फारुक नाईकवाडे

पाणथळ जमिनींसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर कराराकडून महाराष्ट्रातील लोणार सरोवरास रामसर स्थळाचा (साइट) दर्जा देण्यात आल्याची माहिती रामसर माहिती प्रणालीवर मागील आठवडय़ामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. सन २०१९पासून भारतातील एकूण १४ पाणथळ प्रदेशांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणसंबंधी चालू घडामोडींच्या दृष्टीने हा मुद्दा बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. याबाबतच्या परीक्षोपयोगी मुद्द्यांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

रामसर साइट्स

पाणथळ जमिनींसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर करारांतर्गत पाणथळ जमिनी किंवा प्रदेशांना आंतरराष्ट्रीय दृष्टय़ा महत्त्वाचे म्हणून मान्यता मिळाल्यावर त्यांना रामसर साइट्स असे म्हटले जाते.

आंतरराष्ट्रीय सहकार्य व राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील उपक्रमांच्या माध्यमातून पाणथळ प्रदेशांचे संवर्धन व समंजस वापर करणे आणि त्यांचा शाश्वत विकास घडवून आणण्यामध्ये योगदान देणे हा या कराराचा मुख्य हेतू आहे,

इराणच्या रामसर शहरामध्ये २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ जमिनींवरील आंतरराष्ट्रीय करारास मान्यता मिळाली आणि तो १ डिसेंबर १९७५ रोजी अमलात आला. भारतामध्ये हा करार १ फेब्रुवारी १९८२ रोजी लागू झाला. तेव्हापासून आतापर्यंत भारतामधील एकूण ४१ पाणथळ प्रदेशांना रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाली आहे. या प्रदेशांमध्ये एकूण १०,७१,८६१ हेक्टर इतके क्षेत्र गोडय़ा पाण्याने व्यापले आहे.

रामसर करारामध्ये सहभागी देशांनी आपल्या क्षेत्रातील किमान एक पाणथळ प्रदेश रामसर साइट म्हणून (आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पाणथळ प्रदेश म्हणून) घोषित करणे आवश्यक असते. आणि अशा प्रदेशाचा शाश्वत पद्धतीने विकास व व्यवस्थापन करणे अपेक्षित असते.

रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाल्यावर अशा प्रदेशांचे संवर्धन व व्यवस्थापनामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक व तांत्रिक सहकार्य उपलब्ध होते. तसेच या प्रदेशांचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य व त्यातून रोजगार निर्मिती, पर्यटन विकास अशा बाबी साध्य करणे शक्य होते.

भारतातील रामसर साइट्स

  • सद्य:स्थितीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक आठ रामसर साइट्स आहेत.
  • नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यतील नांदूर मधमेश्वर धरणाच्या तलावाचे क्षेत्र महाराष्ट्रातील पहिली रामसर साइट आहे तर लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर साइट आहे.
  • लोणार सरोवर ही देशातील ४१वी आणि जगातील एकूण रामसर स्थळांपैकी २४४१वी साइट आहे.

भारतातील रामसर साइट्स (कालानुक्रमे)

१ चिल्का सरोवर (ओदिशा)

२ केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)

३ हरीके (पंजाब)

४ लोकटाक सरोवर (मणिपूर)

५ सांबर सरोवर (राजस्थान)

६ वुलर सरोवर (जम्मू व काश्मीर)

७ कांजळी (पंजाब)

८ रोपड (पंजाब)

९ अष्टमुदी  (केरळ)

१० भितरकणिका खारभूमी  (ओदिशा)

११ भोज (मध्य प्रदेश)

१२ दीपोर बील (आसाम)

१३ पूर्व कोलकाता (पश्चिम बंगाल)

१४ कोलेरु सरोवर (आंध्र प्रदेश)

१५ कालिमर अभयारण्य (तमिळनाडू)

१६ पोंग दाम सरोवर (हिमाचल प्रदेश)

१७ सष्टमकोट्टा (केरळ)

१८ त्सोमोरीरी (लडाख)

१९ वेंबनाड झ्र् कोई (केरळ)

२० चंद्र ताल (हिमाचल प्रदेश)

२१ होक्केरा (जम्मू व काश्मीर)

२२ रेणुका सरोवर (हिमाचल प्रदेश)

२३ रुद्रसागर सरोवर (त्रिपुरा)

२४ सुरीनसार झ्र् मानसर सरोवरे

(जम्मू व काश्मीर)

२५ उध्र्व गंगा (ब्रिजपूर ते नरोरा प्रवाह)

(उत्तर प्रदेश)

२६ नल सरोवर पक्षी अभयारण्य (गुजरात)

२७ संदरबन (पश्चिम बंगाल)

२८ नांदूर मधमेश्वर (महाराष्ट्र)

२९ नवाबगंज पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

३० सरसाई नवार सरोवर (उत्तर प्रदेश)

३१ बियास संवर्धित क्षेत्र (पंजाब)

३२ केशोपूर मियानी (पंजाब)

३३ नानगल वन्यजीव अभयारण्य (पंजाब)

३४ सांदी पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

३५ समासपूर पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

३६ पार्वती अरंगा पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

३७ समन पक्षी अभयारण्य  (उत्तर प्रदेश)

३८ आसन बॅरेज (उत्तराखंड)

३९ कंवर ताल/ कबर ताल सरोवर (बिहार)

४० सुर सरोवर ( उत्तर प्रदेश)

४१ लोणार सरोवर (महाराष्ट्र)

मांत्रू रेकॉर्ड (Montreux Record)

रामसर साइट्सपैकी ज्या ठिकाणी तांत्रिक विकास, प्रदूषण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे परिस्थितिकीय बदल घडले आहेत, घडत आहेत किंवा घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची विशेष यादी म्हणजे मांत्रू रेकॉर्ड.

भारतातील केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकटाक सरोवर ही दोन ठिकाणे मांत्रू रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहेत. चिल्का सरोवर यामध्ये समाविष्ट होते मात्र कालांतराने काढण्यात आले.

पाणथळ प्रदेशांचे महत्त्व

  • पाणथळ जमिनींमध्ये नद्या, सरोवरे, किनारी प्रदेश, मानव निर्मित जलसाठे, मीठागरे, खारजमिनी, प्रवाळ भित्ती अशा बहुविध पाणथळ प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या प्रदेशांना मानवी आणि एकूणच जीवसृष्टीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगातील सजीवांच्या प्रजातींपैकी ४० टक्के प्रजाती या पाणथळ जमिनींमध्ये राहतात किंवा ती त्यांची प्रजनन क्षेत्रे आहेत.
  • या प्रदेशांमध्ये मोठय़ा प्रमाणात जैवविविधता सामावली आहे.
  • प्राणी व वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींना अधिवास पुरविणे, पुरांची तीव्रता कमी करणे, गोडय़ा पाण्याची गुणवत्ता राखणे, किनारी प्रदेशांचे संरक्षण, प्रदूषके अवशोषित करणे अशा माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
  • वाहतूक, पर्यटन, शेती व मत्स्यपालन अशा आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या बाबी बहुतांशपणे पाणथळ जमिनींवर अवलंबून आहेत.