फारुक नाईकवाडे

राज्य लोकसेवा आयोगाकडून वर्षभर विविध परीक्षा आयोजित करण्यात येतात. सन २०२०मध्ये परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध तर झाले मात्र कोविड १९च्या प्रभावामुळे तूर्त तरी राज्यसेवा पूर्व परीक्षेपासूनच्या सर्वच परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. याबाबत आयोगाने कुठलीही मुदत जाहीर केलेली नाही, म्हणजे नवीन वेळापत्रक जाहीर होईपर्यंतचा काळ हा तयारी करण्यासाठीचा बोनस समजून योग्य पद्धतीने वापरायला हवा.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
maharashtra animal husbandry commissioner kaustubh diwegaonkar talking about survival of the fittest
माझी स्पर्धा परीक्षा : समाज म्हणून यशाच्या व्याख्या बदलायला हव्यात
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…

सध्याचा हा विराम आपले ध्येय आणि त्यासाठी करायचे प्रयत्न यांचे नीट नियोजन करण्यासाठी हुशारीने वापरायला हवा. अनेक उमेदवारांशी या काळात संवाद झाला. त्यातून जाणवले ते असे की, या ‘घरबंदी‘ कालावधीचा योग्य तयारीसाठी वापर करायची इच्छा तर आहे, पण नेमके काय करू तेच कळत नाही; किंवा आता जास्त वेळ आहे तर मुलाखतीची तयारी करून टाकू .  किंवा काहींचे म्हणणे की आता स्पर्धा प्रचंड वाढेल तर माझी तयारी पुरेशी असेल ना? थोडक्यात आत्मविश्वास ते गोंधळ अशा निरनिराळ्या  प्रतिक्रिया जाणवल्या. यासाठी हा संवाद!

आपल्याला केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयएएस व्हायचे आहे हे ध्येय बाळगणारे अनेक उमेदवार आहेत. स्पर्धेची तीव्रता लक्षात घेता करिअरचा पर्यायी मार्ग किं वा करिअरमध्ये एक स्थैर्य / सुरक्षितता असावी यासाठी  यूपीएससीचा अभ्यास करा पण  एमपीएससीसह इतर सर्व स्पर्धा परीक्षासुद्धा दिल्या पाहिजेत असा सल्ला मी देत असतो. मात्र हा सल्ला अनेकांना रुचत नाही. राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांला गट ब किंवा त्याच्या पदवीशी संबंधित विशेषज्ञ सेवेसाठीची परीक्षा दे म्हटले की अपमान वाटतो. स्पर्धा परीक्षांचे पॅशन असणे ही चांगली बाब आहे पण त्यामध्ये व्यवहार्य निर्णय घेणे खूप आवश्यक आहे, हे समजून घेतलेच पाहिजे. कोणत्याही टप्प्यावरची एखादी पोस्ट मिळाली तर त्याने यूपीएससीचा किंवा राज्यसेवेच्या तयारीसाठी आत्मविश्वासाला चालनाच मिळते. त्याने तुमच्या स्वप्नांना किंवा महत्त्वाकांक्षेला कमीपणा नक्कीच येत नाही. करिअरमध्ये एक सुरक्षितता आली तर जास्त परिणामकारकपणे पुढची तयारी करता येते, आपण योग्य मार्गावर आहोत हा आपल्या क्षमतांवरचा विश्वास वाढीस लागतो. कमीतकमी अभ्यासातून यशाची जास्तीतजास्त खात्री वाढवायची असेल तर स्पर्धा परीक्षांमधील विविध आणि सुसंबद्ध परीक्षांची तयारी एकत्रितपणे आणि गांभीर्याने करायला हवी.

मी एमपीएससीची तयारी करतो म्हणणाऱ्या उमेदवारांना राज्यसेवा परीक्षा किंवा गट ब आणि गट क परीक्षांपलीकडे आयोगाच्या इतर कोणत्याही परीक्षांची माहिती नसते. मात्र आपल्या अर्हतेनुसार देता येणाऱ्या जास्तीतजास्त माहिती आपल्याला असायला हवी अणि त्यातील शक्य तेवढय़ा परीक्षा द्यायला हव्यात. यूपीएससी, एमपीएससीसह बॅंकिंग, एनडीए, यूपीएससीमधील विशेषज्ञ सेवा अशा जास्तीतजास्त परीक्षा दिल्या पाहिजेत. कृषी पदवीधराने एमपीएससीची कृषी सेवा परीक्षा, अभियंत्यांनी यूपीएससीची अभियांत्रिकी सेवा परीक्षा, एमपीएससीची मोटार वाहन निरीक्षक/ अभियांत्रिकी सेवा परीक्षा देण्याची तयारीही करायला हवी. वैद्यक क्षेत्रातील पदवीधरांसाठीही वैद्यकीय सेवा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्न पद्धतींचे आपापले पॅटर्न ठरलेले असतात. काठीण्य पातळी ठरलेली असते. अशा परीक्षा देत राहिल्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा सराव होतोच पण यशाची शक्यताही  वाढते. सन २०१३मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेची प्रश्नपद्धती पारंपरिक वरून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना प्रश्नांचे स्वरूप व काठीण्य पातळी ही यूपीएससीच्या प्रकारची जाणवली. यानंतर गट ब सेवा या परीक्षांबाबतही असेच काहीसे जाणवले. यूपीएससी देणाऱ्या उमेदवारांना त्यामुळे एमपीएससीची परीक्षा फारशी अवघड गेली नाही आणि राज्य सेवेची तयारी करणाऱ्या बऱ्याच उमेदवारांनी यूपीएससीचा विचार करायला सुरुवात केली. त्यामुळे आपली शैक्षणिक अर्हता समजून घेऊन देता येतील अशा सर्व स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखली पाहिजे.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नुसतेच ध्येयवादी असून चालणार नाही, त्यासाठी योग्य मार्गदर्शन, सटीक संदर्भ साहीत्य, प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण, अभ्यासक्रमाचे सूक्ष्म आकलन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तयारी सुरू करताना सर्वात आधी देणार आहोत त्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप नीट समजून घ्यायला हवे. संबंधित परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायला हवे. अशा प्रकारे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास व्यवस्थित झाला की पुढच्या अभ्यासाची दिशा ठरविणे सोपे होते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेसाठी नेमके काय वाचावे, कसे वाचावे, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे या बाबींचे आकलन झाल्यामुळे संदर्भ साहित्याची निवड करणे सोपे होते. ही मूलभूत तयारी झाली की कधी, काय, कसे आणि का अभ्यासायचे हे लक्षात येईल आणि जमेल तेव्हा जमेल ते उरकून टाकू असा दृष्टिकोन राहणार नाही.

सरकारी अधिकारी व्हायचे आहे या महत्त्वाकांक्षेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो उमेदवार राज्यात आहेत. पण या संख्येने स्पर्धेची तीव्रता जास्त आहे असे दडपण घेण्याची आवश्यकता नाही. आपली तयारी योग्य मार्गाने आणि योग्य पद्धतीने होत असेल आणि आपल्या आधीच्या परफॉर्मन्सशी स्पर्धा करून त्यात प्रगती करून घेत असू तर कोणात्याही संख्येची भीती बाळगण्याचे कारण नाही. नवीन वेळापत्रक येईपर्यंत, करतो आहोत ती तयारी जास्तीतजास्त परिणामकारक कशी करता येईल त्या दिशेने प्रयत्न करत राहा. संधी दिसत जातील आणि त्यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहिलेच आहे!