26 October 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : आपत्तींची मानवी किंमत – संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल

नैसर्गिक आपत्तींमध्येही हवामानाशी संबंधित आपत्तींचे प्रमाण तीव्रपणे वाढले आहे.

रोहिणी शहा

आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कपात दिन दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. सन २०२०च्या आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कपात दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कपात कार्यालयाकडून नैसर्गिक आपत्तींबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीचे विश्लेषण या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन हा मुद्दा वेगवेगळ्या परीक्षांच्या चालू घडामोडींमध्ये समाविष्ट होतोच, शिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर चारमध्ये नव्या अभ्यासक्रमानुसार हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो. याबाबत परीक्षोपयोगी चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

आपत्तींची मानवी किंमत (Human Cost of Disaster)

या शीर्षकातून आपत्तींचे गांभीर्य अधोरेखित करत हा अहवाल मांडण्यात आला आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

* सन २००० ते २०२० या २० वर्षांमध्ये एकूण ७३४८ मोठय़ा व गंभीर नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली आहे. या आपत्तींमध्ये एकूण १.२३ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, तर ४.२ दशलक्ष लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला.

* या २० वर्षांमधील नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण मागील २० वर्षांमधील (१९८० ते १९९९) नैसर्गिक आपत्तींच्या दुपटीपेक्षा जास्त आहे.

* नैसर्गिक आपत्तींमध्येही हवामानाशी संबंधित आपत्तींचे प्रमाण तीव्रपणे वाढले आहे. एकूण ७३४८ नैसर्गिक आपत्तींपैकी ६६८१ आपत्ती या पूर, चक्रीवादळे अशा हवामानाशी निगडित आपत्ती आहेत. उर्वरित आपत्तींमध्ये भूकंप, त्सुनामीसारख्या प्राकृतिक भौगोलिक घटनांसहित दुष्काळ, वणवे, तीव्र तापमान अशा नैसर्गिक आपत्तींचा समावेश करण्यात आला आहे.

* सर्वाधिक ३०६८ नैसर्गिक आपत्ती आशिया खंडामध्ये उद्भवल्या आहेत. या आपत्तींनी सर्वाधिक प्रभाव पडलेल्या देशांच्या यादीतील पहिल्या दहापैकी आठ देश आशिया खंडातील आहेत.

* सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या कालावधीमध्ये भारताने ३२१ नैसर्गिक आपत्तींचा सामना केला.

* या २० वर्षांतील सर्वाधिक मानवी बळी आणि वित्तहानी करणाऱ्या आपत्ती पुढीलप्रमाणे:

> सन २००४ मधील हिंदी महासागरातील त्सुनामी

> सन २००७ मधील हैतीचा भूकंप

> सन २०१० मधील म्यानमारमधील नर्गिस चक्रीवादळ

* १००,००० किंवा त्यापेक्षा जास्त मानवी बळी घेणाऱ्या आपत्तीना महाआपत्ती (mega—disaster)  म्हणण्यात येते. सन २०१० पासून कोणतीही महाआपत्ती आलेली नाही.

* सन २०१० पासूनच एका वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी ३५,००० वा त्यापेक्षा कमी ठेवण्यात आपत्ती नियंत्रण यंत्रणांना यश मिळाले आहे.

* नैसर्गिक आपत्ती म्हणून नोंद करताना पुढम्ील निकष लावण्यात आले आहेत.

> १० किंवा जास्त लोकांचा मृत्यू किंवा

> १०० किंवा जास्त लोकांवर परिणाम किंवा

> आणीबाणीची परिस्थिती घोषित होणे किंवा

> आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी होणे

आनुषंगिक मुद्दे

* संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कपात कार्यालय

> आंतरराष्ट्रीय आपत्ती कपात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी डिसेंबर १९९९ मध्ये याची स्थापना करण्यात आली. सन १९९० ते १९९९ हे नैसर्गिक आपत्ती कपातीसाठीचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आले होते. या दरम्यान कार्यरत सचिवालयाच्या जागी संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कपात कार्यालय स्थापन करण्यात आले.

> सन २०१५ मधील सेंदाई, जपान येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती जोखीम कपातीबाबतच्या तिसऱ्या परिषदेमध्ये सेंदाई आपत्ती जोखीम कपात कार्ययोजना २०१५ ते २०३० स्वीकारण्यात आली.

सन २००५ ते २०१५ साठीच्या ह्य़ोगो कार्ययोजनेच्या जागी ही नवी कार्ययोजना स्वीकारण्यात आली. यामध्ये चार प्राधान्याचे मुद्दे आणि सात उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत.

* सेंदाई कार्ययोजना प्राधान्याचे मुद्दे

> आपत्तीची जोखीम समजून घेणे.

> आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी प्रशासन यंत्रणा मजबूत करणे.

> अनुकूलनासाठी आपत्ती जोखीम कपातीमध्ये गुंतवणूक करणे.

> आपत्तींना परिणामकारक प्रतिसाद देण्याची तयारी वाढविणे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणणे, पुनर्वसन करणे आणि पुनर्बाधणी करणे यासाठी प्रयत्न करणे. (Build Back Better)

* सेंदाई कार्ययोजना उद्दिष्टे

> जागतिक स्तरावरील आपत्तींमधील मृत्युदर कमी करणे.

> आपत्तीचा परिणाम होणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी करणे.

> आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक हानीचे प्रमाण कमी करणे.

> पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवा खंडित होण्याचे प्रमाण कमी करणे.

> राष्ट्रीय आपत्ती जोखीम कपातीसाठी धोरण आखणाऱ्या देशांची संख्या वाढविणे.

> विकसनशील देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे.

> आपत्ती पूर्वसूचना यंत्रणांची उपलब्धता वाढविणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:01 am

Web Title: mpsc exam preparation tips zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास
2 एमपीएससी मंत्र : नोबेल पुरस्कार २०२०
3 यूपीएससीची तयारी :  आर्थिक विकास
Just Now!
X