News Flash

स्वास्थ्य व्यवस्थापनातील नव्या संधी

आरोग्य क्षेत्रात व्यवस्थापनाचे महत्त्व वाढत असून यानिमित्ताने निर्माण होणाऱ्या नव्या नोकरीच्या संधींविषयी..

| August 12, 2013 12:10 pm

आरोग्य क्षेत्रात व्यवस्थापनाचे महत्त्व वाढत असून यानिमित्ताने निर्माण होणाऱ्या नव्या नोकरीच्या संधींविषयी..
स्वास्थ्य व्यवस्थापन हे देशातील गेल्या दोन दशकांत सर्वाधिक विस्तार झालेले क्षेत्र आहे.  देशात या उद्योगाचे मूल्य आजच्या घडीला १,५०,००० कोटी रुपये इतके आहे आणि या क्षेत्राभिमुख शिक्षणाला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्वास्थ्य व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी उपयोगात आणणे. आरोग्य सुविधांमध्ये रुग्णालय (प्राथमिक आरोग्य केंद्रे, नìसग होम्स, जिल्हा रुग्णालय, सरकारी रुग्णालय, स्पेशालिटी रुग्णालये, दवाखाने आणि विविध मोठय़ा कंपनींच्या मालकीची किंवा प्रतिष्ठानांच्या मालकीच्या रुग्णालयांच्या शाखा), माफक दरात चांगल्या दर्जाच्या औषधी रोगनिदान चिकित्सा, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी, शास्त्रीय उपकरणं ज्यामध्ये एन्जिओप्लास्टी, कॅमेटर्स (स्टेंट आणि कृत्रिम अवयव वगरे), राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, स्वास्थ्य आणि पोषण अभियान, परिवार स्वास्थ्य आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य पद्धती अशा सरकारी आरोग्यविषयक कार्यक्रमांचा समावेश आहे.
डॉक्टर, दंतचिकित्सक, औषधतज्ज्ञ असे विज्ञान विशेषज्ञच स्वास्थ्य निगडित उद्योग प्रामुख्याने सांभाळतात आणि सरकारी क्षेत्र प्रशासकीय अधिकारी सांभाळतात. सरकारी आरोग्यविषयक कार्यक्रमांवर केंद्र सरकार भारतीय सकल उत्पादनाच्या १.२ टक्के खर्च करते. हे विशेषज्ञ आणि नोकरशहा उत्पत्ती व संचालनासारख्या व्यवस्थापन शास्त्रांत पारंगत असतातच, असे नाही.
व्यावहारिक तत्त्वावर चालणाऱ्या उद्योगामध्ये पुरवठा साखळी व्यवस्थापन, साठा किंवा भांडार व्यवस्थापन, प्रक्रिया, सर्वोत्कृष्टता, वित्तीयज्ञान, मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन किंवा विपणन यासारखी विविध  व्यवस्थापन तत्त्वे उपयोगात आणली जातात. यामुळे उद्योगाची कार्यक्षमता (म्हणजेच सर्वोत्तम दर्जा, कमी किंमत आणि म्हणून जास्त नफा)वाढते. आतापर्यंत केवळ वैद्यकशास्त्राशी संबंधित असा औषध उद्योग आणि रुग्णशास्त्रीय उपकरण उद्योग याचे व्यवस्थापन कुशल व्यवस्थापकांद्वारे केले जाते. अलीकडे मात्र, मोठमोठय़ा खासगी रुग्णालयांचे नियंत्रण डॉक्टर नसलेल्या व्यवस्थापकांकडे असलेला आढळतो.
स्वास्थ्य निगा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा वेगळा आहे. यात उत्पादक आणि ग्राहक, उत्पादन अथवा सेवा यासोबत एक महत्त्वाचा धागा आहे आणि तो म्हणजे डॉक्टर. कधी औषधतज्ज्ञाला उत्पादन, सेवा, आजार स्वरूप आणि रोगनिदान याबद्दल रुग्ण आणि उत्पादकापेक्षा जास्त माहिती असते. स्वास्थ्य व्यवस्थापन कुशल व्यवस्थापक (MBA) हा सामान्य व्यवस्थापन तज्ज्ञापेक्षा या गुंतागुंतीच्या उद्योगाच्या व्यवस्थापनास अधिक अनुकूल असतो. ही निकड ओळखून गोवा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटने स्वास्थ व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर शैक्षणिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे.
आज भारत जगातील औषधी उत्पादनात अग्रेसर देश आहे. औषध आणि रुग्णशास्त्रीय उपकरणांत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे उत्पादनमूल्य जगात सर्वात कमी आहे. असे असूनसुद्धा, स्वास्थ्य व्यवस्थापनामधील बाकीच्या उपशाखा तितक्या सक्रिय झालेल्या दिसत नाहीत. याचे कारण त्याचा कार्यभार व्यवस्थापन तज्ज्ञांच्या हाती असलेला दिसून येत नाही.  ही तफावत लक्षात घेत खासगी रुग्णालयांत आता तिथे मोठय़ा प्रमाणात व्यवस्थापन तज्ज्ञांच्या नेमणूक होते.   
अनेक खासगी रुग्णालयांचा कार्यभार उद्योग व्यवस्थापकांमार्फत होताना दिसतो आणि व्यवस्थापनाच्या विविध पैलूंचा यशस्वी उपयोग या क्षेत्रात होऊ शकतो, याची चुणूक अनेक रुग्णालयांच्या उदाहरणांतून बघायला मिळते.
काही राज्यांमध्ये याची दखल सरकारने घेतली असून त्यांनी स्वास्थ्य व्यवस्थापनात पारंगत व्यवस्थापकांना नोकरी देणे सुरू केले आहे. या राज्यांमध्ये तामिळनाडू, राजस्थान व गुजरात अशा राज्यांचा समावेश आहे.
नजीकच्या भविष्यकाळात स्वास्थ्य व्यवस्थापन शिकलेल्या उमेदवारांची गरज स्वास्थ्य व्यवस्थापन उद्योगात वाढतच राहणार आहे. या उमेदवारांना केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर (UNICEF, UCFPA, UNOPS, WHO) काम करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. स्वयंसेवी संस्थांमध्येसुद्धा स्वास्थ्य व्यवस्थापन तज्ज्ञांची मोठी गरज भासते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेनुसार  स्वास्थ्य व्यवस्थापकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुबलक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत.
* मीना परुळेकर
असोसिएट प्रोफेसर, स्वास्थ्य व्यवस्थापन,
गोवा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:10 pm

Web Title: opportunities in health management
Next Stories
1 पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा – सामान्य विज्ञान
2 कौशल्य संपादन करा!
3 रोजगार संधी: कर्मचारी निवड आयोगाची बारावी उत्तीर्णासाठी निवड परीक्षा
Just Now!
X