01 April 2020

News Flash

तर्कक्षमतेचा कस 

राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये बुद्धिमापनविषयक घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या सन २०१७मध्ये झालेल्या पेपरच्या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये बुद्धिमापनविषयक घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र गट क सेवेसाठी असलेल्या या परीक्षेतील बुद्धिमापनविषयक प्रश्नांची काठिण्य पातळी हे तुलना करायची झाल्यास राज्यसेवा परीक्षा किंवा बँक, पी.ओ. परीक्षेइतकी असल्याचे लक्षात येते. तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

 •    एकूणच या घटकातील प्रश्न हे जास्त लांबीचे त्यामुळे वेळखाऊ असे आहेत.
 •     अभाषिक तार्किक क्षमतेमध्येही थोडेसे अपारंपरिक असेच प्रश्न विचारण्यावर भर दिलेला दिसून येतो.
 •    अंकगणितावर आधारित काळ- काम- वेग, गुणोत्तर, नफा, तोटा किंवा आकृत्यांमधील गणिती प्रक्रिया अशा पारंपरिक प्रश्नांची संख्या कमी आहे. मात्र त्रिकोणमिती, क्षेत्रमिती आणि संख्यामालिका हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
 •   भाषिक व अभाषिक तर्कक्षमतेचे एकत्र उपयोजन करावे लागेल अशा प्रकारचे permutation / combination चे प्रश्नही विचारलेले दिसतात.
 •   भाषिक तर्कक्षमतेवरील प्रश्नांमध्ये वैविध्य आहे. व्यक्ती व त्यांच्या वैशिष्टय़ांचे संयोजन, विधानांवरून अनुमान, निष्कर्ष, तर्कक्षमता (Syllogism) यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे.

अभाषिक तर्कक्षमता

या घटकावर ३० पकी १० प्रश्न विचारलेले आहेत.

 •    पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर त्रिकोणमिती, क्षेत्रमिती आणि संख्यामालिका कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
 •    आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घडय़ाळाच्या काटय़ाच्या किंवा उलटय़ा दिशेने ठराविक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांच्या बेरीज वा ठरावीक स्थांनावरील घटकांची वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात.
 •  दिलेल्या कागदाच्या घडय़ा आणि त्यावर काढलेल्या आकृत्या किंवा तो कागद कापून बनविलेले आकार यांवर आधारित प्रश्नांमध्ये बरीच कसोटी लागते. यामध्ये प्रत्येक घडीबरोबर आकृत्यांचे बदलणारे स्थान, दिशा किंवा स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरशातील प्रतिमांची जाण असेल तर असे प्रश्न जास्त आत्मविश्वासाने सोडविता येतात.

    भाषिक तर्कक्षमता

 •  निष्कर्ष पद्धतीमध्ये (Syllogism) दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
 •     बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
 •   वय, उंची, वजन, गुण अशा बाबींच्या तुलनेचे प्रश्न सोडवताना प्रत्येक वाक्यातील तुलनेची आकृती एकमेकांच्या शेजारी काढत     गेल्यास उत्तर लवकर सापडते.
 •   व्यक्तींच्या माहितीच्या संयोजनावरील प्रश्न सोडविताना कोष्टकामध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर आणि कॉम्बिनेशन्स सापडतात. मागील वर्षीच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या यंत्रांची कार्यक्षमता आणि किंमत यांच्या संयोजनावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव खूप महत्वाचा ठरतो.
 •   सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.

भाषिक तर्कक्षमता ही त्या भाषेचे ज्ञान आणि आकलन यावर पुष्कळ प्रमाणात अवलंबून असते. दिलेल्या विधान / उताऱ्याच्या आधारे निष्कर्ष / अनुमान काढणे, त्यांना पाठबळ देणारे युक्तीवाद किंवा त्यांच्यामागील गृहीतके शोधणे अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी भाषेची किमान जाण असणे आणि लक्षपूर्वक वाचनाची सवय महत्त्वाची आहे. यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला प्रश्न पाहू

‘गर्भिलगनिदान विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.’ या प्रतिपादनाला तर्कसंगत व कायदेशीर पाठबळ देणारा युक्तिवाद निवडायचा आहे.

१) एखाद्याला बहीण, सून व पत्नी कोठून मिळेल?

२) गर्भामध्ये काही विकृती असल्याखेरीज कोणत्याही स्त्रीला गर्भपाताची परवानगी दिली जाऊ नये.

३) शासनाच्या आरोग्य सेवामार्फत प्रत्येक स्त्रीला सुरक्षित गर्भपात सुविधा मिळणे हा तिचा हक्क आहे.

४) गर्भपात हा स्त्रीचा हक्क असायला हवा.

वरील चारही विधानांमध्ये गर्भपाताबाबत काही युक्तिवाद केलेले आहेत. चारही विधाने तर्कसंगत आणि कायदेशीरदृष्टय़ा योग्य आहेत. मात्र दिलेल्या प्रतिपादनामध्ये गर्भिलगनिदान विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा मुद्दा असला तरी प्रत्यक्षपणे कुठेही गर्भपाताचा उल्लेख नाही. अशा वेळी दोन विधानांतील परस्परसंबंध हे आकलनाशिवाय प्रस्थापित करणे शक्य नाही. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या करण्यासाठी गर्भिलगनिदान केले जाते हे समजून घेतल्यास त्या प्रतिपादनासाठीचा युक्तिवाद शोधणे सोपे होते. मग २, ३ आणि ४ क्रमांकाच्या पर्यायांमध्ये कोठेही गर्भिलगनिदानाशी संबंधित मुद्दा नाही हे लक्षात येते. आणि पर्याय १ हा तर सरळसरळ जीवनातील महिलांचे महत्त्व सांगणारा आणि म्हणून स्त्रीभ्रूण हत्येचा व त्यासाठी गर्भिलगनिदान करण्यास विरोध अप्रत्यक्षपणे मांडतो.  यासाठी दिलेल्या विधानांचा, पर्यायांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवून प्रश्नाचे वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:44 am

Web Title: mpsc exam preparation akp 94 14
Next Stories
1 आर्थिक विकास १९९१च्या आर्थिक सुधारणा
2 ऑस्ट्रेलियातील संशोधन केंद्र  युनिव्हर्सटिी ऑफ न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया 
3 आर्थिक विकास : औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि संबंधित मुद्दे
Just Now!
X