02 June 2020

News Flash

गट क सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी टी. एच. हक्स्ली आणि जॉन टिंडल यांनी अकार्बनी पदार्थापासून जीवोत्पत्ती शक्य आहे असे मत व्यक्त केले होते,

|| प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

गट क सेवा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर म्हणजेच पेपर एक ६ तारखेला होत आहे. या पेपरमधील मराठी भाषेच्या उताऱ्यावरील प्रश्नांच्या सरावासाठी या लेखामध्ये उतारा आणि प्रश्न देण्यात येत आहेत.

सर्वच सजीव जगाच्या आरंभी सध्या आहेत तसे परमेश्वराने आपल्या अलौकिक सामर्थ्यांने उत्पन्न केले असावेत अशी विचारसरणी अनेक धर्मात प्रकट केली असली, तरी त्याबाबत वैज्ञानिक संशोधन शक्य नसल्याने वैज्ञानिक विवेचनात त्याला महत्त्व किंवा स्थान राहू शकत नाही. याबाबत चार्ल्स डार्वनि यांचे कार्य नमूद करण्यासारखे आहे. विद्यमान जीवोत्पत्ती परमेश्वराने केली नसून सर्व सजीव जैव क्रमविकासाने अवतरले आहेत, या त्यांच्या विधानाविरोधात धर्ममरतडांकडून त्यांना विरोध तर झालाच, शिवाय त्यांचा छळही झाला; पण शेवटी डार्वनि यांचीच विचारसरणी ग्राह्य ठरली.

अवकाशातून एखाद्या उल्केद्वारे प्रजोत्पादक सूक्ष्म कोशिका किंवा तत्सम सजीवाची  एखादी स्थिर अवस्था प्रथम पृथ्वीवर आली असावी किंवा सूर्यप्रकाशाच्या दाबाने आणली गेली असावी व त्यापासून पुढे जीवनिर्मिती झाली असावी, अशी एक विचारसरणी १९०३ मध्ये एस. अरहेनियस यांनी मांडली होती. ती खरी मानली, तर सजीवाला उत्पत्ती नसून इतर काही द्रव्यांप्रमाणे तो चिरकालिक आहे असे मानणे भाग आहे. किरणोत्सर्गी (भेदक कण किंवा किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्यांची उत्पत्ती पाच ते बारा अब्ज वर्षांपूर्वी झाली असून ती सर्वकाल अस्तित्वात नव्हती ही गोष्ट जर खरी असेल, तर सजीव सर्वकाल होते यावर विश्वास बसणे कठीण आहे. बाह्य अवकाशात एका ग्रहावरून दुसऱ्यावर लाखो किलोमीटरांचा प्रवास करून जाण्यास लागणारा काळ व त्यानंतर शेवटी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणे यांमध्ये असणारे धोके यांचा विचार केल्यास ज्ञात सजीवांपकी कोणालाही ते शक्य झाले असण्याचा संभव नाही; त्या प्रक्रियेत तो सजीव नाश पावणेच अधिक शक्य आहे, म्हणून अरहेनियस यांची उपपत्ती स्वीकारण्यात आलेली नाही. तिसरी एक विचारसरणी अशी आहे की, पूर्वी अस्तित्वात असलेल्या अकार्बनी (नििरद्रिय) द्रव्यांपासून पहिला सजीव आकस्मिकरीत्या (यदृच्छया) बनला असावा. अर्थात पुढे काही काळ त्याला आसमंतातील अकार्बनी पदार्थावरच पोषण करावे लागून त्याची वाढ झाली असली पाहिजे हे क्रमप्राप्त आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून पाच अब्ज वर्षांमध्ये अकार्बनी संयुगापासून एका झटक्यात कोशिकेची निर्मिती होणे असंभवनीय वाटते, कारण अत्यंत साध्या सूक्ष्मजंतूचेदेखील संघटन अत्यंत जटिल असते.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी टी. एच. हक्स्ली आणि जॉन टिंडल यांनी अकार्बनी पदार्थापासून जीवोत्पत्ती शक्य आहे असे मत व्यक्त केले होते, तथापि त्याच्या तपशिलाबाबत त्यांच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या. जीवोत्पत्तीचा उलगडा होण्यास नवीन जीवरसायनशास्त्राची मदत होऊ शकेल, हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर एफ. गोलँड हॉफकिन्स यांनी दाखविले. त्यानंतर ज्यांनी या समस्येसंबंधी आपली  विचारसरणी पुढे मांडली त्यांमध्ये रशियन शास्त्रज्ञ ए. आय. ओपॅरिन आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ जे. बी. एस. हॉल्डेन यांचा उल्लेख करता येईल. या दोघांचे म्हणणे असे की, सजीवांनीच उत्पन्न केलेल्या नव्या परिस्थितीमुळे पहिल्या सजीवाच्या वेळेची परिस्थिती नाहीशी झाली व त्यामुळे कार्बनी (सेंद्रिय, जैव) पदार्थापासून सजीवांची उत्पत्ती होणे आता अशक्य आहे.

 

प्रश्न १ – उताऱ्यातील पहिल्या विधानातून पुढीलपकी कोणता/ ते निष्कर्ष काढता येतील?

अ. वैज्ञानिक विवेचन हे संशोधनाच्या आधारावर केले जाते.

ब. परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्यांबाबत वैज्ञानिक संशोधन शक्य नाही.

क. सजीवांच्या उत्पत्तीबाबतच्या धार्मिक विचारसारणीचे वैज्ञानिक संशोधन आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे

१)  अ आणि ब    २) अ, ब आणि क

३) केवळ अ        ४) केवळ क

 

प्रश्न २ – सजीवांच्या उत्पत्तीबाबत सुष्पष्ट विचारसारणी किंवा सिद्धांत पुढीलपकी कोणी मांडले आहेत असे गृहीत धरता येणार नाही?

अ.      ए.आय.ओपॅरीन

ब.      एफ गोलँड हॉफकिन्स

क.      एस अ-हेनिअस

ड.      जॉन टींडल

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब       २) ब आणि क

३) अ आणि क      ४) ब आणि ड

 

प्रश्न ३ – सजीवांच्या उत्पतीबाबत संकल्पना मांडणाऱ्यांचा योग्य कालानुक्रम कोणता?

अ.      धार्मिक विचारसरणी

ब.      अऱ्हेनिअस

क.      हक्सली

ड.      डार्बनि

पर्यायी उत्तरे

१) अ, ब, क, ड     २) अ, ड, ब, क

३) अ, क, ड, ब     ४) अ, क, ब, ड

 

प्रश्न ४ – उत्पत्ती पुढीलपकी कोणत्या घटकांपासून झाल्याची चर्चा उताऱ्यामध्ये करण्यात आलेली नाही?

१)  परमेश्वराचे सामथ्र्य

२) अकार्बनी पदार्थ

३) जैविक रसायने

४) कार्बनी पदार्थ

 

प्रश्न ५ –  सजीवांच्या उत्पत्तीबाबत पुढीलपकी कोणती कल्पना नि:संदिग्ध आहे?

१)      सजीवांचा क्रमिक विकास

२)     अकार्बनी पदार्थापासून जीवोत्पत्ती

३)      आकस्मिक उत्पत्ती

४) सजीवांचे चिरकालिकत्व

 

उत्तरे

प्रश्न क्र.१. – योग्य पर्याय क्रमांक (१)

प्रश्न क्र.२. – योग्य पर्याय क्रमांक (४)

प्रश्न क्र.३. – योग्य पर्याय क्रमांक (२)

प्रश्न क्र.४. – योग्य पर्याय क्रमांक (३)

प्रश्न क्र.५. – योग्य पर्याय क्रमांक (१)

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 1:50 am

Web Title: mpsc exam preparation akp 94 4
Next Stories
1 लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पदनिहाय पेपर प्रश्न विश्लेषण
2 सुशासन, ई-शासन आणि नागरी सेवा
3 आडदरा
Just Now!
X