एमपीएससी मंत्र : श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण भारत सरकारद्वारे प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारा भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि सादर केला जाणारा केंद्रीय अर्थसंकल्प यांची परीक्षेच्या दृष्टीने असणारी उपयुक्तता यावर चर्चा करणार आहोत. सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकासाठी हे दस्तावेज महत्त्वपूर्ण अभ्यास साहित्य आहे.

आर्थिक पाहणी अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे दोन्ही दस्तावेज हे भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे, सरकारने आखलेली धोरणे तसेच प्रस्तावित क्षेत्रनिहाय खर्चाचे नियोजन, सरकारने साध्य केलेली ध्येये आणि संबंधित आकडेवारी तसेच नवीन आखलेली धोरणे, योजना याची माहिती यामध्ये असते.

आर्थिक पाहणी अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प यावर आजपर्यंत विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न.

  केंद्रीय अर्थसंकल्पावर विचारण्यात आलेले प्रश्न.

२०१७-१८ मधील केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या उद्देशांपकी एक उद्देश ‘भारताला उर्जावान बनविणे, देश स्वच्छ बनविणे आणि देशाचा कायापालट करणे’ आहे. हा उद्देश्य  साध्य करण्यासाठी २०१७-१८च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या उपायांचे विश्लेषण करा. (२०१७).

–  या प्रश्नाचे उत्तर लिहिताना २०१७-१८ मधील केंद्रीय अर्थसंकल्पात हा उद्देश्य साध्य करण्यासाठी प्रस्तावित केलेले उपाय काय आहेत आणि या उपायांमुळे भारताचा कायापालट करणे, ऊर्जावान बनविणे आणि देशाला स्वच्छ बनविणे’ या उद्देश्याची पूर्तता कशी होईल या अनुषंगाने विश्लेषणात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित होते.

२०१८-१९ मधील केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long-term Capital Gains Tax-LCGT) आणि लाभांश वितरण कर ((Dividend Distribution Tax-DDT) या संबंधित सादर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर भाष्य करा. (२०१८)

– या प्रश्नाचे उत्तर लिहिताना या दोन्ही करांची २०१८ पूर्वीची स्थिती आणि २०१८-१९च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेले बदल याचा एक तुलनात्मक तक्ता देऊन यावर भाष्य करणे गरजेचे होते. ज्यामधून यामुळे नेमका कोणता फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे, हे अधोरेखित होईल.

 

आर्थिक पाहणी अहवाल

भारताच्या आर्थिक पाहणी अहवालावर जरी थेट प्रश्न विचारण्यात आलेले नसले तरी यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती विस्तृत पद्धतीने दिलेली असते. अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आखली गेलेली ध्येयधोरणे, आकडेवारी, असणारी आव्हाने, करण्यात आलेल्या उपाययोजना इत्यादी विषयी चर्चा केलेली असते.

२०१८-१९च्या भारताच्या आर्थिक पाहणी अहवालातील खंड दोन मधील पहिले प्रकरण २०१८-१९मधील भारताच्या आर्थिक कामगिरीचे अवलोकन’ हे आहे, ज्यामध्ये २०१८-१९ मधील स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वृद्धी, स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि याचे घटक, बचत आणि गुंतवणूक, सार्वजनिक वित्त, किंमती आणि मौद्रिक व्यवस्थापन, परकीय व्यापार, २०१९-२० साठी वृद्धीची शक्यता, क्षेत्रनिहाय विकास (Sectoral Developments) यामध्ये कृषी आणि कृषी संबंधित संलग्न क्षेत्रे, औद्योगिक, कॉर्पोरेट आणि पायाभूत सुविधा कामगिरी, सेवा क्षेत्र, सामाजिक सोयी-सुविधा याची माहिती आहे. तसेच शाश्वत विकास, ऊर्जा आणि हवामान बदल याचीही माहिती आहे. एकंदरीत हे प्रकरण संक्षिप्त स्वरूपात संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे, यावर भाष्य करते.

खंड दोनमधील इतर प्रकरणांमध्ये उपरोक्त नमूद घटकांवर स्वतंत्र प्रकरणे देऊन सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. खंड एकमध्ये सरकारच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील  धोरणात्मक नीतीचे अवलोकन केलेले आहे. खंड दोनला परिशिष्टे जोडून अर्थव्यवस्थेविषयीची आकडेवारी देण्यात आलेली आहे.

किमान आधारभूत किंमत (MSP) यामुळे तुम्हाला काय समजते? किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे कमी उत्पन्न जाळ्यातून (low income trap) वाचवू शकते. (२०१८)

अलीकडे जागतिक व्यापारामधील संरक्षणवाद आणि चलन हाताळणीच्या घटना भारतातील स्थूल आर्थिक स्थिरतेला ((macroeconomic stability of India))  कशा प्रकारे प्रभावित करत आहेत? (२०१८)

अशा अप्रत्यक्ष करांची गणना करा जे भारताच्या वस्तू आणि सेवा कर (GST) यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. भारतात जुलै २०१७पासून कार्यान्वित असणाऱ्या जी. एस. टी. च्या महसुली परिणामांवरही भाष्य करा. (२०१९)

तुम्ही या मताशी सहमत आहात का की, स्थिर सकल देशांतर्गत उत्पादनातील (GDP) वृद्धी आणि कमी चलनवाढ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चांगल्या स्थितीमध्ये ठेवलेले आहे? तुमच्या युक्तिवादाच्या समर्थनासाठी कारणे द्या. (२०१९)

भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाचे वाचन आणि आकलन केल्याखेरीज आर्थिक विकास या घटकावरील प्रश्न सोडविता येत नाहीत. बाजारामध्ये भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाचे संक्षिप्त संकलन केलेली अनेक पुस्तके उपलब्ध असतात. मात्र सरकारने प्रकाशित केलेला भारताचा आर्थिक पाहणी अहवाल जसा आहे तसाच वाचण्यावर भर देणे अधिक उपयुक्त ठरते. त्याचबरोबर हा अहवाल इतर पेपर्ससाठीही उपयोगी ठरू शकतो. उदा. निबंधाचा पेपर.

यापुढील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर तीनमधील तंत्रज्ञान या घटकावर चर्चा करू. या घटकावर गतवर्षीय मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाबरोबरच या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.