फारुक नाईकवाडे

दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. या लेखामध्ये सामायिक अभ्यासक्रमाच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम –

महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक  विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, त्याचे स्रोत आणि स्थलांतरित ठिकाणांवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे पुनर्वसन.

या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल –

*  महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल (रचनात्मक)

*   यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

*   राज्यातील नद्यांचा अभ्यास हा नदी खोऱ्यांचा / प्रणालींचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत तापी पूर्णा खोरे – सातमाळा अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे – हरिशचंद्र बालाघाट डोंगर – भीमा नदी खोरे – शंभू महादेव डोंगर – कृष्णा खोरे.

*  नैसर्गिक संपत्ती

*   महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.

*   महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.

*   भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व.

*  राजकीय

*   प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे याविषयी कोष्टक मांडणी करून टिपणे काढावीत.

*   राज्यातील जिह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

*  लोकसंख्यात्मक भूगोल

* भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

* वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या प्रकारे वसाहत विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय, इ. दृष्टींनी अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.

* झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील ठळक बाबी माहिती असाव्यात. तसेच त्या दृष्टीने अद्ययावत चालू घडामोडीही माहिती असायला हव्यात.

चालू घडामोडींमध्ये खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी. तसेच राज्यातील नैसर्गिक तसेच इतर गंभीर आपत्तींची अद्ययावत माहिती असायला हवी.