22 February 2020

News Flash

सामान्य विज्ञान उर्वरित घटकांची तयारी

मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या मुद्दय़ांच्या उपयोजनाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत

 

एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

जीवशास्त्र आणि आरोग्य व पोषण या घटकांच्या तयारीबाबत मागच्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

रसायनशास्त्र

या घटकावरचे प्रश्न थेट आणि अधिक वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात. या घटकाचा अभ्यास करताना मुद्दय़ांचा योग्य क्रम ठरवून घेतलाआणि मागील प्रश्नांची ओळख करून घेतली तर हा घटकही ‘गुणवर्धक’ आहे.

  • रसायनशास्त्राचा अभ्यास करताना पुढील मुद्दय़ांवर भर देणे आवश्यक आहे.
  •   द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था
  •  मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े
  • अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत
  •  अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल
  •   आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा
  •  धातू, अधातू, धातूसदृश धातुके
  •  संयुगे व त्यांची निर्मिती
  •   कार्बनी व अकार्बनी संयुगे
  •  आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया
  •   मिश्रण व त्यांची निर्मिती
  •    या मुद्दय़ांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे

विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या मुद्दय़ांच्या उपयोजनाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत असे दिसून येते. थिअरी समजली की उपयोजन समजणे फारसे अवघड वाटत नाही. अभिक्रियांवरचे प्रश्न कमी प्रमाणात असले तरी प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रिया विचारलेल्या असल्यामुळे हुकमी गुण मिळू शकतात. त्यामुळे अशा अभिक्रिया अभ्यासणे फायद्याचे आहे.    विज्ञानाच्या इतर घटकांच्या तुलनेत या विषयामध्ये एक शिस्तबद्धता आहे. या विषयावर साधारणपणे ३ ते ६ प्रश्न विचारले जातात आणि तेही वर मांडलेल्या मुद्दय़ांवरच! त्यामुळे कमी गुण असले तरी योग्य दृष्टिकोनातून अभ्यास केला तर ते सगळेच मिळविणे शक्य आहे.

रसायनशास्त्राच्या प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यास अवघड प्रश्न सोडवायला एलिमिनेशन पद्धत उपयोगी ठरते हे दिसून येते. उत्तर माहीत नसेल आणि बहुविधानी प्रश्नांमध्ये किमान दोन चुकीची उत्तरे बाद करता आली तर योग्य उत्तर कॉमन सेन्सने देणे शक्य होऊ शकते हे लक्षात ठेवावे.

भौतिकशास्त्र

मागील प्रश्नपत्रिकांचे एकत्रितपणे बारकाईने विश्लेषण केले तर लक्षात येते की भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारित असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणितेसुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्या उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.

बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी सोपे ठरतात. या घटकांची टिप्पणे ढोबळ मुद्दय़ांच्या स्वरूपात पुरेशी ठरतात. त्यामुळे सर्व मिळून एक ते दोन पानांमध्ये मावतील इतकी टिप्पणे काढली तरी चांगली तयारी होते.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे हे

मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.

सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठय़ा घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती या घटकांवर गणिते विचारण्यात येतात. मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ही गणिते कमी वेळात सोडविता येतात. गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.

विज्ञान विषयाच्या संज्ञा व संकल्पना यांची ओळख असलेल्या उमेदवारांसाठी कम्फर्ट झोनमधला वाटत असला तरीही आणि ज्यांची या घटकाशी फारशी दोस्ती नाही त्यांनीही अभ्यासक्रमाचा अभ्यास, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वाचन, आकलन, नोट्स, उजळणी या टप्प्यांबरोबर खास या घटकासाठी एक गोष्ट करणे आवश्यक आहे, ती म्हणजे जुने आणि नवे दोन्ही प्रश्न सोडवायचा सराव. किंबहुना या घटकाची उजळणीच प्रश्न सोडविण्यातून करणे जास्त उपयोगी ठरते.

 

सामान्य विज्ञान घटक संदर्भ ग्रंथ –

  •   राज्य पाठय़पुस्तक मंडळाची पाचवी ते दहावीची पुस्तके
  •   राज्य पाठय़पुस्तक मंडळाची अकरावी, बारावीची जीवशास्त्राची पुस्तके
  •   ल्युसेटचे General Science हे पुस्तक
  •   के सागर प्रकाशन, दीपस्तंभ प्रकाशन आणि ज्ञानदीप प्रकाशनची या घटकावरील पुस्तके उपयुक्त आहेत. यातील आपल्यासाठी सोयीचे पुस्तक उमेदवारांनी निवडावे.

First Published on February 13, 2020 12:20 am

Web Title: mpsc exam study akp 94 13
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञान (न) आवडे सर्वाना
2 करिअर क्षितिज : जीनोम तंत्रज्ञान
3 यूपीएससीची तयारी : सामान्य विज्ञान – विश्लेषण महत्त्वाचे