जागतिकीकरणामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबींमध्येही शिरकाव केला. याचे चांगले परिणामही आहेतच. कला शिक्षण हा अगदी साच्यातला विषय नाही. इतर शिक्षण ज्याप्रमाणे केवळ पुस्तकांच्या अभ्यासानेही करता येऊ शकते, तसे कलाशिक्षणाच्या बाबतीत खचितच होताना दिसेल. जवळपास नाहीच. कारण कलेचे शिक्षण साचेबद्ध नाही. पुस्तकातील धडा वाचून दाखवला आणि समजाविला असे कलेच्या शिक्षणाच्या बाबतीत होत नाही. तिथे उत्तम शिक्षकच गरजेचा असतो. पण प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धतीत एका वर्गात बसतील, इतकेच विद्यार्थी घेता येतात. विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली तर मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. एकूणच विद्यार्थी संख्येवर मर्यादा येतात. परंतु इथे तंत्रज्ञान मदतीला येते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कितीही विद्यार्थी, जगात कुठेही तुमचे व्याख्यान ऐकू शकतात. हेच लक्षात घेऊन कलाक्षेत्रातील शिक्षणातही ई-लर्निगने प्रवेश केला. त्यामध्येच कलाक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मोठय़ा संधी आहेत. ई-लर्निगच्या प्रक्रियेत माहिती, चित्र, छायाचित्र, आराखडे, विश्लेषण, दृश्ये, माहितीपट, अ‍ॅनिमेशन याच्या साहाय्याने विषयाला काही तुकडय़ांमध्ये विभागले जाते. एकप्रकारे वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शिकवण्याचीच ही फोड असते. याच ठिकाणी कण्टेंट रायटर आणि एसएमई यांचे काम महत्त्वाचे ठरते. माहिती आणि आशयाला का आणि कसे जोडावे, हे कण्टेंट रायटर ठरवतो. एसएमई म्हणजे सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट अर्थात विषयतज्ज्ञ. कलाक्षेत्रातील ई-लर्निगचा विचार करता हा विषयतज्ज्ञ म्हणजे कलाविषयतज्ज्ञ. विद्यार्थ्यांला दृक्श्राव्य पद्धतीने शिकवण्याची गरज हे माध्यम निर्माण करते. त्यामुळे तिथे काम करायचे तर या तंत्रज्ञानाला आपलेसे केलेच पाहिजे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी आपले कार्यक्षेत्र ओळखले पाहिजे.

कोणतेच शिक्षक एकाच दिवशी सगळे काही शिकवत नाहीत. ते दिवसांचे, आठवडय़ाचे, महिन्यांचे नियोजन करत असतात. कोणत्या धडय़ातील कोणत्या संकल्पना, संज्ञा कशा पद्धतीने, कोणत्या उदाहरणासकट शिकवायच्या या गोष्टी ठरवत असतात. कलाक्षेत्रातील कण्टेंट रायटर हेच करतो. कोणत्याही पाठाकडे तो भाषेच्या, आशयाच्या अंगाने पाहत असतो. त्याची विभागणी कशी करावी ते ठरवतो. त्यासाठी कोणती चित्रे द्यावीत, कोणते व्हिडीओ जोडावेत याचा विचार करत असतो. शिवाय हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांचा रस आणि उत्कंठा कशी टिकून राहील, हेसुद्धा पाहतो. हाच माणूस जर कलाविषयाचाही तज्ज्ञ असेल तर तो संपूर्ण अभ्यासक्रम, त्यातील इतर विषय, ते शिकण्याच्या पद्धती या सगळ्यासोबत विषयाची जोडणी करून पाहत असतो. विषयतज्ज्ञ एकच पाठ अनेक पद्धतींनी शिकवण्याचा विचार करू शकतो. एकाच संकल्पनेकडे तो अनेक अंगांनी पाहू शकतो. संकल्पना, ती शिकण्याची पद्धत, त्यासाठीचा पाठ, उदाहरणे, साधने याची उत्तम जुळणी विषयतज्ज्ञ आणि कण्टेंट रायटर करू शकतात. खरेतर हे काम एकाच व्यक्तीने करणे आदर्श आहे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. एकदा का, अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या साथीने काम करून आशय निश्चित करण्याची सवय लागली तर मग हाच आशय पुस्तक, सीडी अशा अनेक रूपांत करता येईल. त्यामुळे काम करण्याच्या संधीही विस्तारतील. भाषांतर वगैरे गोष्टींनी ते अधिक व्यापक होत जाईल.

पारंपरिक कला शिक्षणातील अंधश्रद्धा, कल्पना दूर करून नेमक्या सूचना देणे आणि एकंदरीतच तंत्रज्ञान कशा पद्धतीने एखाद्या विषयाची फोड करते, त्यातील घटक नवनव्या पद्धतीने जोडून नवा अनुभव देते, याचे भान ठेवले तर उत्तम कला शिक्षक विषयतज्ज्ञ आणि कण्टेंट रायटर म्हणून काम करू शकतो. त्यामुळे कण्टेंट रायटर आणि एसएमई होण्यासाठी कला शिक्षण तर आवश्यक आहेच. शिवाय त्या व्यक्तीला उत्तम कलाशिक्षकही व्हावे लागेल. या शिक्षकाला भाषेतून चांगला विचार करता यायला हवा. त्याला अभ्यासक्रमाची आणि तंत्रज्ञानाची दोहोंची उत्तम समज आणि जाण हवी. मुख्य म्हणजे शिकवण्याच्या क्षमता वाढवण्याची तयारी हवी. आपले शिक्षण निरनिराळ्या माध्यमांतून देता येण्याची समज हवी. तंत्रज्ञान मानवी बुद्धीला प्रेरणा देणारे आहे. त्याची क्षितिजे विस्तारणारी आहेत. कला आणि तिचे शिक्षण याचा नक्कीच भाग असेल.

– महेंद्र दामले

mahendradamle@gmail.com