एमपीएससी मंत्र : फारूक नाईकवाडे

पूर्वपरीक्षेमध्ये भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित केलेला आहे. ‘जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल’ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या घटकावर विचारलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे तयारीचे नियोजन करणे आवश्यक आहे. या विश्लेषणावरून तयारी करण्यासाठी लक्षात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

सरळसोट एका शब्दा / वाक्याचा पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण खूपच कमी आहे. बहुविधानी प्रश्नांमध्ये योग्य, अयोग्य पर्याय शोधणे अशा ठरावीक स्वरूपाबरोबरच कथन-कारण शोधणे, निष्कर्ष शोधणे असेही प्रश्न विचारलेले दिसून येतात. यामध्ये आयोग बहुतांश वेळा जोड्या लावणे प्रकारच्या प्रश्नांवर भर देताना आढळतो.

बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप पाहता मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ते आत्मविश्वासाने सोडविता येतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा आधी मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि त्यानंतर नकाशावर आधारित अभ्यास व शेवटी तथ्यात्मक अभ्यास अशा क्रमाने करणे फायदेशीर ठरते.  भूगोलाच्या शाखा, सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक या बाबींवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. नकाशावर किंवा आकृत्यांवर आधारित किमान एका प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या भूगोलावरही किमान एक प्रश्न विचारलेला दिसतो.

उर्वरित अभ्यासक्रमावरील घटकांवरील प्रश्नांची संख्या दरवर्षी बदलताना दिसत असली तरी एखाद्या वर्षी कोणता घटक जास्त किंवा कमी महत्त्वाचा असेल याचा मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून अंदाज घेणे शक्य आहे. त्यामुळे त्या त्या वर्षीच्या अपेक्षित मुद्द्यांचा अंदाज बांधता येऊ शकतो.

भूरूपे, जागतिक हवामान, महाराष्ट्रातील व देशातील महत्त्वाची शहरे, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे भाग नेहमीच कटढ यादीत असले पाहिजेत.  नकाशा समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून बहुविधानी प्रश्न सोडविण्यास मदत होते. तसेच वारंवार आकृत्या / चित्र पाहत उजळणी केल्यास भूरूपे या घटकावरील कोणत्याही प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. या विश्लेषणाच्या आधारे या घटाकाची तयारी कशी करता येईल ते या व पुढील लेखामध्ये पाहू.

संकल्पनात्मक भूगोल

भूगोलाच्या पायाभूत महत्त्वाच्या संकल्पना वैज्ञानिक आहेत. त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ, इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार, इ. बाबी सोडता येतील.

जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वादळे, विशिष्ट भूरूपे, वाऱ्यांचे प्रकार यांच्यासाठी असलेली वेगवेगळी नावे यांची कोष्टके  तयार करून टिपणे काढता येतील.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ॠतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी, इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

 

कोणत्याही भौगोलिक घटना / प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत –

भौगोलिक आणि वातावरणीय पार्श्वभूमी    ; घटना घडू शकते/घडते ती भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/प्रक्रियेचे परिणाम; विशेषत: एखाद्या जागतिक घटना/प्रक्रियेचा भारतातील वातावरण, मान्सून यांवर होणारा परिणाम (उदा. अल निनो, जेट प्रवाह); पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना / प्रक्रिया (current events)

भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्द्यांच्या वा कोष्टकाच्या स्वरूपात टिपणे काढता येतील. प्रत्येक कारकाच्या अपक्षयामुळे आणि संचयामुळे होणारी भूरूपे अशी विभागणी करता येईल. प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे. अशा भूरूपांच्या आकृत्यांवर प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भूगोलातील मूलभूत आणि पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक  संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात भूगोलाचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. एक भाग पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे आणि दुसरा भाग भारताच्या भूगोलातील एकक म्हणून महाराष्ट्राच्या अभ्यासाचा आहे. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या भौगोलिक विभाग, कृषी हवामान विभाग, नदीप्रणाली, खनिज संपत्ती, आर्थिक भूगोल, लोकसंख्येचे पैलू, आदीम जमाती, इ.चा अभ्यास ठेवायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये भौगोलिक, प्राकृतिक, आर्थिक, लोकसंख्या, इ. बाबींचा संपूर्ण भारतातील या वैशिष्ट्यांशी संबंधित एक घटक म्हणून आणि इतर घटकांशी तुलना करून विश्लेषणात्मक असा अभ्यास अपेक्षित आहे.