News Flash

एमपीएससी मंत्र  : नैसर्गिक व मानवी आपत्ती चालू घडामोडी

मुंबई उच्च न्यायालयाकडून एप्रिल २०२०मध्ये पोलाद पुरवठादाराने हे कलम वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

फारुक नाईकवाडे

नैसर्गिक व मानवी आपत्ती हा मुख्य परीक्षा पेपर चारमधील मुद्दा आहेच, पण अशा आपत्ती या पूर्वपरीक्षेतील चालू  घडामोडी घटकाच्या दृष्टीनेसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे. पूर, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन, त्सुनामी, वणवे, विजा कोसळणे या नैसर्गिक आपत्तींबरोबरच युद्धे, दहशतवाद, मानवी वस्त्यांवरील हल्ले ही मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे आहेत. अशा काही मुद्दय़ांबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

दैवी आपत्ती (Act of God)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्तू व सेवा कराचा राज्यांना द्यायचा परतावा देता येणे शक्य नसल्याचे नमूद करताना करोना साथीस दैवी आपत्ती असे संबोधल्यावर या शब्दप्रयोगावर बरीच चर्चा सुरू आहे. याबाबत परीक्षोपयोगी मुद्दे पुढीलप्रमाणे :

* दैवी आपत्ती हे कलम व्यापारी / व्यावसायिक करारांमध्ये एखाद्या अरिष्ट किंवा टोकाच्या संकटाच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांची कायदेशीर तरतूद करण्यासाठी समाविष्ट करण्यात येते.  एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपूर्ण कराराचा भंग न करता करारातील काही समझोते, कलमे तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपात रद्द करणे या कलमामुळे शक्य होते.

* यामध्ये फोर्स मेज्योअर force majeure आणि Act of God असे दोन शब्दप्रयोग करण्यात येतात. Act of God या संकल्पनेमध्ये केवळ नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो तर फोर्स मेज्योअर संकल्पनेमध्ये मानवनिर्मित आपत्ती म्हणजे दहशतवादी हल्ले, युद्धे, दंगली तसेच संप, कायद्यातील बदल, साथीचे रोग अशा एखाद्या करारातील अटींवर परिणाम करणाऱ्या व्यापक बाबींचा समावेश होतो.

* या कलमाचा वापर करारातील एखादी अट पूर्ण करणे अवघड झाले म्हणून नाही तर ती पूर्ण करणे अशक्य झाले तरच केला जाणे कायदेशीरदृष्टय़ा ग्रा असते.

* आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाकडून International Chamber of Commerce कोविड १९ च्या काळातील परिस्थितीमध्ये या कलमाचा वापर करण्याबाबत संहिता तयार करण्यात आली आहे. हे कलम वापरण्यासाठीच्या अटी पुढीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत  – कलम वापरावे लागणारी परिस्थिती दोन्ही करारदारांच्या नियंत्रणाबाहेरील असावी, अशी परिस्थिती हाताळण्याची क्षमता संबंधित करारदाराकडे नसावी आणि करार करताना अशा प्रकारच्या आपत्तीचा अंदाज व्यवहार्यपणे करणे करारदारांना शक्य नसेल, इ.

* फेब्रुवारी २०२०मध्येच अर्थमंत्री सीतारामन यांनी कोविड साथ ही दैवी आपत्तीचे कलम आवश्यकतेप्रमाणे लागू करण्याचे संकेत दिले होते.

* मुंबई उच्च न्यायालयाकडून एप्रिल २०२०मध्ये पोलाद पुरवठादाराने हे कलम वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

* सिंगापूर आणि फ्रान्स देशांमध्ये कोविड साथीस दैवी आपत्ती समजून आवश्यक तेथे करारांमधील अटींबाबत हे कलम वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नोविचोक – नवे रासायनिक हत्यार

* रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांना नोविचोक (Novichok) नावाचे विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अंजेला मर्केल यांच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले आहे. नोविचोक हे रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटनेकडून (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) बंदी घालण्यात आलेले रसायन आहे.

* मार्च २०१८मध्ये ब्रिटनमध्ये रशियन गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न हे विष वापरून करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१९मध्ये रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटनेकडून या विषाचा समावेश प्रतिबंधित रसायनांच्या यादीमध्ये करण्यात आला.

* नोविचोक हे चेतासंस्थेवर परिणाम करणारे रसायन असून त्याचा वापर केल्यानंतर त्याचा माग काढणे सहज शक्य होत नाही. शीतयुद्धादरम्यान तत्कालीन सोव्हिएत संघाच्या फोलिएंट या गुप्त रासायनिक हत्यारनिर्मिती कार्यक्रमामध्ये हे रासायनिक हत्यार विकसित करण्यात आले. हे चौथ्या पिढीचे म्हणजे अंत्यत तीव्र परिणाम साधणारे विष आहे.

* रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटना (OPCW) ही रासायनिक हत्यारे कराराअंतर्गत (Chemical Weapons Convention) २९ एप्रिल १९९७ रोजी स्थापन करण्यात आली. द हेग, नेदरलँड्स येथे मुख्यालय असलेल्या या संघटनेचे १९३ देश सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सदस्यदेश आपोआपच या संघटनेचे सदस्य होण्यास पात्र ठरतात. इजिप्त, दक्षिण सुदान आणि उत्तर कोरिया हे देश अद्याप या संघटनेचे सदस्य नाहीत. तर इस्राएलने रासायनिक हत्यार करारावर स्वाक्षरी केली असली तरी त्यास अधिस्वीकृती दिलेली नाही.

* रासायनिक हत्यारांच्या निर्मूलनासाठी संघटनेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांसाठी रासायनिक शस्त्रास्त्र प्रतिबंध संघटनेस सन २०१३ मध्ये शांततेसाठीचा नोबल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

* रासायनिक हत्यारे करारामध्ये ((CWC) पुढील बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे –

* रासायनिक हत्यारांचा विकास, उत्पादन, व्यापार किंवा साठवणूक

* रासायनिक हत्यारांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तांतर

* रासायनिक हत्यारांचा वापर किंवा लष्करी हेतूने विकास

* करारांतर्गत प्रतिबंधित असलेल्या कार्यवाहीसाठी इतर सदस्यदेशांना उद्युक्त करणे, मदत करणे

* दंगली नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा लष्करी किंवा युद्धामध्ये वापर करणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:35 am

Web Title: mpsc exam preparation tips mpsc exam 2020 mpsc exam in marathi zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : भारत आणि महासत्ता
2 यूपीएससीची तयारी : भारत व शेजारील देश
3 एमपीएससी मंत्र : नवे शैक्षणिक धोरण – आनुषंगिक महत्त्वाचे मुद्दे
Just Now!
X