25 January 2021

News Flash

एमपीएससी मंत्र : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतिबा फुले यांच्यासोबत झाला.

वसुंधरा भोपळे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापुढे हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाईल अशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यापूर्वी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत होता.

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये महिला शिक्षण दिन, तसेच सावित्रीबाईंचा जन्म, जन्मगाव, मुलींची पहिली शाळा कोठे, कधी स्थापन झाली, सावित्रीबाईंची लेखन संपदा, इतर सामाजिक कार्य या मुद्दय़ांवर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन एकमधील महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक या घटकांतर्गत महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याच्या अनुषंगाने सावित्रीबाईंच्या कार्यासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात तर सामान्य अध्ययन पेपर तीनमधील शिक्षण, तसेच वंचित घटकांचा विकास या उपघटकांतर्गत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात.

वैयक्तिक माहिती

* सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.

* वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतिबा फुले यांच्यासोबत झाला.

* अपत्य नसल्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या विधवेचा यशवंत हा मुलगा त्यांनी दत्तक घेतला.

* जोतिबा फुले यांनी त्यांना अक्षर ओळख व प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतरचे शिक्षण सखाराम परांजपे आणि केशव भावलकर यांनी त्यांना दिले.

शैक्षणिक कार्य

* सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई, जोतिबा फुले आणि सगुणाबाई या तिघांनी मिळून सन १८४८ मध्ये पुण्यातील तात्याराव भिडे यांच्या वाडय़ात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी कार्य सुरू केले.

* त्यांच्या या शैक्षणिक कार्यास विरोध म्हणून त्यांना घराबाहेर काढल्यावर सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना उस्मान शेख या महात्मा फुले यांच्या मित्राने आसरा दिला.

* पुण्यातील मुस्लीम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी उस्मान शेख यांच्या घरी सन १८४९ मध्ये शाळा सुरू केली. उस्मान शेख यांच्या पत्नी फातिमा शेख या पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका बनल्या.

सामाजिक कार्य व लेखन

*  गर्भवती विधवा आणि बलात्कार पीडित गर्भवतींना आसरा देण्यासाठी सन १९६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. या संस्थेच्या कार्यामध्ये सावित्रीबाईंनी सक्रिय सहभाग घेतला.

*  भ्रूण हत्या विशेषत: स्त्रीभ्रूण हत्या थांबण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून कार्य केले.

* १८९७ साली पुण्यात आलेल्या महाभयंकर ‘प्लेगच्या’ साथीत सावित्रीबाईंनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांची सेवाशुश्रूषा केली. अशातच त्यांनादेखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

* सावित्रीबाई कवयित्री म्हणून देखील परिचीत आहेत. ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोधरत्नाकर’ या त्यांच्या काव्यरचना प्रकाशित झाल्या आहेत.

इतर माहिती

*  सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे.

*  सन १९९८मध्ये त्यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्ताने भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट चालू केले.

महाराष्ट्र शासनातर्फे मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे

’ इयत्ता ५ वी  ते १० वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींना राज्य शासनातर्फे सदरची शिष्यवृत्ती देण्यात येते.

’ शाळांमधून मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

’ या योजनेनुसार  सन १९९६ पासून  ५ वी ते ७ वीमधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमाह रुपये ६०/— याप्रमाणे १० महिन्यांकरिता रु.६००/— शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाते.

’ सन २००३ पासून ८ वी ते १० वीमधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमाह रुपये १००/— याप्रमाणे १० महिन्यांकरिता रु.१०००/— शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाते.

’  इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींसाठी सदर योजना २०१९ मध्ये लागू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 2:36 am

Web Title: mpsc exam preparation tips study tips for mpsc exam zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : भावनिक बुद्धिमत्ता
2 एमपीएससी मंत्र : पॅरिस करार
3 यूपीएससीची तयारी : वृत्तीसंबंधित प्रश्नांचा आढावा
Just Now!
X