पर्यावरण शिक्षण-संशोधनात कार्यरत असलेल्या पुण्यातील ‘इकॉलॉजिकल सोसायटी’ आणि मुंबईतील ‘पलाश एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणप्रेमींसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नैसर्गिक स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन व संवर्धन’ या अभ्यासक्रमाविषयी..
इंडोनेशियात पसरलेल्या जैवविविधतायुक्त वर्षांवनांचा झपाटय़ाने ऱ्हास होत आहे; आणि याला तुम्ही-आम्ही भारतीय कारणीभूत आहोत. आता तुम्ही म्हणाल, आमच्यापकी अनेकांनी इंडोनेशिया पाहिलेले नाही; तर तिथे होणाऱ्या जंगलतोडीशी आपला काय संबंध?
वास्तविक, भारतात पामतेलाला मागणी वाढल्यापासून इंडोनेशियातील जंगले नष्ट होऊ लागली आहेत. परकीय चलनाच्या मोहापायी इंडोनेशियात जंगल साफ करून त्या जमिनीवर पाम वृक्षांची लागवड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या पामतेलाची आयात करून भारतीय बाजारपेठ त्याला कारणीभूत ठरते आहे.
या आणि अशा अनेक पर्यावरणीय समस्या आपल्याला दिसतात, वाचनात वा ऐकिवात येतात. एकीकडे दुष्काळ, पूर अशा स्थानिक समस्या; तर दुसरीकडे हवामान बदलाची जागतिक समस्या.. या सगळ्याच विषयांची प्रसारमाध्यमांतून होणारी उलटसुलट चर्चा आपल्याला संभ्रमात टाकते. नेमकी कोणती बाजू खरी मानावी, या सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काही संबंध आहे का? असलाच तर या समस्यांवर उपाययोजना करण्यामध्ये मला, माझ्या कुटुंबाला खारीचा वाटा उचलता येईल का किंवा किमान या समस्या समजून-उमजून माझे मत तरी ठरवता यायला हवे, असे जर प्रकर्षांने वाटत असेल; तर पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाला पर्याय नाही.
पर्यावरण शिक्षण-संशोधनात कार्यरत असलेल्या पुण्यातील ‘इकॉलॉजिकल सोसायटी’ आणि मुंबईतील ‘पलाश एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थांच्या सहयोगाने घेतला जाणारा ‘नसर्गिक स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन व संवर्धन’ या विषयाचा अभ्यासक्रम (P.G. Diploma in Sustainable Natural Resource Management and Conservation) निसर्गवाचनाचे धडे देतो.
या अभ्यासक्रमाचे सात भाग केले आहेत. पहिल्या भागात जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंट, पर्वतीय प्रदेश, नद्या व जलप्रवाह, नसर्गिक व मानवनिर्मित पाणथळ जमिनी आणि समुद्र या नसर्गिक स्रोतांचा समावेश आहे. दुसऱ्या भागात पर्यावरणशास्त्रातील महत्त्वाच्या व्याख्या व संकल्पना, आजघडीला समाजासमोर असलेल्या समस्यांकडे पाहण्याचा पर्यावरणशास्त्रीय दृष्टिकोन, पर्यावरण आणि विकास, पर्यावरणीय अर्थशास्त्र, पर्यावरणाचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरणीय कायदा यांचा समावेश आहे. तिसरा भाग जलस्रोतांच्या व्यवस्थापनाविषयी आहे. यामध्ये नदी-समुद्राचे चलनवलन, पाण्याच्या विविध स्रोतांचा शाश्वत वापर, जलव्यवस्थापनाची आधुनिक तंत्रे, पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील व्यवस्थापन, नद्या व जलप्रवाहांचे पुनरुज्जीवन आणि पाणथळ जमिनींची निर्मिती, पुनरुज्जीवन व व्यवस्थापन हे विषय येतात. चौथा भाग गवताळ प्रदेश, त्यातील वन्यजीवन, या प्रदेशांत वसलेले समाज, त्यांचे या परिसंस्थेवरील अवलंबित्व, पाळीव जनावरांचा माळरानांवर होणारा परिणाम या बाबी लक्षात घेऊन गवताळ जमिनींचे शाश्वत व्यवस्थापन व पुनरुज्जीवन कसे करावे या विषयी आहे. जंगल परिसंस्थांमधील नसर्गिक साधनसंपत्ती, जंगल निर्माण करण्याचे पर्यावरणशास्त्र, भारतातील राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये, या संरक्षित परिसरातील स्थानिक समाज, त्यांचा जंगल व्यवस्थापनातील सहभाग, जंगलांचा शाश्वत वापर व ऱ्हास झालेल्या जंगलांचे पुनरुज्जीवन हे पाचव्या भागाचे विषय आहेत. भारताच्या तीन बाजूंना समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासात किनारी भागातील परिसंस्थांचे व्यवस्थापन हा सहावा भाग अनिवार्य ठरतो. किनारपट्टीचा भूगोल, किनारे व खाडय़ा आणि त्यांतील जैवविविधतेचे संवर्धन व पुनरुज्जीवन, किनारपट्टीवर मोठय़ा संख्येने असलेल्या पारंपरिक मच्छीमार समाजासह इतर समाजांकरिता इथल्या नैसर्गिक स्रोतांचे प्रादेशिक स्तरावर व्यवस्थापन या मुद्दय़ांचा या भागात परामर्श घेतला जाईल. सातवा भाग पर्वतीय परिसंस्थांविषयी आहे. यामध्ये भारतातील पर्वतरांगा, हिमालयाची निर्मिती व भौगोलिक वैशिष्टय़े, तेथील पर्यावरण, वन्यजीवन आणि या सगळ्यावर विसंबून विकसित झालेले लोकजीवन यांचा अभ्यास करून या परिसंस्थेचे व्यवस्थापन कसे करावे, याचे धडे दिले जातील.
प्रात्यक्षिक अभ्यासाकरिता गवताळ प्रदेश, किनारपट्टीच्या प्रदेशातील परिसंस्था, हिमालयातील परिसंस्था आणि जंगल परिसंस्थेला शैक्षणिक भेटी दिल्या जातील. त्याचप्रमाणे क्षेत्र सर्वेक्षणाची प्राथमिक तंत्रे, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण, स्थानिक पारंपरिक लोकजीवन आणि पर्यावरणाचा मेळ घालून त्यातून त्या परिसरासाठी विकासाचा आराखडा तयार करणे. तसेच दुरवस्थेत असलेल्या नैसर्गिक परिसंस्था जसे – जलप्रवाह, माळराने, खडकाळ पठारे, विविध प्रकारची जंगले यांच्या पुनरुज्जीवनाची तंत्रे समजून घेणे असे प्रकल्प अभ्यासणे यांचा यांचा प्रात्यक्षिकांमध्ये समावेश आहे.
पर्यावरणीय अर्थशास्त्र हा विषय सर्वसामान्यांकरिता महत्त्वाचा असूनही अद्याप फारसा परिचयाचा झालेला नाही. या विषयावरील साहित्य व अभ्यासक्रमही सहज उपलब्ध होत नाही. ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र’ म्हणजे नेमके काय याचा ऊहापोह या अभ्यासक्रमादरम्यान केला जातो.
केवळ पक्षीनिरीक्षण नाही किंवा नुसतेच वनस्पतीशास्त्र नाही; तर भौगोलिक विविधता, त्यातून निर्माण होणारी नैसर्गिक जैवविविधता आणि त्या-त्या नैसर्गिक परिस्थितीशी पिढय़ानपिढय़ा जुळवून घेत स्थानिक माणसांनी विकसित केलेली सांस्कृतिक विविधता यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यास हा अभ्यासक्रम साहाय्यभूत ठरेल.
अभ्यासक्रमात शिक्षक ‘आयत्या नोट्स’ देत नाहीत, विद्यार्थ्यांनी व्याख्याने व प्रात्यक्षिकांच्या वेळी नोंदी ठेवणे, महत्त्वाचे मुद्दे लिहून घेणे अपेक्षित आहे. अभ्यासाला मदत व्हावी म्हणून या विषयावरील पुस्तके वर्षभरात ‘लायब्ररी’मार्फत उपलब्ध करून दिली जातील. एक मात्र आवर्जून लक्षात घ्यायला हवे; हा अभ्यासक्रम नोकरीची, झटपट यशाची ग्वाही देत नाही; तर पुस्तकी अभ्यासाला प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभवी, तज्ज्ञ मार्गदर्शनाची जोड ही या अभ्यासक्रमाची खासियत.
एक वर्ष कालावधीच्या या पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग महिन्यातील तीन रविवारी मुंबईमध्ये भरविण्यात येतील. अभ्यासक्रमाला वयाची मर्यादा नाही, कोणत्याही शाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. अभ्यासक्रमामध्ये परीक्षा घेतली जात नाही, पण वर्षभरात दिले गेलेले वेगवेगळे प्रकल्प, शैक्षणिक भेटींचे अहवाल आणि गृहपाठ यामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांचे मूल्यांकन केले जाते.
दीप्ती बापट (पर्यावरणशास्त्र शिक्षक-संशोधक), प्रा. प्रकाश गोळे (शाश्वत विकास आणि पर्यावरणीय अर्थशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ),     प्रा. श्री. द. महाजन (वनस्पतीतज्ज्ञ), अ‍ॅडव्होकेट अमोघ परळीकर, नीमा पाठक-ब्रूम (लोकसहभागातून संवर्धन या विषयातील तज्ज्ञ) डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई (भूगोल तज्ज्ञ) यांच्यासह पर्यावरण शिक्षण-संशोधन तसेच निसर्ग संरक्षण-संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९६९१०५५७०, ९९२२२४७७४९. parthbapat@gmail.com