रोहिणी शहा

करोना विषाणूचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झालेला दिसून येत आहे. सन २०२०मध्ये प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा एक तर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा त्या रद्द करण्याचा विचार चालू आहे. भारतीय क्रीडा प्रेक्षकांना आयपीएल स्पर्धेबाबत आणि भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यांबाबत भरपूर माहिती असते आणि त्यात सर्वाधिक रसही असतो. मात्र स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सर्वच खेळांच्या स्पर्धा आणि त्यातील घडामोडी महत्त्वाच्या असतात हे विसरून चालणार नाही. या लेखापासून क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींबाबत चर्चा करण्यात येत आहे. मुळ घटना आणि तिच्याशी संबंधित विचारात घ्यायचे मुद्दे यांवर ही चर्चा करण्यात येईल. सुरुवात फिफा युवा (१७ वर्षांखालील) महिला विश्वचषक स्पर्धेपासून -दिनांक २ ते २१ नोव्हेंबर २०२०मध्ये भारतामध्ये प्रस्तावित फिफा युवा (१७ वर्षांखालील) महिला विश्वचषक स्पर्धा कोविड विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आली. आता ही स्पर्धा २१ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा आयोजक भारत असल्याने या स्पर्धेबाबत जास्तीत जास्त माहिती व मुद्दे नोट्समध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. या स्पर्धेशी  संबंधित परीक्षोपयोगी मुद्दय़ांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

या स्पर्धेचा आयोजक म्हणून भारताची निवड झाल्याची घोषणा १५ मार्च २०१९ रोजी करण्यात आली.

स्पर्धेचे घोषवाक्य — Kick Off The Dream (स्वप्नांची सुरुवात)

स्पर्धेचे बोधचिन्ह — या स्पर्धेचे बोधचिन्ह पश्मिना शाली, कार्पेट्स, बांधणी नक्षी वारली चित्रकला यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आले आहे.

आयोजन – स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन पुढील शहरांमध्ये करण्यात येणार आहे.

*   कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर

*   साल्ट लेक स्टेडियम (विवेकानंद युवा भारती क्रीडांगण), कोलकाता

*   इंदिरा गांधी अ‍ॅथेलेटिक स्टेडियम (सारूसजाई स्टेडियम), गुवाहाटी

*   ईकेए अरीना स्टेडियम, अहमदाबाद

*    डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई</p>

पहिला सामना गुवाहाटी येथे तर अंतिम सामना नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल.

या पाच मैदानांमध्ये प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत साल्ट लेक स्टेडियम (विवेकानंद युवा भारती क्रीडांगण), कोलकाता हे मैदान ८५,००० प्रेक्षक क्षमतेसह सर्वात मोठे मैदान आहे. त्यानंतर डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई ५५,००० हे दोन क्रमांकाचे तर २५,००० प्रेक्षक क्षमतेसह ईकेए अरीना स्टेडियम, अहमदाबाद हे तीन क्रमांकाचे मैदान आहे.

सहभागी संघ –चार गटांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण १६ संघ. भारताचा समावेश अ गटामध्ये आहे.

आशिया, अफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका या खंडांतून प्रत्येकी तीन तर ओशनिया गटातून एक देश असे एकूण १६ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. प्रत्येक खंडाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि पात्र देश निवडण्यासाठी त्या त्या खंडामध्ये पात्रता स्पर्धा आयोजित करण्यात येतात. व त्यातून पात्र संघांची निवड होते.

भारत सन २०२० च्या  विश्वचषक स्पर्धेचा आयोजक असल्याने भारतीय संघ आशिया खंडातून या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

सन २००८पासून भारत पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

फ्रान्स आणि दक्षिण कोरिया हे दोन संघ त्यांना ज्या स्पर्धेत विजेतेपद मिळाले त्याच्या पुढम्ील विश्वचषक स्पर्धेसाठी अपात्र ठरले आहेत.