29 March 2020

News Flash

भारतीय नागरिकत्व

भारतीय नागरिकत्व आणि त्याबाबत सध्या सुरू असलेला वाद/ विवाद यांच्या अनुषंगाने चालू घडामोडींच्या संदर्भात पुढील मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात

प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

भारतीय नागरिकत्व आणि त्याबाबत सध्या सुरू असलेला वाद/ विवाद यांच्या अनुषंगाने चालू घडामोडींच्या संदर्भात पुढील मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात – भारतीय नागरिकत्व, ते मिळवण्याचे मार्ग, नागरिकत्वाचे प्रकार आणि ते संपादन करण्याचे मार्ग, स्थलांतरित, शरणार्थी, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, जनगणना व तिच्याशी संबंधित कायदेशीर बाबी, राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर. या लेखामध्ये याबाबतचे काही सराव प्रश्न देण्यात येत आहेत.

प्रश्न १. नागरिकत्वाशी संबंधित तरतूद व राज्यघटनेतील अनुच्छेद यांची पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

१) पाकिस्तानातून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींना नागरिकत्व – अनुच्छेद ६

२) नागरिकत्वाच्या कायद्याचे विनियमन संसदेने करणे – अनुच्छेद ७

३) मूळ भारतीय असलेल्या मात्र अन्य देशात राहणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व – अनुच्छेद ८

४) दुसऱ्या देशाचे नागरिकत्व पत्करणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व रद्द होणे – अनुच्छेद ९

प्रश्न २. पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहेत?

अ. अनिवासी भारतीय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात.

ब. OCI कार्डधारक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करू शकत नाहीत.

क. अनिवासी भारतीयांना भारतामध्ये कर भरावा लागतो.

ड. OCI कार्डधारकांना भारतामध्ये कर भरावा लागत नाही.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क २) ब, क आणि ड

३) अ, ब आणि ड  ४) अ, क आणि ड

प्रश्न ३. भारतीय नागरिकत्वाबाबत पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त?

अ. नागरिकीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला राज्यघटनेशी बांधिलकीची शपथ घ्यावी लागते.

ब. भारताने एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यास त्या प्रदेशाच्या नागरिकांना आपोआपच भारताचे नागरिकत्व मिळते.

क. केंद्र शासन एखाद्या देशाच्या नागरिकाला त्याच्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थ भारताचे नागरिकत्व बहाल करू शकते.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब

२) ब आणि क

३) अ आणि क

४) वरील सर्व

प्रश्न ४. OCI कार्डधारकांना भारतीय नागरिकांसाठीचे काही अधिकार उपलब्ध नाहीत. पुढीलपैकी कोणत्या अधिकाराचा त्यामध्ये समावेश होत नाही?

अ. मतदानाचा हक्क

ब. कायद्यासमोर समानता

क. निवडणुकीमध्ये उमेदवारी

ड. अभिव्यक्तिस्वातंत्र्य

इ. शासकीय नोकरी

पर्यायी उत्तरे

१) अ आणि क   २)  क आणि इ                ३) ब आणि ड     ४) वरील सर्व

प्रश्न ५. भारतीय नागरिकत्वाबाबतच्या पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.

अ. अनिवासी भारतीय हे भारताचे नागरिक असतात.

ब. अनिवासी भारतीयांना भारत आणि ते राहत असलेला देश अशा दोन्ही देशांचे म्हणजेच दुहेरी नागरिकत्व मिळते.

क. OCI कार्डधारक हे इतर देशांचे नागरिक असतात.

ड. पाकिस्तान व बांगलादेश सोडून अन्य देशातील OCI कार्डधारकांचे नागरिकत्व हे त्यांचा देश व भारत असे दुहेरी नागरिकत्व असते.

पर्यायी उत्तरे

१) अ, ब आणि क बरोबर; ड चूक

२) ब, क आणि ड बरोबर; अ चूक

३) अ, ब आणि ड बरोबर; क चूक

४) अ, क आणि ड बरोबर; ब चूक

 

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र.क्र.१. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२)

नागरिकत्वाच्या कायद्याचे विनियमन संसदेने करण्याची तरतूद अनुच्छेद ११ अन्वये करण्यात आली आहे. अनुच्छेद सहामधील तरतूद ही राज्यघटना लागू होतानाची आणि १९ जुल १९४८ पूर्वी पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या व्यक्तींना आपोआप नागरिकत्व देण्यासाठी लागू करण्यात आली. सध्या केवळ नोंदणीसाठी अर्ज करून आणि त्यानंतर भारताच्या राज्यघटनेशी निष्ठेची शपथ घेतल्यावर भारतीय नागरिकत्व पाकिस्तानी नागरिकांना मिळू शकते.

प्र.क्र.२. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

OCI  (Overseas Citizen of India) कार्डधारकांकडे अनिवासी भारतीयांप्रमाणे भारताचे पारपत्र (Passport)) नसते. म्हणजेच त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले असले तरी

राष्ट्रीयत्व मिळालेले नसते. त्यामुळे त्यांना मतदानाचा, निवडणुकीमध्ये उमेदवारीचा, शासकीय नोकरीमध्ये संधीचा असे केवळ भारताच्या नागरिकांसाठी असलेले अधिकार नाहीत. मात्र त्यांनी भारतामध्ये कमावलेल्या उत्पन्नावरील कर भरणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.

प्र.क्र.३. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२)

भारताने एखादा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर केंद्र शासन अधिसूचना प्रसिद्ध करून त्या प्रदेशाशी संबंधित व्यक्तींना नागरिकत्व देण्याबाबत तरतूद करते. त्या तरतुदीनुसार पात्र व्यक्तींना भारताचे नागरिकत्व मिळते. नागरिकीकरणाद्वारे Naturalisation) भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींपैकी ज्यांनी विज्ञान, कला, तत्त्वज्ञान, साहित्य, जागतिक शांतता व एकूणच मानवी प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य केले असल्याची केंद्र शासनाची खात्री पटल्यास अशा व्यक्तींसाठी नागरिकीकरणासाठीच्या अटी केंद्र शासन शिथिल करू शकते. मात्र स्वत: होऊन असे नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही.

प्र.क्र.४. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३)

OCI कार्डधारकांना मतदान, शासकीय नोकरी, संसद व राज्य विधानमंडळाच्या निवडणुकीस उमेदवारी आणि भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदावरील नेमणूक इत्यादी अधिकार उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त भारतीय नागरिकांना असलेले इतर अधिकार OCI कार्डधारकांना मिळतात.

प्र.क्र.५. योग्य उत्तराचा पर्याय क्र.(४)

भारताच्या पारपत्रावर अन्य देशांत राहणाऱ्या व एका वित्तीय वर्षांमध्ये किमान १८३ दिवस भारताबाहेर असणाऱ्या भारतीय नागरिकांना अनिवासी भारतीय समजले जाते. हे भारताचे नागरिक असतात आणि त्यांचे नागरिकत्व दुहेरी नागरिकत्व नसून केवळ भारतीय असते. केवळ भारतीय नागरिकांसाठीचे मतदान, शासकीय नोकरीसहित सर्व हक्क हे अनिवासी भारतीयांसाठीसुद्धा असतात.

ज्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची मुभा असते अशा पाकिस्तान व बांगलादेश सोडून सर्व देशांच्या नागरिकांना OCI कार्ड मिळवता येते. OCI कार्डधारक हे अन्य देशांचे नागरिक व पारपत्रधारक असतात आणि त्यांना भारताचे दुहेरी नागरिकत्व मिळते. मात्र त्यांना केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले हक्क व अधिकार मिळत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 12:51 am

Web Title: mpsc exam study akp 94 12
Next Stories
1 अर्थव्यवस्था ‘अद्ययावत’ मुद्दे
2 अवघड अर्थशास्त्राचा सोपा अभ्यास
3 एमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षा अर्थशास्त्र प्रश्न विश्लेषण
Just Now!
X