08 April 2020

News Flash

चालू घडामोडी एक अनिवार्य पेपर

‘चालू घडामोडी’ हा सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमामधील नुसता काही गुणांसाठी विचारला जाणारा भाग नसून तो परीक्षेचाच एक ‘आधार’ आहे.

एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

पूर्वपरीक्षा पेपर एकमधील सामान्य अध्ययनच्या उपघटकांच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. हे सर्व विषय यापूर्वी कधीना कधी शालेय पाठय़पुस्तकांचा/ अभ्यासक्रमांचा भाग म्हणून माहीत असलेले, हाताळलेले असे होते. स्पर्धा परीक्षांना त्यांचे वेगळेपण देणारा आणि आजवरच्या शालेय/ महाविद्यालयीन जीवनाचा व्यक्तिपरत्वे स्र्३्रल्लं’ भाग असणारा ‘चालू घडामोडी’ हा घटक नव्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी म्हटले तर इंटरेस्टिंग आणि म्हटले तर आव्हानात्मक ठरतो. या आणि पुढील लेखामध्ये या घटकाचे महत्त्व, समज-गरसमज आणि तयारीची पद्धत याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

‘चालू घडामोडी’ हा सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमामधील नुसता काही गुणांसाठी विचारला जाणारा भाग नसून तो परीक्षेचाच एक ‘आधार’ आहे. चालू घडामोडींच्या अभ्यासाची व्याप्ती पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर वेढलेली आहे. हा नुसता एक घटक विषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला घटक आहे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा पाया बनला पाहिजे. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरएखादी राज्य- राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना असतेच हे समजून घ्यायला हवे. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक स्वतंत्र ‘अनिवार्य पेपर’ इतका महत्त्वाचा अभ्यास विषय आहे.

प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बघता बरेचसे प्रश्न हे राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडींविषयी विचारले जातात हे लक्षात येते. हे सगळे विषय अभ्यासक्रमात स्वतंत्रपणे समाविष्ट आहेत आणि या विषयांच्या चालू घडामोडींच्या आधारे त्यांचे मूलभूत आयाम किंवा पारंपरिक संदर्भ विचारले जातात. त्यामुळे प्रथमदर्शनी फक्त चालू घडामोडींविषयी कमी प्रश्न विचारले गेले असे वाटू शकते. पण पूर्वपरीक्षेतील प्रत्येक घटक विषयावरील प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण केल्यावर लक्षात येते की, अभ्यासक्रमातील इतर घटक विषय व चालू घडामोडी यांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर बहुतांश उमेदवारांची प्रतिक्रिया असते, पेपर बराच अवघड होता, आपण वाचलेल्या पुस्तकांतून प्रश्नच येत नाहीत, चालू घडामोडींचा नेमका स्रोत कळत नाही, वगरे. तर मोजक्या उमेदवारांची प्रतिक्रिया असते, पेपर आव्हानात्मक आणि यूपीएससीच्या पेपर पॅटर्नचा होता. केलेला अभ्यास कामी आला. पेपर चांगला गेला. या दोन टोकाच्या प्रतिक्रियांतून उमेदवारांची नेमकी मानसिकता, अभ्यासाचा दृष्टिकोन आणि अभ्यास पद्धतीतील नेमका फरक दिसून येतो.

आयोगाची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते हे तांत्रिकदृष्टय़ा बरोबर आहे. पण एका शब्दात, एका वाक्यात उत्तरे द्या किंवा गाळलेल्या जागा भरा किंवा तारीख, घटना, नाव, नियुक्ती, समिती, अहवाल, तरतूद, शिफारस एवढय़ापुरती वस्तुनिष्ठ माहिती पाठ करून परीक्षा देता येईल अशी परिस्थिती नक्कीच नाही. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेही जात नाहीत. काही मोजके प्रश्न असे विचारले गेलेही असतील, पण वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्वपरीक्षा तुमच्या विश्लेषणात्मक माहितीची आणि अभ्यासाची परीक्षा असते. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या मागील विविध परीक्षांचे प्रश्नस्वरूप पाहून आपल्या अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे.

उमेदवारांचा एक नेहमीचा अनुभव असा आहे की, एका विषयाची, घडामोडीची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकात पाहिली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत हे जसेच्या तसे लागू पडते. एखादे-दुसरे गाइड पाहून किंवा एकच स्रोत हाताळा आणि अभ्यास संपवा हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की ही मर्यादा आपल्या लक्षात येते. अशा अभ्यासाने आपण स्पध्रेत टिकू शकणार नाही हेही जाणवते. त्यामुळे डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल, मनात कसलीही शंका न ठेवता अभ्यासासाठी वापरता येईल अशा संदर्भ साहित्याचा ‘क्लिअर कट चॉइस’ आपल्याकडे फार कमी आहे.

चालू घडामोडींची व्याप्ती फार आहे, असा समज करून घेतला की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनापासून ‘भरकटणे’ सोपे होते. व्याप्ती फार आहे असे समजून व्याप वाढवून घेण्यापेक्षा योग्य विश्लेषण करून आपला अभ्यास योग्य दिशेवर येईल याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा आणि कोणत्या संदर्भ साहित्यातून करायचा हा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. या प्रत्येक घटकाची टप्प्याटप्प्याने आपण चर्चा करू. इंडिया इअर बुक (इंग्रजी/हिंदी), लोकराज्य, योजना, स्पर्धा परीक्षांविषयक काही मासिके, चालू घडामोडींबाबतची विविध प्रकाशनांची पुस्तके, केंद्र आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अशी मोठी यादी संदर्भ साहित्य म्हणून सुचविली जाते, पण नेमके काय, कसे आणि किती, या विषयी सविस्तर चर्चा पुढच्या लेखात करू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:06 am

Web Title: mpsc exam study akp 94 14
Next Stories
1 सामान्य विज्ञान उर्वरित घटकांची तयारी
2 एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञान (न) आवडे सर्वाना
3 करिअर क्षितिज : जीनोम तंत्रज्ञान
Just Now!
X