01 March 2021

News Flash

एमपीएससी मंत्र  : निर्णयक्षमता – पर्याय विश्लेषण सराव

प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास रु. २००० इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

रोहिणी शहा

सी सॅटमधील निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये या घटकाची तयारी कशी करावी याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या अनुषंगाने या प्रश्नांची सर्वात योग्य उत्तरे कशा प्रकारे शोधता येतील, याबाबत एका प्रश्नाच्या माध्यमातून या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

‘राज्यामध्ये प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास रु. २००० इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण काही किरकोळ माल विकणारे फेरीवाले, भाजीवाले लोक अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना तुम्हाला आढळले आहेत. याबाबत त्यांना हटकले असता ग्राहकांकडून सामान ठेवण्यासाठी पिशव्यांची मागणी होत असल्याने आणि बाजारात उपलब्ध पर्यायी पिशव्यांचे दर त्यांना परवडत नसल्याने प्लास्टिकचाच वापर करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुम्ही त्यांना अशा उल्लंघनासाठी होणाऱ्या दंडाची बाब बोलून दाखविली असता संबंधित अधिकाऱ्यास ‘काही तरी’ देऊन सुटका करून घेता येते असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तुम्ही — ’

१. रद्दी आणि चिंध्यांपासून कमी किमतीच्या पिशव्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्यामधीलच काहींना मदत आणि मार्गदर्शन कराल आणि प्लॅस्टिकचा वापर थांबवण्याची त्यांना विनंती कराल.

२. ग्राहकांना प्लास्टिकवर बंदी असल्याचे सांगून प्लास्टिकची पिशवी देता येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची विनंती विक्रेत्यांना कराल.

३. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शासनाकडे तक्रार कराल व त्याच्यावर कारवाईची मागणी कराल.

४. स्थानिक प्रशासनाकडे या विक्रेत्यांबाबत लेखी तक्रार नोंदवाल आणि शासनाने अशा विक्रेत्यांना बाजारात उपलब्ध पर्यायी पिशव्या कमी दराने उपलब्ध करून देण्याची विनंती कराल.

नेमकी समस्या – 

ग्राहक आणि विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर, पर्यायी व्यवस्था विक्रेत्यांना न परवडणारी, संबंधित अधिकारी कायद्याची अंमलबजावणी न करणारा आणि भ्रष्ट

तुमची भूमिका -एक जागरूक नागरिक पर्यायांचे विश्लेषण –

या उदाहरणातील पर्याय पाहिल्यास दुसरा पर्याय कोणत्याही प्रकारे प्रभावी नाही. प्लास्टिकबंदीची बाब ग्राहकांना माहीत नाही म्हणून ते प्लास्टिकच्या पिशव्या मागतात असे नाही. तसेच ग्राहकांची मागणी नाकारण्याइतका फेरीवाले वा भाजीवाल्यांचा व्यवसाय स्थिर नसतो. त्यामुळे याबाबत संवेदनशीलपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी नाकारण्याबाबत अशा छोटय़ा विक्रेत्यांना आग्रह करणे फारसे परिणामकारक ठरणार नाही. या पर्यायातून तुम्ही कोणतीही जबाबदारी पार पडताना दिसत नाही. तसेच कोणताच तोडगाही निघत नाही. तसेच एक जागरूक नागरिक म्हणून प्लास्टिक वापरापासून विक्रेत्यांना परावृत्त करणे हा परिणामही साधता येत नाही. उलट ती जबाबदारी विक्रेत्यांवर टाकून मोकळे होण्याची वृत्ती यामधून दिसते. त्यामुळे या पर्यायास शून्य गुण देण्यात येतील.

पर्यायातील आता उरलेल्या पर्यायांमधून अधिक समर्पक व या समस्येवर अंतिम आणि दूरगामी तोडगा निघू शकेल असा पर्याय निवडणे आवश्यक ठरते.

पर्याय चार हा कृतिशील वाटतो. कायद्याच्या विरोधात जाऊन केल्या जाणाऱ्या प्लास्टिक वापराबाबत शासनाकडे तक्रार करणे ही योग्य बाब आहे. त्यातून काही विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकेल. मात्र अशा कारवाईनंतरही प्रशासनाच्या अपरोक्ष आणि ग्राहक टिकविण्यासाठी लपूनछपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासन कल्याणकारी भूमिकेतून जीवनावश्यक वस्तूंचा आवश्यकतेप्रमाणे पुरवठा करू शकते. मात्र महाग पर्यायी पिशव्या नागरिकांना स्वस्तामध्ये पुरविणे ही शासनाची जबाबदारी होऊ शकत नाही हे लक्षात आले पाहिजे. सर्व काही शासनाने करावे ही वृत्ती आणि अपेक्षा यातून दिसून येते. त्यामुळे योग्य वाटला तरी हा पर्याय व्यवहार्यही नाही आणि दूरगामी परिणाम करणाराही ठरत नाही. म्हणून या पर्यायास दीड गुण देण्यात येतील.

तिसरा पर्याय संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाहीचा उपाय सुचवतो. अशा प्रकारे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे योग्यच आहे, पण त्यातून नेमक्या समस्येचे निराकरण होताना दिसत नाही. अधिकारी बदलला तरी नव्या अधिकाऱ्याच्या अपरोक्ष प्लास्टिक पिशव्यांचा वापर होणारच नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे योग्य असला तरी हा पर्याय मूळ समस्येबाबत परिणामकारक ठरेलच असे नाही. त्यामुळे या पर्यायास दोन गुण देण्यात येईल.

पर्याय एक हा समस्येवरचा दूरगामी तोडगा आहे. यातून पर्यायी महाग पिशव्यांऐवजी पर्यावरणस्नेही अशा कागदी व कापडी पिशव्यांचा वापर सुरू होऊ शकतो. अशा स्वस्त पिशव्या बनवणे हा रोजगाराचा नवीन स्रोत ठरू शकतो. आणि त्यासाठी मदत, मार्गदर्शन करण्याच्या तुमच्या विचारातून तुमची सकारात्मक वृत्ती आणि संवेदनशीलता दिसून येते. या माध्यमातून कोणतीही जबरदस्ती न करता ग्राहक आणि विक्रेत्यांच्या सवयीमध्ये बदल घडून येऊ शकतो. थोडक्यात, यामध्ये समतोल व व्यवहार्य दृष्टिकोन, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता आणि कृतिशीलता असे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसून येतात. त्यामुळे पर्याय एकला अडीच गुण देण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:32 am

Web Title: mpsc exam preparation tips in marathi mpsc exam 2021 zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारत
2 एमपीएससी मंत्र  : सीसॅट – निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये
3 यूपीएससीची तयारी : प्राचीन भारत
Just Now!
X