जागतिकीकरणांनतर अनेक जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी कंपन्यांनी भारतात आपले व्यवसाय उभारले, तसेच नोकरीव्यवसायानिमित्त भारतीय विद्यार्थीही परदेशात कूच करू लागले. शैक्षणिक, केपीओ, कॉर्पोरेट, पर्यटन, परराष्ट्रीय व्यवहार अशा विविध क्षेत्रांत इंग्रजीबरोबरच परकीय भाषा येणारे व्यावसायिक आणि भाषातज्ज्ञ यांची मागणी वाढते आहे. या क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि करिअर संधींचा आढावा..
खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर, भारताकडे जर्मनी, फ्रान्स, दक्षिण अमेरिकन देश व जपान असे देश ‘उद्योग-व्यापाराच्या संधींचा प्रदेश’ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे या देशांतल्या मोठमोठय़ा कंपन्यांनी भारतात आपला व्यवसाय उभारला आहे आणि भविष्यातही उभारणार आहेत. त्यामुळे दोन कंपन्यांमधला व्यावसायिक संवाद उत्तम प्रकारे घडावा, यासाठी कंपन्यांना हवे असतात परकीय भाषातज्ज्ञ- जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी आदी भाषांवर प्रभुत्व असलेले व्यावसायिक. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये परकीय भाषा अर्थात ‘फॉरेन लँग्वेज’ या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर भाषांतरकार, दुभाष्या म्हणून करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत. याबद्दल पूर्ण वेळ भाषांतरकार व दुभाषक म्हणून काम करणारे निरंजन वेलणकर यांनी सांगितलं, ‘सध्या फ्रेंच-जर्मनबरोबरच स्पॅनिश, जपानी, चिनी आदी भाषा येणारे व्यावसायिक मोठय़ा प्रमाणावर कंपन्यांना हवे असतात.’
परकीय भाषा येणारे व्यावसायिक निर्माण करण्यासाठी ती भाषा शिकवणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांचीही गरज भासते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर करिअर संधी उपलब्ध असल्याचं पुणे विद्यापीठात स्पॅनिश भाषेच्या प्राध्यापिका असलेल्या मानसी जोशी यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या, ‘‘परकीय भाषा शिकणारे विद्यार्थी हे भाषांतरकार  तसेच शिक्षक म्हणून काम करू शकतातच. पण याशिवाय बीपीओ किंवा केपीओ कंपन्यांनाही परकीय भाषातज्ज्ञ हवे असतात. सध्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना परकीय भाषा येणारे व्यावसायिक हवे असतात, जे आपापल्या क्षेत्रातही माहीर असतीलच, पण त्यांना परकीय भाषाही येत असेल. त्यामुळेच अभियंते, अकौटंट आदी करिअर निवडणाऱ्यांनीही एखादी परकीय भाषा शिकल्यास त्यांना उत्तम करिअर संधी मिळू शकतात.’’
भाषांतरकार व दुभाषक यांव्यतिरिक्त असलेल्या करिअर संधींबद्दल बोलताना एका जपानी कंपनीत टीमलीडर असलेले चतन्य दीक्षित म्हणाले, ‘‘आता जागतिक बाजारपेठ झपाटय़ाने बदलत असल्याने परकीय भाषा शिकणाऱ्याला, जोडीला कॉम्प्युटर सायन्सेसमधील पदवी आणि प्रत्यक्ष अनुभव असेल तर त्याचा जास्त फायदा होतो. यातूनच प्रकल्प समन्वयक यासारखे करिअर करता
येऊ शकते.’’

भाषेची आवड हवी
परकीय भाषा शिकण्याची पहिली पायरी म्हणजे भाषांबद्दल आवड हवी. नवीन भाषा शिकणं ही तशी कठीण गोष्ट असल्याने तुमच्यात जिद्द आणि चिकाटी हवी, शिवाय मेहनत घ्यायची तयारी हवी. मुळात तुमची इंग्रजी आणि मातृभाषा अशा दोन भाषा पक्क्या असायला हव्यात.
कोणत्याही भाषेशी त्या त्या प्रदेशातल्या लोकांची संस्कृती-सामाजिक व्यवहार आदी गोष्टी निगडित असतात. त्यामुळे परकीय भाषा शिकत असताना त्या भाषेतील साहित्य वाचणं तसंच उच्चार नीट कळावेत, कानावर पडावेत यासाठी ती भाषा ‘ऐकणं’ आवश्यक असतं. त्यासाठी वेगवेगळ्या काठिण्य पातळीनुसार टय़ुटोरिअल्स इंटरनेटवर उपलब्ध असतात, तसंच त्याबाबतची पुस्तकं-सीडीही उपलब्ध आहेत. याशिवाय सराव आणि कोणताही शब्द अडला की तो डिक्शनरीत शोधणं, नवीन शब्द टिपून ठेवणं अशा सवयी लावून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोणतीही भाषा ही नुसते व्याकरण पाठ केल्याने भाषा शिकता येत नाही. भाषा ही व्याकरणापलीकडे असते. त्यासाठी भरपूर वाचन, सिनेमा ऐकणं-पाहणं आदी गोष्टी करायला हव्यात.
याबद्दल जर्मन भाषांतरकार सुश्रुत कुलकर्णी म्हणाले, ‘‘भाषा येणं म्हणजे निव्वळ क्लासेसमध्ये जाऊन नवनव्या ‘लेव्हल्स’ उत्तीर्ण होणं नव्हे. प्रत्येक भाषा आपल्यासोबत संस्कृतीही
घेऊन येत असते. ती समजावून घेणं आणि आपल्या संस्कृतीची झापडं
न लावता मोकळेपणाने त्याबद्दलचं साहित्य वाचणं, नेटवर ‘तिकडच्या’ टीव्ही मालिका, डॉक्युमेंटरीज पाहणं हेही केलं पाहिजे. भाषा शिकताना लेखी भाषेला महत्त्व दिलं जातं.
पण कानही तयार व्हायला हवेत. त्यासाठी ‘ऐकायची’ पण सवय जाणीवपूर्वक लावून घ्यायला हवी.’’

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Loksatta anvyarth Domestic production expansion to increase exports of electronics from India
अन्वयार्थ: भारतीय जीबी, टीबी चीनच्या स्वाधीन
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

कामाच्या संधी
योग्य ती पदवी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पर्यटन, दूतावास, प्रसारमाध्यमं, सेवा क्षेत्रं, प्रकाशन व भाषांतर अशा विविध क्षेत्रांत करिअर करता येऊ शकतं. याशिवाय अनेक कॉर्पोरेट कंपन्या उत्तम भाषाकौशल्यं असलेल्यांच्या शोधातच असतात. ते तुम्हाला कंपनीत नोकरी देऊ शकतात. तुम्हाला स्वतंत्ररीत्या काम करायचं असल्यास तुम्ही कन्टेन्ट रायटिंग, टेक्निकल रायटर, भाषांतर किंवा दुभाष्या म्हणूनही फ्रीलान्स काम करू शकता. यासाठी नेटवर विविध साइट्स उपलब्ध आहेत. (उदा. http://www.translatorscafe.com, http://www.freelancer.in, http://www.translatordirectory.com) याशिवाय युनायडेट नेशन्स, फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच परराष्ट्र मंत्रालय, रिझव्‍‌र्ह बँक यांसारख्या संस्थांनाही परकीय भाषा येणारे लोक हवे असतात.
भविष्यात परकीय भाषातज्ज्ञांसमोर आव्हान असणार आहे ते कॉम्प्युटरचं, असं मत सुश्रुत कुलकर्णी यांनी मांडलं. ते म्हणाले, ‘‘आता कॉम्प्युटरवर आधारित भाषांतराची ‘टूल्स’ उपलब्ध आहेत. त्यामुळे किरकोळ -‘कॅज्युअल’ म्हणता येतील अशी भाषांतरं लोक स्वत:च ‘गुगल ट्रान्सलेट’सारख्या सॉफ्टवेअरमधून भाषांतरित करून घेतात. भविष्यात अशी टूल्स अधिकाधिक शक्तिशाली होत जाणार. पण माणूस जे ‘बिटविन द लाइन्स’ वाचू शकतो, ते कॉम्प्युटर वाचू शकत नाही. त्यामुळे ‘डोळसपणे’ वाचू शकणाऱ्यांना भविष्यात अधिक ‘किंमत’ असणार आहे.’’
प्रत्यक्षात काम करताना  केवळ भाषा लिहिता-वाचता-बोलता येऊन चालत नाही, असं चतन्य दीक्षित यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘‘काम करताना त्या-त्या लोकांशी, त्यांच्या कार्यपद्धतीशीही जुळवून घ्यावं लागतं. उदा. जपानी लोक ‘कम्प्लीट कम्युनिकेशन’ वर जोर देणारे आहेत. तो त्यांच्या ‘वर्क कल्चर’चाच एक भाग असल्याने अशा गोष्टी समजून घेणं आणि आपल्या अंगी मुरवणं महत्त्वाचं ठरतं. अशा गोष्टींचं भान शिकणाऱ्यांनी आधीपासूनच ठेवायला हवं.’’

तज्ज्ञ म्हणतात..
सध्या स्पॅनिश भाषातज्ज्ञांना बरीच मागणी आहे. कारण भारतीय कंपन्या आणि अनेक कोलंबियन व अर्जेटिनियन कंपन्या यांचे संयुक्त करार झाले आहेत. या देशांत स्पॅनिश ही मुख्य भाषा असल्याने भविष्यात ही मागणी आणखीनच वाढेल.
    – मानसी जोशी स्पॅनिशच्या प्राध्यापक,
परकीय भाषा विभाग, पुणे विद्यापीठ.

भारत आणि जपान या दोन्ही देशांचे संबंध गेल्या काही वर्षांत सुधारले आहेत आणि जपानी कंपन्यांची भारतातील गुंतवणूक किंवा कामाचं आउटसोìसगही वाढलंय. त्यामुळे उत्तम जपानी भाषा जाणणाऱ्यांसाठी अनेक सुसंधी उपलब्ध होत आहेत.
– चतन्य दीक्षित जपानी कंपनीत टीम लीडर

मर्सििडझ, फोल्क्सवागन आणि ऑडी यांसारख्या जर्मन कंपन्या महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ पुरवठादार उपकंपन्या येणं हे साहजिकच आहे. केवळ पुण्यातच १५० पेक्षा अधिक जर्मन मालकीच्या किंवा टाय-अप असलेल्या उत्पादक कंपन्या आहेत. त्यामुळे आता केवळ भाषांमध्ये पदवी घेतलेलेच नव्हेत, तर अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीही भाषांतर हा पूर्ण वेळ व्यवसाय करत आहेत.
– सुश्रुत कुलकर्णी जर्मन भाषांतरकार

अभ्यासक्रमांविषयी..
दहावी किंवा बारावीनंतर तुम्ही विद्यापीठ तसंच खासगी संस्थांचे अभ्यासक्रम करू शकता. आता तर बऱ्याचशा शाळांमध्ये पाचवीनंतर जर्मन, फ्रेंच अशा परकीय भाषा निवडण्याचे पर्याय असतात. त्यामुळे शाळेत असताना, एखादी परकीय भाषा घेतल्यास त्याचा फायदा होतो. वय लहान असल्याने तुलनेने भाषेच्या मूलभूत गोष्टी चटकन शिकता येतात.
त्यानंतर एखाद्या परकीय भाषेची आवड असल्यास विद्यापीठातून त्या भाषेत पदवी संपादन करता येऊ शकते. तसंच ती भाषा शिकताना आणखीही एखादी परकीय भाषा शिकता येऊ शकते. यासाठी विविध पदविका अभ्यासक्रमांचे पर्याय आहेत. शिवाय वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कला शाखेचं शिक्षण घेत असतानाही परकीय भाषांच्या विविध संस्थांमधून (उदा. जर्मन- मॅक्समुल्लर, फ्रेंच- अलियान्स फ्राँसेज) अभ्यासक्रम करता येऊ शकतात.

अभ्यासक्रम
साधारणत: सर्व मोठय़ा विद्यापीठांमध्ये परकीय भाषा विभाग असतो. त्याअंतर्गत परकीय भाषांसाठी पदविका व पदवी अभ्यासक्रम असतात. मुंबई व पुणे विद्यापीठात जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, जपानी, चिनी आदी भाषांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसंच दिल्लीतल्या जेएनयू, इग्नू विद्यापाठीतही विविध अभ्यासक्रम आहेत.
याशिवाय काही भाषांच्या खासगी संस्थाचेही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत-
जर्मन- मॅक्स म्यूलर भवन (http://www.goethe.de) फ्रेंच – अलियान्स फ्राँसेज (http://www.afindia.org/)
स्पॅनिश- इन्स्टिटय़ूटो इस्पानिया (http://www.institutohispania.com/)
विद्यापीठ पातळीवर चालणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क हे तुलनेने कमी असून खासगी संस्थांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमांचे शुल्क जास्त आहे. जपानी, चायनीज भाषा शिकायला अवघड असल्याने त्यांची भारतात केंद्रेही कमी आहेत. त्यामुळे त्यांचे शुल्क जास्त आहे.     
प्रणव सखदेव

परकीय भाषेत करिअर करण्यासाठी..
* भाषा शिकण्याची आवड हवी, चिकाटी हवी.
* केवळ भाषेचं व्याकरण न शिकता, ती ‘समजून-जाणून’ घेता यायला हवी.
* शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वाचन, सिनेमा पाहणं, नेटवर व्हिडीओज पाहणं, प्रत्यक्ष बोलण्याचा सराव करायला हवा. त्यासाठी ऑनलाइन वृत्तपत्रांचं वाचन करायला हवं.
* एखादा शब्द अडल्यास त्याचा त्वरित अर्थ शोधायला हवा. हल्ली त्यासाठी मोबाइल अ‍ॅप्सरूपात डिक्शनरीज उपलब्ध असतात. तो
शब्द टिपून ठेवायला हवा.
* व्यावसायिक भाषांतरकाराला ट्रॅडोजसारखी कॅट (उअळ) टूल्स येणं अत्यावश्यक असतं. त्यामुळे भाषांतराचा वेळ वाचतो. या टूल्सची माहिती करून घ्यावी.
शिष्यवृत्ती
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सटिी (जेएनयू)सारख्या विद्यापीठांमध्ये परकीय भाषा शिकणाऱ्यास विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत. तसंच विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम’च्या अंतर्गत परदेशी विद्यापीठात शिकायची संधीही मिळू शकते. याशिवाय जपानी व कोरिअन सरकारही त्यांच्या भाषा शिकण्यासाठी काही शिष्यवृत्त्या देतात. जर्मन भाषेच्या मॅक्सम्युलर भवनातर्फे सर्वोत्तम विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जर्मनीला जायची संधी दिली जाते.
sakhadeopranav@gmail.com