एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

मागील लेखामध्ये कर साहाय्यक पदाच्या पदनिहाय पेपरचे विश्लेषण पाहिले. या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये घटकनिहाय चर्चा करण्यात येत आहे.

बुद्धिमत्ता चाचणी

बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न हे आकलन आणि भाषिक तर्कक्षमतेवर आधारित असे अहेत. त्यांचे स्वरूप व लांबी पाहता हे दहा प्रश्न सोडविण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो हे लक्षात येते. त्यामुळे कमीतकमी वेळेमध्ये असे प्रश्न सोडवायचे तर सराव हाच एकमेव मार्ग आहे.

  •   निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
  •    बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
  •   घडय़ाळातील काटय़ांचे कोन, आरशातील प्रतिमा, कॅलेंडरमधील लीप इयरचा विचार या बाबी सरावाने सोप्या होतील. दिशांबाबतच्या प्रश्नांमध्ये सरळ सांगितलेल्या मार्गाचे आरेखन करत गेल्यास योग्य उत्तर लवकर सापडते.
  • व्यक्तींच्या माहितीच्या संयोजनावरील प्रश्न सोडविताना कोष्टकामध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर व कॉम्बिनेशन्स सापडतात.
  •   आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणक्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घडय़ाळाच्या काटय़ाच्या किंवा उलटय़ा दिशेने ठरावीक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांच्या बेरीज वा ठरावीक स्थानांवरील घटकांची वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात.
  •   अक्षरमालिका आणि अंकाक्षर मालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका, अंकाक्षर मालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.
  •   सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द आणि त्यांचे संकेत शोधावेत.

मूलभूत गणितीय कौशल्य आणि अंकगणित

  •    संख्यांचे प्रकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, अपूर्णाकांवरील क्रिया, लसावि, मसावि, समीकरणे, बहुपदी, आलेख, शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ- काम- वेग- अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता, क्षेत्रफळ, परिमिती यांवर आधारित प्रश्नांचा यामध्ये समावेश होतो.
  •   पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
  •    शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण हे घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
  •   मूलभूत अंकगणितावरील प्रश्न हे दहावीच्या काठीण्य पातळीचे आहेत. त्यामुळे या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी सरावच महत्त्वाचा ठरतो.

नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना 

  •   राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, तिच्यावरील वेगवेगळ्या विचारसरणींचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव यांचा आढावा घ्यायला हवा. घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.
  •   घटनेतील मूलभूत हक्क, राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये याबाबतची कलमे बारकाईने अभ्यासावीत. प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतींत केंद्र शासन
  • आणि राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवीत. याबाबबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा. विशेषत: चालू घडामोडींच्या संदर्भात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
  •   केंद्र व राज्य शासनाचे अधिकार, काय्रे, कायदा निर्मितीची प्रक्रिया, विधेयके, त्यांचे प्रकार या बाबीही महत्त्वाच्या आहेत.
  •    उच्च व सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.
  •   घटनात्मक पदे, आयोग अभ्यासताना संबंधित कलम, काय्रे, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.
  • घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या माहीत असाव्यात.
  •  घटनेचा अर्थ विशद करणारे तसेच मूलभूत हक्कांबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय आणि याबाबतच्या चालू घडामोडींची माहिती असायला हवी.
  •   राज्य प्रशासनामध्ये मंत्रालयीन कामकाजाची माहिती करून घ्यावी.
  •   ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचा कोष्टक मांडून अभ्यास करता येईल. यामध्ये महसुली, विकासात्मक आणि पोलिस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे.
  •   प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्याव्यात.
  •   शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या- यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार, इ.- बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.
  •    स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. पदाधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, निवडणूक या बाबी समजून घ्याव्यात.
  •  ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवलेले विषय, मूल्यमापनासाठी नेमलेल्या समित्या आणि समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यांचा आढावा घ्यावा.