29 October 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : कार्यालयीन सुरक्षा, आरोग्य आणि कार्यालयीन परिस्थिती संहिता

कामगारांसाठी वार्षिक आरोग्य तपासणीची व्यवस्था करणे.

रोहिणी शहा

विविध क्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांसाठी असलेल्या स्वतंत्र कायद्यांचे एकत्रीकरण करून र्सवकष श्रम संहिता केंद्र शासनाकडून तयार करण्यात आल्या आहेत. यातील दोन संहितांबाबत यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. या लेखामध्ये कार्यालयीन सुरक्षा, आरोग्य आणि कार्यालयीन परिस्थिती संहितेबाबत चर्चा करण्यात येत आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेषत: धोकादायक / हानीकारक उद्योगांतील कामगारांचे आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक मानक परिस्थिती यांबाबतचे केंद्र शासनाचे १३ कायदे एकत्र करून ही संहिता तयार करण्यात आली आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

तरतुदी लागू होणाऱ्या आस्थापना

* आस्थापना – किमान १० कामगार कार्यरत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील आस्थापना.

* कारखाना – किमान २० कामगार कार्यरत असणाऱ्या सर्व क्षेत्रातील आस्थापना.

या कारखाने किंवा आस्थापनांनी आपली नोंदणी निबंधकांकडे करणे बंधनकारक आहे.

नियोक्ते आणि कामगारांच्या जबाबदाऱ्या

या संहितेमध्ये कामगारांच्या सेवाविषयक बाबी उदा. कामाचे तास, सुट्टय़ा, वेतन इत्यादी बाबींबाबत तरतुदी, कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा तसेच सुरक्षेचे उपाय, आरोग्यपूर्ण वातावरण अशा बाबींचा समावेश असल्याने त्याबाबत नियोक्ते आणि कामगार या दोघांच्याही जबाबदाऱ्या नमूद करण्यात आल्या आहेत.

* सर्वसाधारणपणे नियोक्त्यांवर पुढील गोष्टी बंधनकारक आहेत.

* कामगारांना धोकामुक्त कामाचे ठिकाण उपलब्ध करून देणे.

* कामगारांसाठी वार्षिक आरोग्य तपासणीची व्यवस्था करणे.

* कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताची संबंधित अधिकाऱ्यास माहिती देणे.

* या सर्वसाधारण जबाबदाऱ्यांसहित वेगवेगळ्या क्षेत्रातील आस्थापना, कारखाने, खाणी, बंदरे, बांधकाम व्यवसाय, मळे इत्यादी ठिकाणी आवश्यक असलेल्या विशिष्ट जबाबदाऱ्याही संहितेत विहित करण्यात आल्या आहेत.

* कामगारांनी शक्य तेवढी आपल्या आरोग्याची काळजी घेणे.

* धोकादायक परिस्थिती उद्भवली असेल किंवा उद्भवण्याची शक्यता असेल तर त्याची कल्पना संबंधितांना देणे.

* स्वत: आणि इतरांना इजा पोचू शकेल अशा बाबी न करणे, धोकादायक गोष्टी वा गैरवापर न करणे.

व्यावसायिक सुरक्षाविषयक तरतुदी

* सक्षम अधिकाऱ्यांकडून संबंधित ठिकाणाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

* शासनाकडून एखाद्या आस्थापनेस किंवा कारखान्यास सुरक्षा समिती व सुरक्षा अधिकारी नेमण्याच्या सूचना देण्यात येऊ शकतील.

* धोकादायक कारखाने / उद्योग इत्यादींमध्ये कार्यरत कामगारांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठीची मानके केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील.

सल्लागार मंडळे

* राष्ट्रीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ

हे मंडळ या संहितेखाली नियम, मानके आणि नियमने तयार करणे, त्यांची अंमलबजावणी आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्या या बाबींमध्ये केंद्र शासनास सल्ला देईल.

* राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ.

या संहितेच्या राज्यांतील अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे व आवश्यकतेप्रमाणे राज्य शासनास याबाबत अन्य सल्ले देणे यासाठी संबंधित राज्य शासन आपले सल्लागार मंडळ स्थापन करेल.

कार्यालयीन परिस्थिती

केंद्र शासनाकडून कार्यालयीन परिस्थितीच्या पुढील पैलूंबाबत वेळोवेळी निकष आणि मानके विहित करण्यात येतील व त्यांचे अनुपालन आस्थापनांवर बंधनकारक असेल.

* स्वच्छता व आरोग्य.

* खेळती हवा, सूर्यप्रकाश व तापमान.

* धूळ, विषारी वायू व अन्य प्रदूषकांपासून मुक्त वातावरण.

* कामाच्या ठिकाणी आवश्यक आद्र्रता आणि थंडाव्यासाठीच्या यंत्रणा.

* पिण्याचे पाणी व प्रकाशाची व्यवस्था.

* महिला, पुरुष व  तृतीयपंथी कामगारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था.

* कचरा व्यवस्थापन.

अन्य तरतुदी

* वरील सर्वसाधारण तरतुदींबरोबर पुढील विशिष्ट क्षेत्रातील कामगारांसाठी त्या त्या क्षेत्राच्या वैशिष्टय़पूर्ण कामाच्या अनुषंगाने आवश्यक सुरक्षा व आरोग्यविषयक तरतुदी संहितेमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

* दृक—श्राव्य क्षेत्र,

* खाणी,

* बिडी आणि सिगार,

* बांधकाम,

* कारखाने,

* मळे,

* संहितेच्या तीन परिशिष्टांमध्ये पुढील तीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत:

* धोकादायक प्रक्रिया समाविष्ट असलेले ४० उद्योग,

* अधिसूचित करावयाच्या २९ रोगांची यादी,

* शासन विनियमित करू शकेल अशा

७३ सुरक्षाविषयक बाबी.

सक्षम प्राधिकारी त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, दंड व शिक्षेच्या तरतुदी, महत्त्वाच्या व्याख्या अशा मुद्द्यांबाबतीत मूळ दस्तावेज वाचून अभ्यासाची टिपणे काढणे परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे.

कामाचे तास आणि पगारी रजा

* सर्व आस्थापना / कारखाने/ उद्योगांमध्ये कामगारांसाठी एका दिवसात जास्तीत जास्त आठ तास काम करून घेता येईल. यापेक्षा जास्त वेळ केलेल्या कामासाठी अधिकालिक वेतन (Extra wages for overtime) देणे आवश्यक असेल.

* महिलांना सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीत त्यांची मान्यता असेल तरच कामावर बोलाविता येईल व त्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा व आरोग्यविषयक गरजांची पूर्तता होईल याची खात्री नियोक्त्याने करणे आवश्यक आहे.

* एका आठवडय़ात कामगारांकडून जास्तीत जास्त सहा दिवस काम करून घेता येईल. म्हणजे आठवडय़ातून किमान एक दिवस सुट्टी देणे आवश्यक असेल. सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावलेल्या कामगारास पुढे पर्यायी रजा देणे आवश्यक असेल.

* कामगाराला कामाच्या दर २० दिवसांमागे एक दिवस या दराने वार्षिक पगारी रजा देय असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 12:12 am

Web Title: mpsc exam preparation tips in marathi study tips for mpsc exam 2020 zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास -गरिबी, बेरोजगारी, रोजगारनिर्मिती आणि संबंधित मुद्दे
2 एमपीएससी मंत्र : औद्योगिक संबंध संहिता
3 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास : कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र
Just Now!
X