एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नव्या पॅटर्नप्रमाणे आतापर्यंत केवळ २०१७ मध्येच परीक्षा झाली आहे. त्यामुळे सन २०२०मध्ये या पदासाठीची भरती होण्याची शक्यता आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि त्याबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली. या लेखापासून प्रत्यक्ष तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य अध्ययन घटकामधील सर्व सहा घटकांचे मिळून ५० प्रश्न विचारले असले तरी प्रत्येक वेळी प्रत्येक उपघटकावरील प्रश्नसंख्या तितकीच राहील असे दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही उपघटकावर जास्तीत जास्त १० प्रश्न विचारले जातील असे गृहीत धरून तयारी करावी लागेल. या लेखामध्ये सामाजिक, आर्थिक सुधारणा आणि इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

 

सामाजिक आणि आर्थिक सुधारणा

  •     देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते. – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे, महत्त्वाचे लिखाण, भाषणे, घोषणा, प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान, महत्त्वाच्या घटना (कालानुक्रमे), काय्रे, असल्यास लोकापवाद.
  •      यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा. विशेषत: अभ्यासक्रमात नमूद संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्य लढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम समाज सुधारणा
  •       रेल्वे, टपाल, उद्योगधंदे इ. बाबींचा विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पाश्र्वभूमी, संबंधित राज्यकत्रे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास.
  •      स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय उद्योगांची सुरुवात याबाबत माहिती करून घ्यावी.
  •   वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीद वाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करावा. यामध्ये सामाजिक संघटनांची मुखपत्रे महत्त्वाची आहेत.
  •     सामाजिक सुधारणा चळवळींचा अभ्यास, पाश्र्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
  •      ब्रिटिशांची आर्थिक नीती, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि संबंधित भारतीय नेत्यांची प्रतिक्रिया या गोष्टी समजून घ्याव्यात.
  •   जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण आणि त्याचे टप्पे, त्यांमागची पाश्र्वभूमी, त्यांचे सामाजिक, आर्थिक परिणाम हे मुद्दे विश्लेषण करून समजून घ्यावेत. याबाबत उद्योग व भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटकांवर झालेला, होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.
  •  आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे सिद्धांत, भारताचे इतर देशांशी असलेले व्यापारी करार, भारत सदस्य असलेले प्रादेशिक व्यापारी करार तसेच महत्त्वाचे प्रादेशिक व्यापारी करार व त्यातील सदस्य देश यांचा अद्ययावत अभ्यास आवश्यक आहे. जागतिक बँक गटातील वित्तीय संस्था त्यांची रचना, काय्रे, महत्त्वाचे अद्ययावत निर्णय व त्याबाबत भारताची भूमिका अशा आयामांच्या आधारे अभ्यासाव्यात.

 

इतिहास

  •     ब्रिटिशांची आर्थिक नीती, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया या गोष्टी समजून घ्याव्यात.
  •   शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल. कारणे/पाश्र्वभूमी, स्वरूप/विस्तार/वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम, उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या/ समकालीनांच्या प्रतिक्रिया. शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता  इ.च्या चळवळी/बंड यांचाही अभ्यास याच मुद्दय़ांच्या आधाराने करावा.
  •   भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्दयांच्या आधारे करावा. स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पाश्र्वभूमी आणि  त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडांतील मागण्या (तौलनिक पद्धतीने), दोन्ही कालखंडातील महत्त्वाचे नेते व त्यांची वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय.
  •     गांधीयुगातील विविध चळवळी (असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ.) अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप आणि त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा.
  • या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आणि यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे कोष्टकामध्ये मांडून अभ्यासता येतील.
  •      स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास पाश्र्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाइसरॉय, भारतमंत्री या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
  •   स्वातंत्र्योत्तर इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम आणि उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीरच्या बाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे.
  •     भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत अभ्यासाव्यात. आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, राष्ट्रीय गरज, कारणे, स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल, त्यांची कारणे, अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, मूल्यमापन हे मुद्दे पहावेत.
  •   भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी विशेषत: संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करायच्या प्रदेशाबाबतीतील शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासावा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचार प्रवाह, राजकीय पक्ष आणि त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.