वैद्यक यांपकी एका) कार्यरत असेल, त्या क्षेत्रातील  किमान तीन वर्षांचा अनुभव त्याच्याकडे असावा. अर्जदाराचे चारित्र्य, अनुभव, कल आणि उद्देश हे जागतिक मुद्दय़ांना स्पर्श करणारे असावेत. अर्जदाराने त्याच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र अर्जासोबत जोडावे. या पाठय़वृत्ती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराची पाठय़वृत्ती कार्यक्रमाचा पूर्ण वेळ ऑगस्ट २०१६ ते मे २०१७ पर्यंत बोस्टन किंवा केंब्रिजमध्ये राहण्याची तयारी असावी तसेच पाठय़वृत्तीशी संबंधित सहली, व्याख्याने, कार्यशाळा व आवश्यक प्रशिक्षण सत्र यांमध्ये सहभागी होणे अर्जदारावर बंधनकारक राहील. प्रत्येक अर्जदाराला विज्ञानातील किमान एक विषय अभ्यासावा लागेल तसेच पाठय़वृत्तीच्या कालावधीकरता अर्जदाराला त्याची व्यावसायिक बांधिलकी जपता येणार नाही. पाठय़वृत्ती बहाल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी जे1 व्हिसा मिळवणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया :

या पाठय़वृत्तीसाठी उमेदवाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्ज जमा करताना उमेदवाराने अर्जासोबत त्याच्या पत्रकारितेच्या पाश्र्वभूमीबद्दल लिहावे तसेच नाइट पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल थोडक्यात (एक पानात) माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., शैक्षणिक पाश्र्वभूमी व कार्य अनुभव दर्शवणारा त्याचा बायोडेटा, अर्जदाराची आवड आणि क्षमता यांना न्याय देणारे पत्रकारितेतील त्याच्या उत्कृष्ट कामाचे पाच नमुने, पत्रकाराचे लेखन जर इंग्रजीशिवाय इतर कोणत्या भाषेतून असेल तर त्या नमुन्यांचे भाषांतर, तसेच अर्जदाराच्या पत्रकारितेशी परिचित असलेल्या व पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या तीन व्यक्तींकडून अर्जदाराची शिफारस करणारीपत्रे इत्यादी गोष्टी जोडाव्यात. ही सर्व कागदपत्रे अर्जदाराने पीडीएफ स्वरूपात तयार करावीत.

निवड प्रक्रिया :

या पाठय़वृत्तीसाठी प्रचंड स्पर्धा असते. खरोखरच काहीतरी नावीन्यपूर्ण शिकण्याची आवड आहे अशा अतिशय हुशार व ध्येयवादी उमेदवारांची निवड या पाठय़वृत्तीसाठी केली जाते. अर्जप्रक्रियेची मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जाची छाननी करून योग्य उमेदवार ठरवले जातात व त्यांना त्यांच्या निवडीबद्दल कळवले जाते.

अंतिम मुदत :

या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा :

https://ksj.mit.edu/itsprathamesh@gmail.com