ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालय, विज्ञान केंद्रे मदत करतात. समाजात घडत असणारे नित्य नवे बदल, संग्रहालयातील कलावस्तूंतून दृग्गोचर होतात. विज्ञान केंद्रांमुळे सर्वसामान्य जनता विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगतीबद्दल जाणती होते. संबंधित विषयाच्या माहितीत मोलाची भर घालणाऱ्या देशातील महत्त्वाच्या वस्तुसंग्रहालयांची ओळख करून देणारे मासिक सदर.
जगात ज्ञात असे पहिले म्युझियम ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात इजिप्तमध्ये अलेक्झान्ड्रीया विद्यापीठात स्थापन झाले. सुरुवातीच्या काळात संग्रहालयांचे महत्त्व धार्मिक आणि ऐतिहासिक असे, मात्र आज आधुनिक जीवनशैलीचे जीवन जगताना इतिहासाशी आपली नाळ कायम राहण्याच्या दृष्टीने ही संग्रहालये आपल्याला मदत करतात. या लेखात आपण संग्रहालायांशी संबंधित ‘म्युझिऑलॉजी’ म्हणजेच ‘म्युझियम स्टडीज’ किंवा ‘संग्रहालयविषयक अभ्यास’, संग्रहालय अनुषंगिक कामकाज आणि व्यवस्थापन, या कार्यक्षेत्राबद्दल आणि त्यातील नोकरीच्या संधींबद्दल जाणून घेऊ. खरं तर म्युझिऑलॉजी हा अभ्यासविषय भारतात तितकासा प्रचलित नाही. ज्या विद्यार्थ्यांना इतिहास किंवा विज्ञान विषयात रस आहे आणि त्यांच्याशी संबंधित संग्रहणीय वस्तूंचे, संस्कृतीचे जतन करण्याचा छंद आहे किंवा ज्यांना कला विषयात गती आणि स्वारस्य आहे अशा विद्यार्थ्यांनी जरूर म्युझिऑलॉजीचा
अभ्यास करावा.
म्युझिऑलॉजिस्ट म्हणून यशस्वी होण्यासाठी संदर्भ विषयाची आवड आणि औत्सुक्य गरजेचे आहे. ग्रंथपाल, इतिहास अभ्यासक, पुराभिलेखपाल अशा पदांवर काम करणाऱ्या व्यक्तीही इच्छा असेल तर संग्रहालय व्यवस्थापन या कार्यक्षेत्रात काम करू शकतात. या क्षेत्रात संशोधनात्मक कार्याची गरज असल्याने साहजिकच येथे प्रगती साधणे आव्हानात्मक आणि रंजक ठरते.
कोलकाता विद्यापीठाच्या व्याख्यात्या डॉ. महुआ चक्रवर्ती यांच्या मते, ज्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक परंपरा जाणून घेऊन त्यांची आस्थापूर्वक, निगुतीने जपणूक करण्याची आवड आहे त्यांनी म्युझिऑलॉजी हा अभ्यासविषय निवडावा. कारण हा विषय रोचक वाटला तरी यात झोकून देऊन काम करण्याची
गरज असते.
बहुतांश वस्तुसंग्रहालायांतून या शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर्वानुभव मिळावा यासाठी कामाची संधी दिली जाते. उदा. संग्रहालयातील वस्तूंची देखभाल, प्राचीन कागदपत्रांचे दफ्तर सांभाळणे, प्रदर्शनांची मांडणी, संग्रहालयाचे अर्थकारण वगरे. अशा विविध कामांतून म्युझिऑलॉजिस्ट म्हणून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते.
एका विशिष्ट काळातील किंवा देशातील किंवा समाजाचा एखादा ठराविक घटक डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी निगडित पुरातन ऐतिहासिक वस्तूंचे, माहितीचे जतन करून, जनसामान्यांपर्यंत ती संग्रहालयांमार्फत पोहोचवणे हे संग्रहालय तज्ज्ञांचे प्रमुख लक्ष्य असते.
म्युझियम क्युरेटर (संग्रहालय अभिरक्षक)/ ‘म्युझिऑलॉजिस्ट’
संग्राह्य वस्तूंची नोंद, परीक्षण, स्वच्छता, जपणूक, प्रदर्शकांसमोर मांडणे किंवा सांभाळ करणे. ही सर्व कामे क्युरेटरकडून अपेक्षित असतात. शक्यतो त्या त्या ठिकाणांहून कलावस्तू मिळवणे, त्यांचे प्रदर्शन भरवणे किंवा जतन करणे. संग्रहित वस्तूंचे उगमस्थान, दुर्मीळतेबद्दल विवेचन आणि जतन कालावधी या गोष्टींची नोंद ठेवणे निकडीचे असते. सामान्यत: ‘क्युरेटर’ व्यक्ती नॅचरल हिस्ट्री अभ्यासक किंवा वस्त्र, टेराकोटा, धातू यांतील तज्ज्ञ असतात.
पुनरुज्जीवक किंवा रिस्टोअरर
या पदावरील व्यक्तींना कलात्मकतेचे ज्ञान असते, शिवाय नेमक्या कोणत्या घटकामुळे कलावस्तूंचे सौंदर्य धोक्यात येत आहे, याचीही त्यांना उत्तम जाण असते. कलाकृतींचे अस्सल देखणेपण किंवा प्राचीन स्मारकांची जुनी शान, चित्रकृतींना पूर्वीचे मूल्य मिळवून देण्याची करामत ‘रिस्टोअरर’ना साधायची असते. अर्थात यासाठी गरज असते संयमाची, तल्लख निरीक्षणाची आणि कामातील नेमकेपणाची. ज्या संग्राह्य वस्तूंना अशा पुनरुज्जीवनाची गरज भासते, त्या म्हणजे दुर्मीळ चित्रे, भित्तीचित्रे, वस्त्र प्रावरणे, जीवाश्म, पुतळे, स्मारके, प्राचीन शस्त्रात्रे, कागदपत्रे वगरे. क्षती पोहोचलेल्या कलावस्तूंचे तंत्रशुद्ध परीक्षण करणे, त्या कोणत्या मूलभूत पदार्थानी बनल्या आहेत, याचा शोध घेणे, त्यांची झीज किवा तुटणं-फुटणं होण्यामागील कारण शोधणे, अशा वस्तू पूर्वस्थितीत आणण्यासाठी उपाययोजना करणे. डागडुजी, स्वच्छता, वाíनशचा जुना थर काढून नवीन चढवणे, फेरफार किंवा सुधारणा करणे, चित्राचे सौंदर्य कायम राखून जुन्या चौकटी (फ्रेम्स) बदलणे, वातावरणातील बदलांपासून (पाऊस, थंडी, ऊन)संग्रहित वस्तूंचे रक्षण करणे. या प्रक्रिया करताना कलावस्तूची अभिजातता, ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवणे महत्त्वाचे ठरते.
उत्तम संग्रहालय तज्ज्ञ बनण्यासाठी नवनवीन माहिती आत्मसात करण्याची व विश्लेषण करण्याची क्षमता, कलात्मकता व रंगसंगतीचे योग्य ज्ञान, समुहात काम करण्याचे कौशल्य, इतिहासाबद्दल जाण आणि भावनिक जवळीक, संयम, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रभावी जनसंपर्क असणे आवश्यक आहे. परदेशी भाषा शिक्षण असल्यास फार उत्तम. उदा. पíशयन, अरेबिक, ग्रीक, जर्मन, फ्रेंच, इटालियन वगरे.
प्रमुख शिक्षणसंस्था
* नॅशनल म्युझियम इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट, कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड म्युझिऑलॉजी, नवी दिल्ली.
* कोलकाता युनिव्हर्सटिी, कोलकाता : एम.ए. – म्युझिऑलॉजी, एम.एस्सी – म्युझिऑलॉजी.
* महाराजा सयाजीराव युनिव्हर्सटिी, बडोदा.
* नॅशनल म्युझियम इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्ट्री ऑफ आर्ट, कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड म्युझिऑलॉजी, नवी दिल्ली.
‘पुरावशेषांचे जतन’ ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक आणि मनुष्यबळ विकास खात्यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या या शिक्षणसंस्थेत निरनिराळे शिक्षणक्रम शिकविले जातात. पीएच.डी. (कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड रिस्टोअरेशन ऑफ वर्क्‍स ऑफ आर्ट), पीएच.डी. (म्युझिऑलॉजी), एम.ए.(कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड रिस्टोअरेशन ऑफ वर्क्‍स ऑफ आर्ट), एम.ए. (म्युझिऑलॉजी), आर्ट अ‍ॅण्ड कल्चर प्रमाणपत्र अभ्यासक्रम. संस्थेच्या संग्रहालयातून, ‘म्युझिऑलॉजी’च्या विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ मिळतो, ही या संस्थेत शिक्षण घेण्यामागची जमेची बाजू म्हणता येईल. संग्रहालयासाठी आवश्यक असणारे उत्तम संरक्षक (कॉन्झव्‍‌र्हेटर्स), पुनरुज्जीवक (रिस्टोअरर) देशातच घडवणे हे संस्थेचे ध्येय आहे.
नोकरीच्या संधी
भारतातील हजाराहून अधिक संग्रहालयांतून विविध पदांसाठी अनुभवी उमेदवारांची गरज भासते. केंद्र सरकारी, राज्य सरकारी, जिल्हास्तरीय संग्रहालयातून नोकरी मिळवण्यासाठी यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन या स्पर्धा परीक्षा देणे आवश्यक आहे. विविध विश्वस्त संस्थांकडून चालवली जाणारी  किंवा खासगी मालकीची संग्रहालये, उदा. संस्कृती फाउण्डेशन, अझीझ भट म्युझियम, कारगिल, ओ.एन.जी.सी. ऑईल म्युझियम, गुवाहाटी, यातही नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
मित्रहो, एखादे संग्रहालय पाहताना आपल्या लक्षातही येत नाही की, संग्रहालय उभारणी आणि त्यातील दैनंदिन कामकाजासाठी किती व्यक्तींचा हातभार लागत असेल. सामान्यत: संग्रहालयात खालील हुद्दय़ांवरील व्यक्ती कार्यरत असतात-
संचालक – या पदावरील व्यक्ती संग्रहालयाच्या सर्वेसर्वा असतात आणि जनमानसात संग्रहालयाचे प्रतिनिधित्व करतात. कामकाज सुरळीत चालावे याची सर्व जबाबदारी या पदावरील व्यक्तीवर असते. संग्रहालयाच्या कोणत्याही विभागात कोणत्याही मदतीची गरज असेल तर ती यांना पूर्ण करावी लागते. लोकसंग्राहक, मनमिळाऊ, कार्यतत्पर, पद्धतशीर स्वभावाच्या व्यक्ती हे पद योग्य प्रकारे सांभाळू शकतात.
क्युरेटर – या व्यक्ती संग्रहालयासाठी शक्य असेल तिथून कलावस्तू किंवा संग्रहणीय वस्तू जमवण्याचे काम करतात. जमवलेल्या वस्तूंची निगा राखतात, त्या वस्तू प्रदर्शनीय बनवून जतन करतात. संग्रहालयातील वस्तूंची नोंद ठेवण्याच्या कामातही या व्यक्ती मदत करतात. शोधक वृत्तीच्या, वाचन-लेखनाची आवड असलेल्या व्यक्ती चांगल्या ‘क्युरेटर’ बनू शकतात.
रजिस्ट्रार – संग्रहालयात मांडलेल्या तसेच जतन केलेल्या सर्व वस्तूंची अद्ययावत नोंद या व्यक्ती ठेवतात. सर्व वस्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी घेतात. क्युरेटर आणि ग्राफिक डिझायनर यांच्या मदतीने ‘कॅटलॉग’ बनवतात. कर्तव्यदक्ष, मेहनती व्यक्ती हे काम उत्तमप्रकारे करू शकतात.
म्युझियम एज्युकेटर – संग्रहालयात येणाऱ्या दर्शकांसाठी या व्यक्ती विविध कार्यक्रम आखतात. प्रदर्शनीय वस्तूंमध्ये भर घालण्यासाठी क्युरेटरसोबत काम करतात. दर्शकांना माहिती देणाऱ्या संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवतात.
ग्राफिक डिझायनर – संग्रहालयाची माहिती देणारी पोस्टर्स, ब्रोशर्स हाताने किंवा संगणकाच्या साहाय्याने बनवणे, संग्रहालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या मदतीने जाहिराती बनवणे, कॅटलॉग बनवणे ही कामे या व्यक्तींना पार पाडावी लागतात.
एक्झिबिट डिझायनर – वस्तूंची संख्या, आकार तसेच संग्रहालयातील दालनाची संख्या व आकार लक्षात घेऊन वस्तूंची मांडणी करणे, दालनाच्या िभतींचा रंग, प्रकाशव्यवस्था यांचेही भान राखणे, कलावस्तूंची िभतीवरील किंवा जमिनीवर
मांडणी करणे.
प्रीपरेटर – या व्यक्ती एक्झीबिट डिझायनरना कामात मदत करतात. प्रदर्शनासाठी वस्तूंची मांडणी काळजीपूर्वक करतात.
जनसंपर्क अधिकारी – संग्रहालयाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे काम या व्यक्ती करतात. संग्रहालयाच्या वतीने एखादी उद््घोषणा किंवा निर्णय प्रसृत करतात. ग्राफिक डिझायनरना पोस्टर्स, ब्रोशर्स, जाहिराती बनवण्याच्या कामात
मदत करतात.
म्युझियम शॉप मॅनेजर – संग्रहालयातील ‘सॉवेनिअर (स्मरणचिन्ह) शॉप’ चालवण्याचे काम या व्यक्ती करतात.
म्युझियम प्रोटेक्शन स्टाफ – संग्रहालय, त्यातील वस्तू आणि दर्शक या सर्वाची सुरक्षा पाहण्याचे काम या
व्यक्तींचे असते.
लायब्ररीअन – संग्रहालयातील संदर्भ पुस्तके व
कागदपत्रे सांभाळणे.
स्लाइड लायब्ररीअन- संगणकीय स्लाइड, इमेजेस बनवणे तसेच दर्शकांना वेळोवेळी स्लाइडस, इमेजेस दाखवणे.
बििल्डग ग्राऊंड स्टाफ – संग्रहालयाच्या इमारतीची, दालनांची निगा, स्वच्छता राखणे, किरकोळ दुरुस्त्या पार पाडणे, आवाराची, बागेची काळजी घेणे.
डेव्हलपमेंट ऑफिसर – संग्रहालयासाठी निधी जमवणे, त्यासाठी दानशूर धनिक किंवा औद्योगिक कंपन्यांना भेटी देणे, सरकारी संस्था, सेवाभावी संस्थांकडून मदत गोळा करणे.
बिझनेस ऑफिसर – संग्रहालयाच्या आíथक बाबी सांभाळणे.
या लेखातून आपण ‘म्युझिऑलॉजी’ या विषयाची, यातील करिअर संधींची ओळख करून घेतली. आता यापुढील लेखांतून देशभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानसंपदेचा खजिना असलेल्या म्युझियम्सबाबत जाणून घेऊयात.                
geetazsoni@yahoo.co.in

palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!