सामायिक संरक्षण सेवा .परीक्षेद्वारे लष्करी अधिकारी बनण्याची अमोघ संधी युवावर्गाला उपलब्ध आहे. या परीक्षेचे विविध टप्पे आणि उपलब्ध संधींविषयी सविस्तर माहिती-

सामायिक संरक्षण सेवा परीक्षेच्या मार्गाने लष्करी सेवेमध्ये अधिकारपद संपादन करण्याचा राजमार्ग इच्छुक उमेदवारांना उपलब्ध आहे. या परीक्षेद्वारे देहरादूरस्थित इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, एजिमालास्थित इंडियन नॅव्हल अ‍ॅकॅडमी, हैदराबादस्थित एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवता येतो. विशेषत: ज्या युवतींना लष्करात जाऊन साहस गाजवायचे आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा म्हणजे उत्तम संधी आहे. युवतींना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकेडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी- सी प्रमाणपत्र (आर्मी)धारकांसाठी राखीव असतात. इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी- सी प्रमाणपत्र (नेव्ही)धारकांसाठी राखीव असतात. या अ‍ॅकॅडमीत कार्यकारी- सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम असतो. एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्री-फ्लाइंग अभ्यासक्रम असतो. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन अभ्यासक्रम असतो.

वयोमर्यादा
इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- (फक्त अविवाहित पुरुषांसाठी) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्यानंतर झालेला नसावा. एअर फोर्स अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९६ च्या नंतर झालेला नसावा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (पुरुष) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्या नंतर झालेला नसावा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (महिला) उमेदवाराचा जन्म
२ जानेवारी १९९१ च्याआधी आणि
१ जानेवारी १९९७ च्या नंतर झालेला नसावा. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (अविवाहित पुरुष) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्यानंतर झालेला नसावा.

शैक्षणिक अर्हता
* इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी.
* एअर फोर्स अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मात्र बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी.
* ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी.
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी- कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

परीक्षा प्रक्रिया
ही परीक्षा दरवर्षी दोनदा घेतली जाते. २०१५ साली पहिली परीक्षा १५ फेब्रुवारी २०१५ रोजी देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
* लेखी परीक्षा : इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीत प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मूलभूत अंकगणित या तीन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर्स असतात.
ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात. ते इंग्रजी आणि िहदी या दोन भाषेत असतात. निगेटिव्ह माìकग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी ०.३३ गुण वजा केले जातात. एकापेक्षा जास्त उत्तरे नोंदवल्यास ०.३३ गुण वजा केले जातात. प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही तर कोणत्याही प्रकारे गुण वजा केले जात नाहीत.
या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे निर्धारण कमिशनच्या वतीने केले जाते. मूलभूत गणिताच्या पेपरचा दर्जा दहावी स्तराचा आणि इंग्रजी व सामान्य अध्ययन पेपरचा दर्जा पदवी स्तराचा असतो. इंग्रजीच्या पेपरमध्ये उमेदवाराचे भाषेवरील सर्वसाधारण प्रभुत्व आणि शब्दांची उपयोगिता तपासली जाते. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, दैनंदिन जीवनाशी निगडित सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास आणि भूगोल इत्यादी घटकांचा समावेश असतो.
* मुलाखत : इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी मुलाखत ३०० गुणांची तर ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशाकरता घेण्यात येणारी मुलाखत २०० गुणांची असते.
* बुद्धिमता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी : ही चाचणी द्विस्तरीय असते. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्टचा समावेश आहे. यामध्ये पिक्चर आकलन चाचणी, डिस्क्रिप्शन टेस्ट यांचा समावेश होतो. या चाचण्यांच्या गुणांवर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेिस्टग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चार दिवस चालते. उमेदवार मानसिकदृष्टय़ा आणि बौद्धिकदृष्टय़ा लष्करी सेवा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची सखोल तपासणी या चाचण्यांद्वारे केली जाते.
या परीक्षेला अर्ज करू इच्छिणारा उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे गरजेचे आहे. उंची, वजन, डोळे याविषयीची मानके (स्टॅण्डर्डस) निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड होऊ शकते.

विद्यावेतन आणि पदोन्नती
आर्मी आणि नेव्ही सेवांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात २१ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी १८ महिने असतो. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर कायमस्वरूपी कमिशनद्वारे सेवेत सामावून घेतले जाते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत लेफ्टनंट, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नल, २६ वर्षांनंतर कर्नल या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते. निवड पद्धतीने उमेदवारांना १५ वर्षांत कर्नल, २३ वर्षांत ब्रिगेडियर आणि २५ वर्षांत मेजर जनरल, २८ वर्षांत लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्तीची संधी मिळू शकते.
एअर फोर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये ७४ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाते. यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून सामावून घेतले जाते. त्यानंतर कालबद्धरीत्या फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, िवग कमांडर, ग्रुप कॅप्टन अशी पदान्नती अनुक्रमे दोन, सहा, १३ आणि २६ वर्षांनंतर दिली जाते. निवड पद्धतीने एअर कमांडर, एअर व्हाइस मार्शल, एअर मार्शल या पदांवर नियुक्ती होण्याचीही संधी मिळू शकते.
ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार महिना विद्यावेतन दिले जाते. हे प्रशिक्षण ४९ आठवडय़ांचे असते. हे प्रशिक्षण संपले की लघुसेवा कमिशनद्वारे लेफ्टनंटच्या रँकमध्ये सामावून घेतले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास विद्यापीठाची डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. प्रशिक्षणानंतर प्रारंभी १० वर्षांसाठी सामावून घेतले जाते. त्यानंतर उमेदवारांची कार्यक्षमता बघून चार वर्षांसाठी ही सेवा वाढवली जाऊ शकते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत कॅप्टन, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीची संधी
मिळू शकते.

परीक्षा शुल्क
महिला आणि अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना या परीक्षेची फी भरावी लागत नाही. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना २०० रुपये फी आहे. ही फी नेटबँकिंगद्वारे भरता येते.
http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी एकदाच अर्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज रद्द केला जातो. शासकीय सेवेत वा खासगी सेवेत असणारे उमेदवार थेट अर्ज करू शकतात. मात्र त्यांनी असा अर्ज केल्याची माहिती आपल्या सध्याच्या कंपनीला वा आस्थापनेला देणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या वेळी संबंधितांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे लागते.
परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई-अ‍ॅडमिट कार्ड पाठवले जाते. हे प्रवेशपत्र यूपीएससीच्या http://www.upsc,gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येते.
संपर्क :
* फॅसिलिटेशन काऊंटर, दूरध्वनी- ०११-२३३८११२५/ २३३८५२७१
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीसाठी- joinidianarmy.nic.in
* रिक्रूटमेंट डायरेक्टोरेट- दूरध्वनी- ०११-२६१७३२१५
फॅक्स- २६१९६२०५
* हवाई दलासाठी- पीओ३ -ए/एअर हेडक्वार्टर्स, जे ब्लॉक, रूम नंबर- १७, वायू भवनसमोर, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली- ११००११
* नौदलासाठी- रूम नंबर-२०४, सी िवग, सेना भवन नवी दिल्ली- ११००११. नौदलासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याचे नियुक्तीपत्र http://www.nausena-bhati.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.