फारुक नाईकवाडे

या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केल्यानुसार विविध केंद्रीय प्रशासकीय सेवांच्या पदांवरील निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा एकत्रितपणे आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय भरती National Recruitment Agency (NRA) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ऑगस्ट महिन्यामध्ये मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतील प्रशासकीय सेवांमधील गट क आणि गट बमधील अराजपत्रित कर्मचारी तसेच बँकिंग क्षेत्रातील अराजपत्रित कर्मचारी निवडीची प्रक्रिया यामध्ये समाविष्ट आहे. याबाबतच्या परीक्षोपयोगी मुद्द्यांची या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अराजपत्रित पदांसाठी राष्ट्रीय भरती अभिकरणामार्फत (NRA) ही सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाईल. आतापर्यंत विविध भरती यंत्रणांमार्फत होणाऱ्या विविध परीक्षांऐवजी आता दरवर्षी जाहिरात निघालेल्या सरकारी नोकऱ्यांसाठी ही एकच सामाईक पात्रता परीक्षा असेल.

भरती प्रक्रियेची ठळक वैशिष्टय़े :

*      ही सामाईक पात्रता परीक्षा वर्षांतून दोनदा घेण्यात येईल.

*      पदवी, बारावी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असतील, जेणेकरून विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येईल.

*      याआधी केंद्र सरकारमधील पदभरतीच्या सगळ्या परीक्षा केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेतून होत असत. मात्र आता सामाईक पात्रता परीक्षा  प्रमुख १२ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार आहे. किमान पहिल्या टप्प्यावरची परीक्षा स्थानिक भाषेमध्ये घेतली जाण्याचा स्थानिक भाषा माध्यमातून शिकलेल्या उमेदवारांना फायदा होईल.

*      या सामाईक पात्रता परीक्षेअंतर्गत, तीन यंत्रणांमार्फत होणाऱ्या परीक्षा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSB), रेल्वे भरती बोर्ड (RRB)) आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) यांचा समावेश आहे. पुढे, टप्प्याटप्याने आणखी यंत्रणाही यात समाविष्ट केल्या जातील.

*      ही सामाईक पात्रता परीक्षा देशभरातील १,००० केंद्रांवर घेण्यात येईल. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असेल यावर भर देण्यात येईल. विशेषत: देशातील ११७ आकांक्षी जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. यामुळे या परीक्षा देण्यासाठी  ग्रामीण क्षेत्रातील उमेदवारांना विशेषत: महिला उमेदवारांना जाणवणाऱ्या अडचणी कमी होतील.

*      सामाईक पात्रता परीक्षा ही पुढील टप्प्यावरील उमेदवारांची पात्रता निश्चिती करण्यासाठीची चाळणी परीक्षा असेल. थोडक्यात विविध परीक्षांच्या स्वतंत्र पूर्व परीक्षा देण्याऐवजी आता एकच सामाईक पूर्व परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. यामध्ये उत्तीर्ण / पात्र ठरणारे उमेदवार SSB,  RRB किंवा IBPS या निवड मंडळांकडून आयोजित आपल्या आवडीच्या पदावरील भरतीसाठीची परीक्षा देऊ शकतील.

*      सामाईक परीक्षेचा निकाल / गुण तीन वर्षांसाठी ग्रा धरले जातील.

*      ही सामाईक पात्रता परीक्षा कितीही वेळा देता येईल, त्यावर कुठलेही बंधन असणार नाही. मात्र, प्रत्येक पदासाठीच्या अर्हतेनुसार कमाल वयोमर्यादा लागू राहील.

*      ग्रामीण व दुर्गम भागातील उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा प्रणालीची माहिती करून देण्यासाठी माहितीचा प्रसार करण्यात येईल. तसेच चौकशी, तक्रारी नोंदविणे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी २४७ हेल्पलाइन स्थापन करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग हा केंद्र शासनाच्या विविध विभागांतील पदांवरच्या गट अ व गट बमधील राजपत्रित पदांसाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण करतो. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा राज्य शासनाच्या विविध विभागांतील पदांवरच्या गट अ ते गट क वरील पदांवर भरतीची प्रक्रिया पूर्ण करतो. या आयोगांच्या परीक्षांचा राष्ट्रीय भरती अभिकरणाकडून होणाऱ्या परीक्षांमध्ये समावेश नाही.

राष्ट्रीय भरती अभिकरणाची रचना

राष्ट्रीय भरती अभिकरणाची स्थापना संस्था नोंदणी कायद्यांतर्गत करण्यात येईल. केंद्र सरकारमधील सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असतील. या संस्थेत रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय/वित्तसेवा विभाग, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSB), रेल्वे भरती बोर्ड (RRB) आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) या निवड मंडळांचे प्रतिनिधी असतील.

आनुषंगिक मुद्दे

* केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारित माहितीनुसार दरवर्षी साधारणपणे १.२५ लाख सरकारी नोकऱ्यांसाठी, २.५ कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. सध्या, या उमेदवारांना वेगवगेळ्या पदांसाठी असलेल्या विविध भरती यंत्रणांच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी उमेदवारांना वेगवगेळ्या यंत्रणांचे शुल्कही  भरावे लागते आणि अनेकदा परीक्षा देण्यासाठी दूरवर प्रवास देखील करावा लागतो. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे हा त्रास आणि खर्च कमी होईल.

* सर्व संबंधित पदांच्या परीक्षांसाठी असलेल्या पात्रता परीक्षांच्या अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन या सामाईक परीक्षेसाठी एक मानक अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. त्यामुळे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची तयारी करणे कमीत कमी पहिल्या टप्प्यावर तरी टळेल. जेणे करून उमेदवारांना पुढील टप्प्यावरील तयारीसाठी जास्त वेळ मिळू शकेल.

* सामाईक परीक्षेचा निकाल / गुण तीन वर्षांसाठी ग्रा असल्याने उमेदवारांना सामाईक पात्रता परीक्षा ही तीन वर्षांतून एकदाच द्यावी लागेल. आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते पात्रतेनुसार कोणत्याही एका किंवा जास्त भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील. यामुळे भरती प्रक्रियेला लागणारा वेळ मोठय़ा प्रमाणात कमी होईल. आणि पूर्व परीक्षांच्या आयोजनातील खर्चात बचतही होईल.