रोहिणी शहा

करोना विषाणूच्या प्रभावामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचे वेळापत्रक बदलले आहे. सन २०२० मध्ये प्रस्तावित काही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत, तर काही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. ऑलिम्पिक स्पर्धाबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. टोक्यो ऑलिम्पिकबाबत अद्ययावत माहिती म्हणजे जुलै २०२१ मध्ये जर स्पर्धा आयोजित होऊ शकली नाही तर ती रद्द करावी लागेल, असे  टोक्यो ऑलिम्पिक समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.

पुढे ढकलण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धामुळे सन २०२१च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धाही पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. याबाबत महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

सातव्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा

१ ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान त्रिनिदाद व टोबॅगो येथे सातव्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा प्रस्तावित होत्या. मात्र टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० वरून पुढे ढकलून आता २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असल्याने राष्ट्रकुल युवा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धा सन २०२३ मध्ये आयोजित करण्याची बाब विचाराधीन आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेकडून Commonwealth Youth Games (CYG)  राष्ट्रकु ल युवा स्पर्धा या १४ ते १८ वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी सन २००० पासून आयोजित करण्यात येतात.

पहिल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा १० ते १४ ऑगस्ट, २००० दरम्यान एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे आयोजित करण्यात आल्या. सन २०००, २००४, २००८, २०११, २०१५, २०१७ या वर्षी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे १२ ते १८ ऑक्टोबर, २००८ दरम्यान आयोजित राष्ट्रकुल युवा स्पर्धा या तिसऱ्या स्पर्धा होत्या. राष्ट्रकु ल युवा स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ७१ देशांनी २००८च्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर एकूण ९ खेळांचे सर्वाधिक १,२२० सामने या दरम्यान आयोजित करण्यात आले.

जर्मनीची बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धा

कोवीड विषाणूच्या प्रभावातून बाहेर पडून भरवली जाणारी जगातील महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धामधील पहिली क्रीडा स्पर्धा आहे. ही जर्मनीची राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा असली तरी प्रेक्षकसंख्येचा विचार करता ती जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. ११ मार्च रोजी झालेल्या सामन्यानंतर कोविड विषाणूच्या प्रभावामुळे या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता १६ मे पासून या स्पर्धेतील सामने पुन्हा सुरू झाले आहेत.

महत्त्वाचे बदल –

हे सामने प्रत्यक्ष प्रेक्षाकांविना भरविण्यात येत आहेत.

सामन्यांपूर्वी संघांतील खेळाडूंचे विलगीकरण करण्यात येत आहे.

सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करून मगच त्यांना क्रीडांगणावर प्रवेश देण्यात येत आहे.

खेळाडूंमध्ये प्रवासादरम्यान तसेच ड्रेसिंग रूममध्ये योग्य अंतर राखता यावे या दृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे.

वरील मुद्दे वर वर पाहता परीक्षेच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे वाटले नाहीत तरी यांचा संदर्भ मुख्य परीक्षेच्या पेपर चार आणि मुलाखतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

भारतातील फुटबॉल स्पर्धा  –

हिरो इंडियन सुपर लीग ही भारताची राष्ट्रीय स्तरावरील क्लब प्रारूपातील महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा आहे. सन २०१४ पासून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.

पहिल्या स्पर्धेमध्ये एकूण आठ फुटबॉल क्लब होते. तर सध्या यामध्ये १० कार्यरत फुटबॉल क्लब आहेत. सन २०१४ पासून कार्यरत पुणे फुटबॉल क्लब सन २०१९ पासून रद्द करण्यात आला आहे. त्या ऐवजी हैद्राबाद फुटबॉल क्लबचा समावेश लीगमध्ये करण्यात आला आहे.

डय़ुरांड कप ही सन १८८८ पासूनची क्लब प्रारूपातील भारताची पहिली फुटबॉल स्पर्धा आहे. एकूण १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.

सन २०१७-१८ मध्ये इंडियन सुपर लीगचा कालावधी तीन महिन्यांवरून वाढवून सहा महिने करण्यात आला, क्लब्सची संख्या आठवरून दहा करण्यात आली आणि लीगला आशियाई फुटबॉल संघटनेची मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे डय़ुरांड कपचे क्लब आशियाई फुटबॉल कपसाठी पात्र ठरत नसले तरी इंडियन सुपर लीगचे क्लब आशियाई फुटबॉल कपसाठी पात्र ठरतात.

ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा

२४ मे ते ७ जून २०२० दरम्यान प्रस्तावित फ्रेंच ओपन ही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून ती २० सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

फ्रेंच ओपन ही क्ले कोर्टवर खेळली जाणारी एकमेव ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आहे.

सन २०२०च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोविड विषाणूच्या प्रभावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून-जुलैदरम्यान आयोजित केली जाणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही मुख्य चार ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धापैकी सन १८७७ पासून आयोजित करण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. सन २०२०ची स्पर्धा ही १३४वी स्पर्धा ठरली असती. आता ही १३४वी स्पर्धा सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात येईल.

विम्बल्डन स्पर्धा ही हिरवळीवर खेळली जाणारी एकमेव ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन या इतर तीन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आहेत.

यूएस ओपन स्पर्धा ही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणारी वर्षांतील शेवटची ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा असते. या स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या नसल्या तरी या वर्षी स्पर्धेचे सामने प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येतील.