पर्यावरण क्षेत्रात वन, वन्यपशुशास्त्र, पर्यावरण नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापन, ऊर्जाप्रणाली आणि पर्यावरण नियोजन या विषयांशी निगडित करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यासंबंधित अभ्यासक्रम आणि कार्यक्षेत्रांची माहिती –
पर्यावरणशास्त्राशी संबंधित कायदे आणि नियम डोळ्यांसमोर ठेवून अनेक विद्यापीठांमध्ये एन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग, एन्व्हायर्न्मेंटल प्लॅनिंग आणि एन्व्हायर्न्मेंटल मॅनेजमेंट विषयक प्रशिक्षण उपलब्ध आहे. प्रदूषण आणि त्यांचे प्राणीजीवनावर होणारे परिणाम यांचा या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्भाव आहेच. खरे तर जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाचा पर्यावरणशास्त्रात समावेश होत असतो. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भूगोल, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवाणूशास्त्राशिवाय आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंग हे विषयसुद्धा पर्यावरणशास्त्रात येतात.
पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. फक्त पर्यावरण शास्त्रज्ञांनाच नव्हे तर पर्यावरण अभियंते, पर्यावरण जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणाच्या प्रतिकृती तयार करणारे व पर्यावरणाशी संबंधित पत्रकारिता करणाऱ्यांना मोठा वाव आहे.
कामाचे स्वरूप
भूमी, हवा आणि पाणी यांचे प्रदूषणापासून प्रतिबंध करणे हे पर्यावरणवाद्यांचे प्राथमिक कार्य मानले जाते. त्यासाठी त्यांना प्रदूषित क्षेत्राची तपासणी करण्याचे, विश्लेषण करण्याचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेणे, अहवाल तयार करणे आणि उपाययोजना करणे यासारखी कामे करावी लागतात. या संदर्भात प्रत्यक्ष त्याला प्रदूषित क्षेत्रात जाऊन तसेच कायदे समितीसमोर चाचण्या दाखवणे आणि प्रतिबंधक उपाययोजनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणे हासुद्धा या पर्यावरणतज्ज्ञांच्या कार्याचा एक भाग आहे. ही समस्या हाताळण्यासाठी मार्ग शोधणे, प्रदूषण नियंत्रण आणि समस्यांचा सामना यासंबंधीचे संशोधन यावरही पर्यावरण तज्ज्ञ काम करत असतात.
तंत्रज्ञान विकसित होत असताना पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ शकतात. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मार्ग आणि साधने शोधणे आणि अवशिष्टावरील प्रक्रिया पद्धती विकसित करण्याचे प्रमुख काम पर्यावरण अभियंते पार पाडतात. प्रदूषणविषयक समस्यांचे योग्य निदान करून त्याचे निराकरण केले नाही तर कुठल्या अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागेल, हे विशद करण्याची जबाबदारी पर्यावरणविषयक अभियंत्यांची असते. त्या अनुषंगाने हे अभियंते पर्यावरण समस्यांची रूपरेषा निश्चित करतात.
कार्यक्षेत्र
पर्यावरणशास्त्र ही व्यापक संज्ञा आहे व त्यामध्ये अनेक कामांचा समावेश आहे. खाली दिलेल्या क्षेत्रांचा पर्यावरणाशी थेट संबंध आहे-
उद्योगधंदे : प्रमुख उद्योगधंद्यांमध्ये स्वतंत्र पर्यावरण संशोधन विभाग असतो. प्रदूषण कचरा, टाकाऊ पदार्थ व सांडपाणी यांचे नियंत्रण हे त्यांचे प्राथमिक जबाबदारीचे काम असते. नियोजन व व्यवस्थापन  संबंधित अनेक कामांचा त्यात संबंध असतो. सार्वजनिक क्षेत्रातील खाण व्यवसायात पर्यावरण शास्त्रज्ञांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. प्रदूषणावर होणाऱ्या परिणामासंबंधीचे अहवाल सादर करणे आणि सरकार आणि उद्योगांना सल्ले देण्याचे प्रमुख काम त्यांना करावे लागते. अभियांत्रिकीच्या तत्त्वांचा उपयोग करून हवेतील प्रदूषण, जलप्रदूषण, जमिनीचे होणारे नुकसान व ध्वनिप्रदूषण रोखण्याचे काम पर्यावरण अभियंते करतात.
संशोधन व विकास : पर्यावरणासंबंधी लोकांमध्ये निर्माण झालेल्या वाढत्या जागरूकतेमुळे या क्षेत्रात संशोधन व विकासकार्याला भरपूर वाव आहे. देशातील निरनिराळी विद्यापीठे व केंद्र सरकार पर्यावरण संबंधातील संशोधन व विकास कार्याला प्रोत्साहन देतात.
सामाजिक बदल व प्रगती : पर्यावरण संरक्षणाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे व पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांविषयी शास्त्रीय व तात्त्विक माहितीचा प्रसार करण्यासाठी विविध स्वयंसेवी संघटना काम करीत असतात. यातील काही संस्थांचा दृष्टिकोन मुख्यत: व्यावसायिक असतो. अन्य काही संस्था माहिती गोळा करणे, अहवाल बनवणे अथवा जनमत तयार करण्याचे काम करतात. याशिवाय काही संस्था विशिष्ट स्वरूपाची निसर्गसंपत्ती जपून ठेवण्याचे प्रयत्न करतात.
पर्यावरणविषयक पत्रकारिता : पर्यावरणाविषयी जागरूकता व पर्यावरण संबंधित विवाद्य प्रश्नांवर प्रकाशझोत टाकून त्यावर चर्चा घडवून आणण्याचे काम   प्रसारमाध्यमांद्वारे करता येते. त्यासाठी पर्यावरणविषयक पत्रकारिता हे एक प्रमुख कार्यक्षेत्र ठरते.
पर्यावरण शास्त्रातील संशोधनाच्या संधी
पर्यावरणाचे संरक्षण व जतन करण्यासाठी आवश्यकतेनुसार शास्त्राची व अभियांत्रिकीची मूलतत्त्वे व ज्ञान यांचा उपयोग करणे हे पर्यावरण शास्त्रज्ञाचे काम असते. पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मार्ग व उपाययोजना शोधून काढण्यासाठीच्या हेतूने पर्यावरण शास्त्रज्ञ संशोधन करतात. पर्यावरण संशोधक प्रामुख्याने संशोधनात्मक स्वरूपाचे, प्रतिबंधक किंवा नियंत्रक उपाययोजना शोधून काढण्याचे काम करतात. यात केवळ स्थानिकच नव्हे, तर जागतिक पातळीवरील पर्यावरण विषयक समस्यांनाही ते हात घालतात. उदा. वातावरणामधील ओझोनचा स्तर नष्ट होऊ नये यासाठी उपाययोजना शोधणे व पर्यावरणावर अतिनील किरणांचा होणारा परिणाम यासारखे जागतिक प्रश्नसुद्धा त्यांच्या संशोधनाचे विषय असू शकतात.
यासंबंधीचे प्रशासकीय काम प्रामुख्याने सरकार करते. प्रदूषणाचे नियंत्रण धोरण ठरवणे, सजीवसृष्टी व भोवतालचा परिसर यांच्यातील संतुलन राखणे हे प्रशासकीय कामांमध्ये येते. परिस्थितीचे प्रारूप तयार करून त्याद्वारे नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीतून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ धोरणाच्या राबविण्याचे काम करते.
सल्लाविषयक काम : पर्यावरणाशी संबंधित शासकीय विभाग आणि पर्यावरणविषयक प्रश्न हाताळणाऱ्या खासगी संस्था हे काम करतात.
संरक्षक स्वरूपाचे काम : सजीवसृष्टी व परिसर यांच्यातील संतुलन राखणे, सजीव सृष्टीमधील वैविध्य जतन करणे आणि पडीक ओसाड जमिनीचा उपयोग व व्यवस्थापन या माध्यमांमधून संरक्षक स्वरूपाचे काम केले जाते.
प्रवेश : पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले पर्यावरण शास्त्रज्ञ किंवा पर्यावरण वा रासायनिक अभियांत्रिकीमधील पदवीधर उद्योगांमध्ये व खासगी कंपन्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कार्यासाठी नियुक्त केले जातात. स्वयंसेवी संघटनांमध्येही पर्यावरण विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधरांना सेवेत समाविष्ट करून घेतले जाते.
शैक्षणिक अर्हता : पर्यावरणशास्त्र सामान्यपणे एम.एस्सी.च्या अभ्यासक्रमात शिकवले जाते आणि म्हणून शास्त्राच्या कोणत्याही शाखेतील पदवी प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाते. मात्र, बी.एस्सी. पातळीवरही पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम असलेली काही विद्यापीठे आहेत.
प्रशिक्षण : या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वन, वन्यपशुशास्त्र, पर्यावरण नियंत्रण, पर्यावरणाशी निगडित जैविक रसायनशास्त्र, पर्यावरण व्यवस्थापन, ऊर्जाप्रणाली आणि पर्यावरण नियोजन इ. विषय शिकवले जातात. या क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. पर्यावरण विषयात पदवी व पदव्युत्तर पातळीचे अभ्यासक्रम बंगलोर, दिल्ली, गढवाल, पुणे व इंदोर या विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एम. ई./एम. टेक पदवी परीक्षांचे पर्यावरण अभियांत्रिकी विषयातले अभ्यासक्रम चालवले जातात. जीवशास्त्र, वनशास्त्र, कृषी व पशुवैद्यक पर्यावरणशास्त्र या विषयांमधील पदवीधरांसाठी देहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेत दोन वर्षांचा वन्यपशुशास्त्र या विषयातला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
कामाच्या संधी
नजिकच्या भविष्यकाळात पुनर्वापर आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने पर्यावरणशास्त्राला मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.  नैसर्गिक मूलस्रोताच्या कमतरतेमुळे  पाणीवाटप, अभिसरण आणि भौतिक गुणधर्म यांचा सूक्ष्म अभ्यास असणाऱ्या जलविज्ञान तज्ज्ञांनाही करिअरच्या दृष्टीने मोठे भविष्य आहे.
पर्यावरण आणि नैसर्गिक साधनांच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या संधी आहेत. यात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे, संशोधन करणे, प्रयोगशाळेच्या मांडणीत मदत करणे, धोरण ठरवणे, नैसर्गिक साधनांचे व्यवस्थापन, बांधणी आणि प्रमाणपत्र देणे इ.बाबतीत काम करता येते. शासकीय प्रशासनात तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये पर्यावरण अभियंत्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. कन्सल्टिंग करता खासगी कंपन्या, केमिकल कंपन्या तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्याची संधी असते.
पर्यावरण क्षेत्रात काम करकाना वेतन हे शैक्षणिक पात्रता, कार्यक्षेत्र आणि नोकरीतील पदभार यांवर अवलंबून असते. स्वयंसेवी संस्था व खासगी क्षेत्रातील संस्थांमध्ये आरंभीचे वेतन रु. चार हजार ते रु. आठ हजार रु.च्या दरम्यान असते. खासगी उद्योगांमध्ये सुरुवातीला मिळणारे वेतन प्रतिमाह रु. सहा हजार ते रु. दहा हजारांपर्यंत असते.
पर्यावरणविषयी जागरूकता वाढल्यामुळे पर्यावरण क्षेत्रात नजिकच्या भविष्यात करिअरच्या उज्ज्वल संधी उपलब्ध होतील. अनेक उद्योगधंदे पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात पर्यावरणाला पोषक व अनुकूल अशा वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर प्रवेश करीत आहेत.
परदेशात तर पर्यावरण क्षेत्रात आजही मोठय़ा संधी उपलब्ध आहेत आणि पर्यावरण शास्त्रज्ञांना तिथे विशेष वाव आहे. 

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण