एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा सन २०१९मध्ये आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र त्यापूर्वी ही परीक्षा नियमितपणे आयोजित झाल्याचे दिसते. त्यामुळे सन २०२०मध्ये ही परीक्षा आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण व त्याआधारे तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येईल. सन २०१७मध्ये नवीन पॅटर्न लागू झाल्यानंतर दोन वर्षे परीक्षा घेण्यात आली आहे. या प्रश्नपत्रिकांमधील मराठी घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे. या दोन वर्षांतील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

(या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.)

  प्रश्न १. पुढीलपकी कोणता शब्द तत्सम नाही ते ओळखा.

१) गुरू                    २) पिता

३) कन्या                  ४) भाऊ

 

 प्रश्न २. खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील कोणती आहे?

‘राग अनावर झाला की, मनुष्य तो कोणावर तरी काढत असतो.’

१) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?

२) मांजराने दूध पाहिले, पण बडगा नाही पाहिला.

३) मांजरीचे दात तिच्या पिल्लास कधीच लागत नाहीत.

४) मांजर कावरते, खांबाला ओरबाडते.

  प्रश्न ३. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द, सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे, ते ओळखा.    तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही.

१) संबंधी सर्वनाम

२) अनिश्चित सर्वनाम

३) पुरुषवाचक सर्वनाम

४) दर्शक सर्वनाम

प्रश्न ४.

अ) अ-कारांत विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.

ब) विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते.

पर्यायी उत्तरे

१) फक्त अ बरोबर                         २) फक्त ब बरोबर

३) अ आणि ब बरोबर                    ४) अ आणि ब चूक

 

   प्रश्न ५. पुढील वाक्यांचे एका केवल वाक्यात रूपांतर करा.

अ. हा श्रीमंताचा पोर आहे.

ब. तो आहे खुळा.

क. आमची स्थिती तशीच आहे.

पर्यायी उत्तरे

१) हा श्रीमंताचा पोर खुळा आहे म्हणून आमची स्थिती तशीच आहे.

२) आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखीच आहे.

३) आमची स्थिती तशीच आहे, कारण श्रीमंताचा पोर खुळा आहे.

४) श्रीमंताचा पोर खुळा असल्यामुळे आमची स्थिती तशी आहे.

 प्रश्न ६. योग्य क्रम लावा.

अ. कान फुंकणे  (i) याचना करणे

ब. राम नसणे      (ii) म्हातारपण

क. पिकले पान  (iii)चुगली करणे

ड. हात पसरणे    (iv) अर्थ नसणे

पर्यायी उत्तरे

१) अ-iv,, ब-i, क- ii ड-iii

२) अ- iii, ब-i, क-iv, ड -ii

३) अ-   ii, ब-i, क-iv, ड-iii

४) अ- iii, ब- iv, क- ii , ड-i

वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या विश्लेषणावरून पुढील गोष्टी लक्षात येतात.

सन २०१७मध्ये सर्व १५ प्रश्न हे थेट (Straight forward) होते तर सन २०१८मध्ये बहुविधानी प्रश्नांची संख्या वाढली आहे.

भाषाविषयक आकलनावरील प्रश्नांचा विचार करता २०१७ मध्ये ५ तर २०१८ मध्ये ६ प्रश्न विचारलेले आहेत. सन २०१७मध्ये सर्व आकलनाचे प्रश्न हे म्हणी व वाक्प्रचार यांवर आधारीत होते. सर्वसामान्य शब्दसंग्रहावर एकही प्रश्न विचारलेला नव्हता. तर सन २०१८मध्ये म्हणी व वाक्प्रचार आणि सर्वसामान्य शब्दसंग्रहावर (समानार्थी शब्द किंवा शब्दार्थ अशा स्वरूपात) प्रत्येकी तीन प्रश्न विचारलेले आहेत.

अभ्यासक्रमामध्ये उताऱ्यावरील प्रश्नांचा उल्लेख असला तरी दोन्ही वर्षी या घटकाचा समावेश प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला नाही. मात्र कोणत्याही घटकावरील प्रश्नांची संख्या आयोगाने निश्चित ठेवलेली नाही. हे पाहता या घटकाचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटकाचा सराव करणे टाळू नये.

वाक्यरचना हा व्याकरणाचाच भाग असला तरीही अभ्यासक्रमामध्ये वाक्यरचना आणि व्याकरण यांचा वेगवेगळा उल्लेख केलेला आहे.

वाक्यरचनेवर दोन ते तीन प्रश्न विचारलेले दिसून येतात. काळ, प्रयोग आणि वाक्याचे प्रकार हे तीन घटक वाक्यरचनेवरील प्रश्नांसाठी विचारात घेता येतील.

व्याकरणावर ६ ते ७ प्रश्न विचारलेले दिसून येतात. शब्दांच्या जाती, विभक्ती, वचन, िलग, सामान्य रूपे, शब्दांचे प्रकार इत्यादी घटकांचा व्याकरणामध्ये विचार करता येईल.

अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे प्रश्नांची काठिण्य पातळी ही शालांत (दहावी) परीक्षेच्या स्तराची आहे. त्यामुळे १५ पकी किमान १० ते १२ गुण मिळविणे हे उद्दिष्ट ठेवायला हरकत नाही. या विश्लेषणाच्या आधारे मराठी भाषा घटकाची तयारी कशी करावी याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.