रोहिणी शहा

राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील कृषीविषयक घटक हा दोन पेपर्समध्ये विभागलेला आहे. शेतीच्या भौगोलिक, हवामानविषयक बाबी पेपर एकमध्ये भूगोल घटकाबरोबर समाविष्ट केल्या आहेत, तर शेतीतील आर्थिक बाबी आणि अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व या बाबी पेपर चारमध्ये अर्थव्यवस्था या घटकामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या दोन्ही पेपर्समध्ये मिळून या घटकविषयातील अभ्यासक्रमामध्ये झालेल्या सुधारणांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

पेपर एकमधील कृषीविषयक घटक

(घटक क्र. ३)

कृषी परिसंस्था

* परिसंस्थेची रचना, प्रकार आणि वैशिष्टय़े, ऊर्जा प्रवाह तसेच जैवविविधतेचे शाश्वत व्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनातील व्यक्तीची भूमिका हे मुद्दे नव्याने समाविष्ट केलेले आहेत.

* पर्यावरणीय नीतितत्त्वे या घटकामध्ये सगळ्याच प्रकारच्या पर्यावरणीय संकंटांचा होणारा शेती, पशुपाल आणि मत्स्य व्यवसायावरील परिणाम हा मुद्दा नवा आहे. आधी पर्यावरणीय प्रदूषणाचा शेतीवरील परिणाम इतकाच मर्यादित मुद्दा अभ्यासक्रमामध्ये होता. आता या उपघटकाची व्याप्ती समर्पकपणे वाढविलेली आहे.

मृदा

* मृदा एक नैसर्गिक घटक, मृदा अध्यापनशास्त्रआणि भूमिशास्त्रातील मृदाविषयक संकल्पना या मृदेशी संबंधित मूलभूत शास्त्रीय मुद्दय़ांचा समावेश केलेला आहे. मृदेची भौतिक, रासायनिक आणि जैविक वैशिष्टय़े/ गुणधर्म/ रचना हे मुद्दे आधीच्या अभ्यासक्रमात होते. आता त्यांचे सविस्तर आणि मुद्देसूद स्पष्टीकरण नव्या अभ्यासक्रमामध्ये देण्यात आले आहे. त्यातही मृदेच्या सेंद्रिय घटकांवर जास्त भर देण्यात आला आहे. मात्र या घटकांचा मृदेच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम हा मुद्दा आश्चर्यकारकपणे वगळलेला आहे.

* मृदेची धूप हा विषय मागील अभ्यासक्रमात केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. आता हा संदर्भ वगळल्याने एकूणच मृदेची धूप ही संकल्पना आणि देशातील व काही प्रमाणात जगभरातील याबाबतची उदाहरणे अशी अभ्यासाची व्याप्ती असणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती, नॅनो तंत्रज्ञान आणि काटेकोर हे शेतीचे मृदेशी संबंधित प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.

जलव्यवस्थापन

* यामध्ये जिरायती शेती, सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दूषित पाण्याचा परिणाम, सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी हे नवे मुद्दे आहेत.

* पर्जन्यजल आणि भूजल व्यवस्थापन हे मुद्दे आधीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतेच. ते आता जलसंवर्धनाच्या पद्धती या मुद्दय़ामध्ये अभ्यासायचे आहेत.

* आधीच्या अभ्यासक्रमातील हवामान हा उपघटक कृषी घटकातून वगळला आहे. यातील हवामानविषयक मुद्दय़ांचा भूगोल घटकामध्ये समावेश केला आहे. सेंद्रिय  आणि शाश्वत शेती आणि पिकांची पाण्याची गरज हे मुद्दे मृदा आणि जलव्यवस्थापन या उपघटकांमध्ये आहेत. याव्यतिरिक्तचे मुद्दे आश्चर्यकारकपणे वगळलेले आहेत. महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग, त्यांतील पीक प्रारूप, कृषी, उद्योग व घरगुती क्षेत्रातील पाण्याची आवश्यकता, उच्च उत्पादक प्रकारांचा पीक पद्धतीवरील परिणाम आणि लागवडीच्या पद्धती हे आवश्यक आणि समर्पक मुद्दे वगळण्यामागची भूमिका अगम्य आहे. तूर्त तरी अभ्यासातील हे मुद्दे कमी झाले ही उमेदवारांसाठी दिलाशाची गोष्ट म्हणता येईल

पेपर चारमधील कृषीविषयक घटक

(घटक क्र. २.१०)

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व

* राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासकीय धोरणे, सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी, जीएसटी आणि कृषी कर, भारतातील पीक विमा योजना हे नवे मुद्दे आहेत.

* इंग्रजीमध्ये present status & prospectus of international trade agreements in Agriculture (WTO etc.) असा मुद्दा समाविष्ट आहे. त्याचे सुलभ मराठीमध्ये भाषांतर करताना अर्थ बदललेला आहे. त्यामुळे इंग्रजीचा अभ्यासक्रमच पाहावा. यामध्ये शेतीविषयक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. मागील अभ्यासक्रमात (आणि नव्या मराठी अभ्यासक्रमातही!) हे करार केवळ जागतिक व्यापार संघटनेपुरतेच मर्यादित होते. आता हळड इत्यादी असा शब्दप्रयोग करून त्याची व्याप्ती वाढविलेली आहे हे समजून अभ्यास करायला हवा.

ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा

* जुन्या अभ्यासक्रमाशी तुलना केल्यास नवीन अभ्यासक्रमामधील सगळेच मुद्दे नवे वाटू शकतात. मात्र बारकाईने विश्लेषण केल्यावर लक्षात येते की, आता अभ्यासक्रम अभ्यास करण्यासाठी सोपा झाला आहे. विस्कळीतपणा जाऊन मुद्देसूद आणि सुटसुटीत मांडणी करण्यात आली आहे.

* ग्रामीण विकास बँका, कर्जफेडीचे प्रकार, किसान क्रेडिट कार्ड योजना हे नवे मुद्दे आहेत. मात्र कृषी वित्तातील वित्तपुरवठा संस्था, त्यांची आवश्यकता आणि भूमिका आणि भूविकास बँक हे मुद्दे वगळले आहेत.

* कृषी मूल्य आयोग, नाफेड, एनसीडीसी, कृषी विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रीकरण कृषी विपणनामध्ये जोखमीचे प्रकार हे नवे मुद्दे आहेत. मूल्यवर्धित उत्पादने हा आधीच्या अभ्यासक्रमातील मुद्दा अनपेक्षितपणे वगळलेला आहे.