|| श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आधुनिक भारत (१८५७ ते १९४७) या अभ्यास घटकावर २०१३ ते २०१८ दरम्यान विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आकलनात्मक आढावा घेणार आहोत.

Defying the barriers of age, gender and religion, the Indian women became the torch bearer during the struggle for freedom in India. Discuss.

वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर राहिल्या.’ चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी, महिलांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी चळवळींतून घडलेले कार्य, समाजसुधारकांनी बजावलेल्या भूमिका यांचे आकलन असायला हवे. यातून पुढे महिलांमध्ये झालेले प्रबोधन आणि नंतर २०व्या शतकात महत्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढय़ाला व्यापक स्वरूप यावे याकरिता महिलांचा सहभाग वाढविण्यावर दिलेला भर यामुळे महिलांनी मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेला होता. या बाबीचे चर्चात्मक विवेचन उत्तरामध्ये करावे लागेल. वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्यलढय़ात अग्रेसर राहिल्या हे सोदाहरण अधोरखित करावे लागते.

What were the major political, economic and social developments in the world which motivated the anti-colonial struggle in India?

जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आíथक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती? (२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

हा प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी १८व्या, १९व्या आणि २०व्या शतकातील अनुक्रमे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, १९व्या शतकातील युरोपमधील क्रांती यांचा अभ्यास करावा लागेल. तसेच जर्मनी आणि इटली या राष्ट्रांचा उदय आणि जपानचा आधुनिक राष्ट्र म्हणून झालेला उदय, युरोपमधील प्रबोधनामुळे अस्तित्वात आलेली उदारमतवाद आणि साम्यवाद ही आधुनिक विचारधारा शिवाय रशियन राज्यक्रांती इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींचा विचार करावा लागेल. या साऱ्यातून भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला कशी प्रेरणा मिळाली याचे विश्लेषण करणे अभिप्रेत आहे.

It would have been difficult for the Constituent Assembly to complete its historic task of drafting the Constitution for Independent India in just three years, but its experience gained with the Government of India Act, 1935 .Discuss.

स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे हे करता आले. चर्चा करा. (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).

हा प्रश्न समजून घेताना ब्रिटिश शासन काळात संविधान निर्मितीला चालना देणारे कायदे समजून घ्यायला हवेत. तसेच हे कायदे कसे १९३५च्या भारत सरकार कायद्याची पाश्र्वभूमी तयार करणारे होते, हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना १९३५चा भारत सरकार कायदा आणि यातील तरतुदी याचा प्रामुख्याने स्वतंत्र भारताचे संविधान तयार करताना संविधान सभेने विचार केलेला होता. यातील अनेक तरतुदींचा संविधानामध्ये समावेश केलेला होता हे थोडक्यात नमूद करून १९३५चा भारत सरकार कायदा हा संविधान सभेला कशा स्वतंत्र भारताचे संविधान तीन वर्षांमध्ये तयार करण्यासाठी उपयुक्त ठरला हे स्पष्ट करून चर्चा करणे अपेक्षित आहे.

Highlight the differences in the approach of Subhash Chandra Bose and Mahatma Gandhi in the struggle for freedom.

स्वातंत्र्य लढय़ामधील सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर प्रकाश टाका. (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा)

हा प्रश्न समजून घेण्यासाठी सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी या दोघांची विचारधारा नेमकी काय होती हे सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. या दोघांच्या विचारधारेचा तुलनात्मक तक्ता देऊन सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर  चर्चात्मक पद्धतीने प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

The women’s questions arose in modern India as a part of the 19th century social reform movement. What are the major issues and debates concerning women in that period?

आधुनिक भारतात महिलासंबंधी असणारे प्रश्न १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उठविण्यात आलेले होते. त्या काळात महिलांसंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते? (२०१७, १५ गुण आणि २५० शब्दमर्यादा)

१९व्या शतकातील सामजिक सुधारणांचा गाभा हा भारतीय समाजात असणारी अंधश्रद्धा आणि महिलांसंबंधी असणारे सामाजिक प्रश्न होता. ज्यामध्ये महिलांवर असणारी पारंपरिक बंधने, शिक्षणाचा अभाव, सती प्रथा, विधवा महिलांसंबंधी असणारे प्रश्न, इत्यादीचा समावेश होता. तसेच याच्याशी संबंधित वादविवाददेखील भारतीय समाजात चालू होते हे सोदाहरण उत्तरात नमूद करून चर्चा करणे येथे अपेक्षित आहे.

Throw light on the significance of the thoughts of Mahatma Gandhi in the present times.

सद्य:स्थितीमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका. (२०१८, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

या प्रश्नाचे उत्तर लिहिताना महात्मा गांधीजींची विचारधारा थोडक्यात नमूद करून सद्य:स्थितीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची पाश्र्वभूमी देऊन ही विचारधारा कशी महत्त्वाची आहे हे अधोरेखित करून दाखवावे लागते.