23 January 2021

News Flash

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.

रोहिणी शहा

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा म्हणजेच दुय्यम सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन घटकातील विषयांच्या तयारीबाबत या आधीच्या लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मागील तीन वर्षे सामान्य विज्ञान या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. या प्रश्नांतील योग्य उत्तरांचे पर्याय ठळक के लेले आहेत.

प्रश्न १ –  दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर   ————

१) प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.

२) न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये समान असेल.

३) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये समान असेल.

४) न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल.

प्रश्न  २. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनण्ट लसीचे उत्पादन व वितरण करते?

१) मिसल्स लस

२) डिफ्थेरीया, टिटॅनस, परटय़ुसिस व हेपेटायटीस बीची लस

३) हेपेटायटीस बीची लस

४) रेपॉयटीन

प्रश्न ३. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

अ. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.

ब. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातात.

पर्यायी उत्तरे:

१) विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत.

२) विधान अ सत्य असून ब असत्य आहे.

३) विधान अ असत्य असून ब सत्य आहे.

४) विधाने अ आणि ब दोन्हीही असत्य आहेत.

प्रश्न ४. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ. टेनिया सोलियमला हुक जंत असेही म्हतले जाते.

ब. फॅस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते.

क. अ‍ॅसन्कालोस्टोमा डय़ुडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते.

ड, नेरेस चिल्कॅनसिस हे सामान्यत: चिंधी असे म्हणतात.

पर्यायी उत्तरे

१) क फक्त      २) ब आणि ड फक्त

३) अ फक्त      ४) अ आणि क फक्त

प्रश्न ५. खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत?

अ. ध्वनी तरंग हे अवतरंग असतात.

ब. ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता २० हर्ट्झ इतकी असते.

क. ध्वनी तरंगांच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

ड. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब   २) अ आणि क

३) ब आणि क   ४) क आणि ड

प्रश्न ६. जेव्हा वितळलेल्या सोडीयम क्लोराइडमधून १०० अ विद्युत प्रवाह ९६५ से. करिता प्रवाहित केला तर (Na = २३; Cl’ = ३५.५)

१) २३ ग्रॅम सोडीयम अँनोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा कॅथोडवर निकास होईल.

२) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ३५.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.

३) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि १७.५ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.

४) २३ ग्रॅम सोडीयम कॅथोडवर निक्षेप होईल आणि ७१ ग्रॅम क्लोरीन वायूचा अँनोडवर निकास होईल.

प्रश्न ७. डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे?

१) राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम

२) राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम

३) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

४) राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम

वरील उदाहरणांवरून एखाद्या मुद्द्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याची कल्पना येते. तसेच अभ्यास करताना नेमके काय वाचावे, कसे वाचावे आणि नोट्समध्ये कशाचा अंतर्भाव करावा याची कल्पना येते. प्रश्नांचे विश्लेषण केल्यास महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले आहेत किंवा प्रश्न किती सोपे, किती अवघड आहेत हे लक्षात येते. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून समोर येणारे मुद्दे पुढीलप्रमाणे:

* सामान्य विज्ञानाच्या एकूण १५ प्रश्नांपैकी प्रत्येकी तीन तीन प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर विचारलेले आहेत. तर जीवशास्त्र विषयावर ९ प्रश्न विचारलेले आहेत. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमातील घटकांवर प्रत्येकी तीन प्रश्न असे विभाजन आहे.

* सर्व घटकांमधील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचा भर जास्त आहे. बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. मात्र प्रश्नातील मुद्द्याची नेमकी माहिती असेल तर प्रश्न सोडविता येतील अशी काठिण्यपातळी असल्याने अभ्यास बारकाईने आणि समजून घेऊन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रश्नांचा दर्जा पदवीचा आहे हे लक्षात येते.

* चालू घडामोडींवर फारसे प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. मात्र दरवर्षी एखादा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित मुद्द्यावर विचारलेला दिसून येतो.

* सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि आवश्यक तेथे तथ्यात्मक बाबींच्या नोट्स काढणे या घटकाच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 2:18 am

Web Title: mpsc exam preparation tips mpsc exam preparation tips in marathi zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञान
2 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा – भारतीय आणि शासकीय अर्थव्यवस्था
3 यूपीएससीची तयारी : पर्यावरण परिस्थितिकी
Just Now!
X