गवयाचे पोर सुरातच रडते, असे म्हणतात. अतिशयोक्तीचा भाग सोडला तर त्या मुलावर लहानपणापासूनच सुरांचे आणि संगीताचे संस्कार होतात, त्यातून त्याची जडणघडण होत असते. गायक, संगीतकार आणि संगीत संयोजक असलेले मिथिलेश पाटणकर यांची आजी दिवंगत इंदुमती पाटणकर संगीतविशारद होत्या. वडील विश्वास पाटणकर संगीतकार तर आई वैशाली या कीर्तनकार आहेत. त्यामुळे संगीताचे आणि सुरांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित कुटुंबात काही वर्षांपूर्वी शिक्षण आणि नोकरी याला प्राधान्य असल्याने मिथिलेशच्या वडिलांनी नोकरी सांभाळूनच संगीताची आवड एक छंद म्हणून जोपासली. त्याकडे करिअर म्हणून त्यांना पाहता आले नाही. मिथिलेशने मात्र संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचे ठरविले.

मिथिलेश अवघे साडेतीन वर्षांचा असताना त्याने एका कार्यक्रमात ढोलकीची संगीतसाथ केली होती. आपल्या मुलाला संगीत, सुरांची आवड आहे याची जाणीव विश्वास आणि वैशाली यांना त्याच्या लहानपणीच झाली. त्यांनीही मुलाची आवड जोपासली, वृद्धिंगत केली आणि मिथिलेशनेही पुढे आपल्या घरातील संगीताचा वारसा जपला आणि वाढविलाही. शालेय जीवनात पं. गजाननबुवा जोशी आणि मधुकर जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले. पाचवीच्या मे महिन्याच्या सुट्टीपासून मिथिलेशच्या वडिलांनी त्याला प्रत्येक सुट्टीत एकेक वाद्य वाजवायला शिकविले. त्यामुळे लहान वयातच त्याला तबला, संवादिनी, गिटार, बासरी, सिंथसायझर आदी वाद्ये वाजविता येऊ लागली. केरोलिना जॉन यांच्याकडे ते पियानोही शिकले. नववीत असताना मिथिलेशने संगीतबद्ध केलेल्या ‘बहरु कळीयासी आला’ ही ध्वनिफीत प्रकाशित झाली. ध्वनिफितीतील आठ वेगवेगळ्या शैलींतील ही गाणी सुरेश वाडकर, अनिरुद्ध जोशी, मृदुला दाढे, रंजना जोगळेकर यांनी गायली होती. या गाण्यांचे आणि मिथिलेशचेही त्या वेळी कौतुक झाले, प्रसिद्धी मिळाली. पण तेव्हा आजच्यासारखी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे नसल्याने ती ध्वनिफीत आणि त्यातील गाणी श्रोत्यांपर्यंत जशी पोहोचायला पाहिजे होती तशी पोहोचू शकली नाहीत.

महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांतून संगीतसाथ करण्याचे काम मिथिलेश करत होता. अरुण दाते, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, श्रीधर फडके आदींना मिथिलेशनी की बोर्डवादक म्हणून संगीतसाथ केली. मात्र आपला खरा पिंड संगीतकार/संगीत संयोजक म्हणूनच आहे आणि याच क्षेत्रात काही तरी केले पाहिजे, असा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. वादक म्हणून काम करत असताना आपण या क्षेत्रात चांगले काम करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना मिळाला होताच. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या मुलाने नोकरीच केली पाहिजे, नोकरी सांभाळून या क्षेत्रात तुला काय पाहिजे ते कर अशी कोणतीही सक्ती मिथिलेशवर आई-बाबांनी केली नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत हातात काही काम नसतानाही आपल्याला आवडीच्या क्षेत्रात काम करता येते, याचे खूप मोठे समाधान आणि आनंद मिथिलेशला मिळाला.

हळूहळू मिथिलेशच्या नावाची प्रसिद्धी या क्षेत्रात झाली. सलील कुलकर्णी, अवधूत गुप्ते, मिलिंद इंगळे, कौशल इनामदार यांच्याबरोबर संगीत संयोजक म्हणून त्यांनी काम केले. पुढे ‘मोरया’, ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ आदी चित्रपटांसाठी संगीत संयोजक म्हणून तर ‘रंगीबेरंगी’, ‘बेभान’, ‘दु:खाचे श्वापद’ या चित्रपटांसाठी संगीतकार म्हणूनही काम केले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘इंडियन म्युझिक अ‍ॅरेंजमेंट डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले असून हौशी, नवोदित किंवा मान्यवर संगीतकाराने त्याचे गाणे या संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर त्याच्या मागणीनुसार त्या गाण्याचा संपूर्ण ट्रॅक मिथिलेश तयार करून देतात.

नोकरी किंवा अन्य काही व्यवसाय न करता संगीत क्षेत्रातच करिअर करायचे हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि घरच्यांकडूनही त्यांना संपूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. आज संगीतकार, संगीत संयोजक आणि नोटेशनकार म्हणून मिथिलेश यांनी आपली स्वतंत्र ओळख या क्षेत्रात निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे संगीत संयोजनमिथिलेश यांचेच होते. त्याआधी ‘आवाज महाराष्ट्राचा’, ‘गौरव महाराष्ट्राचा’, ‘सारेगमप’ आदी रिअ‍ॅलिटी शोसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम पाहिले. रंगभूमीवर सध्या सुरु असलेल्या ‘आमच्या हिचं प्रकरण’ या नाटकाचे संगीतही मिथिलेश यांचे आहे.

संगीत हे असे क्षेत्र आहे की येथे तुम्हाला स्वत:ला दररोज सिद्ध करावे लागते. तुम्ही संगीतबद्ध केलेले एखादे गाणे लोकप्रिय झाले, तुम्ही प्रसिद्ध झालात म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते. तुम्हाला सातत्याने गुणवत्तापूर्ण, कसदार काम करावेच लागते. असे काम तुमच्याकडून झाले नाही तर या क्षेत्रातून बाहेर फेकले जाण्याची भीती सतत असतेच आणि तुमच्या मागे अनेक लोक रांगेत उभेच असतातच. त्यामुळे इथे रोजची स्पर्धा आहे. तुम्हाला तुमची गुणवत्ता कायमच सिद्ध करावी लागते, असे मिथिलेश सांगतात.

शास्त्रीय, सुगम संगीत असो किंवा एखादे वाद्य वाजविण्याचे शिक्षण घेतलेले असो. तुमचे शिक्षण कधीही संपत नाही. सतत नवीन काही तरी शिकण्याची वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. तुमच्याकडील ज्ञानाची शिदोरी कधीही संपू देऊ नका. त्यात सतत नवीन भर टाकत राहा, काही ना काही नवीन शिकत राहा. तुमचा अनुभव, आत्तापर्यंत केलेले काम आणि व्यासंग तुम्हाला आयुष्यात नेहमीच उपयोगी पडतो, असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या तरुणाईला दिला.

– शेखर जोशी

shekhar.joshi@expressindia.com