21 September 2020

News Flash

महाराष्ट्र विधानसभा चालू घडामोडी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापना यंदा भलतीच रोमांचक ठरली.

प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व सरकार स्थापना यंदा भलतीच रोमांचक ठरली. भल्याभल्यांनी बांधलेले अंदाज ढासळत, राजकारणाची नवी समीकरणे लिहिली गेली. या इतक्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींबाबत पुढील काही परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता गृहीत धरणे गरजेचे आहे. या घटनांबाबत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील याबाबत या पुढील काही लेखांमध्ये सराव प्रश्न देण्यात येतील. यातील महत्त्वाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे.

 

 •   २१ ऑक्टोबर २०१९ – एका टप्प्यात निवडणूक संपन्न
 •   २४ ऑक्टोबर २०१९ – निकाल जाहीर. जागा- भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस व इतर – ४४
 •     ९ नोव्हेंबर २०१९ – १३व्या विधानसभेची मुदत संपली
 •   १० नोव्हेंबर २०१९ – सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविली.
 •  १२ नोव्हेंबर २०१९ – शिवसेना सत्ता स्थापन करण्यास असमर्थ. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू.
 •     २३ नोव्हेंबर २०१९ – राष्ट्रपती राजवट मागे. भाजपच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी
 •     २६ नोव्हेंबर २०१९ –  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल – सदस्यांचा शपथविधी पूर्ण करावा, प्रोटेम अध्यक्षांच्या देखरेखीत पटलावर     बहुमत चाचणी  (floor test)) घ्यावी व तिचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा.
 •    २७ नोव्हेंबर २०१९ – १४ व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू. सदस्यांचा शपथविधी.
 •    २८ नोव्हेंबर २०१९ – मंत्री परिषदेचा शपथविधी
 •   २७ नोव्हेंबर २०१९ – विश्वास ठराव संमत

 

   प्रश्न १: महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत पुढील विधानांचा विचार करा.

 • अ.      १ मे १९६० रोजी स्थापना झाली.
 • ब.      २७ नोव्हेंबर २०१९ रोजी १३वी विधानसभा अस्तित्वात आली.
 • क.      राज्यघटनेच्या कलम १६८अन्वये राज्यांच्या विधान मंडळांची रचना विहित केलेली आहे.
 • ड.      राज्यघटनेच्या कलम १६९अन्वये विधानसभांचा कालावधी पाच वष्रे इतका निश्चित करण्यात आला आहे.

वरीलपकी कोणते / ती विधान / ने अचूक आहेत?

पर्याय

१) अ आणि ड       २) अ आणि क   ३) अ, ब आणि क  ४) ब, क आणि ड

 

 प्रश्न २ – राज्य विधान मंडळाच्या सदस्य संख्येबाबत पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

 • १)      राज्यघटनेच्या कलम १७० अन्वये राज्यांच्या विधानसभांची किमान व कमाल सदस्य संख्या अनुक्रमे ६० व ५०० इतकी ठरविण्यात आली आहे.
 • २)      महाराष्ट्र विधानसभेची कमाल सदस्य संख्या २८९ इतकी आहे.
 • ३)      राज्यघटनेच्या कलम १७० अन्वये राज्यांच्या विधान परिषदांची किमान व कमाल सदस्य संख्या अनुक्रमे ४० व २५० इतकी ठरविण्यात आली आहे.
 • ४)      महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ७८ इतकी आहे.

 

प्रश्न ३ -महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?

 • १)      शरद पवार हे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते.
 • २)      सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
 • ३)      विधानसभा आणि मुख्यमंत्री पदाचा संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
 • ४)      वसंतराव नाईक हे तीन विधानसभांमध्ये या पदावर कार्य करणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

 

  प्रश्न ४ – राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पुढीलपकी कोणते विधान अयोग्य आहे?

 • १)      मंत्रिमंडळाच्या सदस्यांची संख्या किमान १२ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
 • २)      मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राज्याच्या विधान मंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक असते.
 • ३)      राज्याच्या विधान मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य मुख्यमंत्री होऊ शकतो.
 • ४)      एक्याण्णवाव्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाच्या सदस्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्के इतकी निश्चित करण्यात आली.

 

उत्तरे व स्पष्टीकरणे –

प्र. क्र. १ – योग्य उत्तराचा पर्याय क्र. (३) राज्यघटनेच्या कलम १७२अन्वये विधानसभांचा कालावधी पाच वष्रे इतका निश्चित करण्यात आला आहे. जर मुदतीपूर्वी विधानसभा विसर्जति झाली तर हा कालावधी आपोआपच कमी होतो. आणीबाणीच्या काळात संसद कायदा करून एका वेळी कमाल एका वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभेची मुदत वाढवू शकते. विधानसभेचा कालावधी हा पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मोजला जातो.

  प्र. क्र. २ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.  (३) राज्यघटनेच्या कलम १७० अन्वये राज्यांच्या विधान परिषदांची किमान सदस्य संख्या ४० इतकी ठरविण्यात आली आहे. तर विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या ही संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावी अशी तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची कमाल सदस्य संख्या २८९ इतकी आहे. यामध्ये  निवडून आलेले २८८ सदस्य तर १ नामनिर्देशित अँग्लो इंडियन सदस्य समाविष्ट असतो. अँग्लो इंडियन सदस्याचे नामनिर्देशन राज्यपाल करतात.

 प्र.क्र. ३ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.  (१) वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळासाठी (११ वष्रे ७७ दिवस) मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी कालावधीसाठी (तीन दिवस) कार्यरत होते.

वसंतराव नाईक आणि शरद पवार यांनी तीन विधानसभांमध्ये या पदावर कार्य केले. मात्र वसंतराव नाईक यांनी दुसरी ते चौथी अशा सलग तीन विधानसभांमध्ये या पदावर कार्य केले. सहाव्या आणि सातव्या विधानसभेमध्ये सर्वाधिक (तीन) मुख्यमंत्री कार्यरत होते. आठव्या विधानसभेतही तीन मुख्यमंत्री असले तरी त्यातील दोन कार्यकाळ हे शरद पवार या एकाच व्यक्तीने पदावर कार्य केले होते.

 प्र. क्र. ४ – योग्य उत्तराचा पर्याय क्र. (२) मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राज्याच्या विधान मंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक नाही.

घटनेच्या कलम १६४(४) अन्वये मंत्रिपदावर शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीमध्ये कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्तीही मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:52 am

Web Title: mpsc exam study general knowledge akp 94
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : कृषी सेवा परीक्षा सामान्य अध्ययन प्रश्न विश्लेषण
2 उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे
3 एमपीएससी मंत्र : कृषिसेवा पूर्वपरीक्षा इंग्रजीची तयारी
Just Now!
X