अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय यांमध्ये सुवर्णमध्य किंवा समान दुवा साधता आला तर कमी कालावधीत हमखास यशाप्रत पोहोचता येईल. त्याविषयी..
नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीमधील वैकल्पिक (Optional)  विषय ५०० गुणांपुरता (१,७५० गुणांपकी) मर्यादित असला तरी एकूण परीक्षेमध्ये कळीचा ठरू शकतो. २०१३ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकच वैकल्पिक विषय अनिवार्य केलेला आहे. नागरी सेवा परीक्षेमध्ये विषयाची खोली जाणून घेण्याचे उद्दिष्ट वैकल्पिक विषय ठेवण्यामागे असते. या परीक्षेची तयारी करताना काही विद्यार्थी बऱ्याचदा वैकल्पिक विषयास सुरुवातीपासून अधिक महत्त्व देऊन त्याची तयारी सुरू करतात. याउलट काहीजण त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करून पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना विषयाची निवड करून तयारीला लागतात. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरेखुरे स्वरूप न समजल्याकारणाने नियोजनामध्ये छोटय़ा चुका राहून जातात. किंबहुना अभ्यासाचे उचित नियोजन केले जात नाही. परिणामी, घेतलेले कष्ट वाया जातात.
वैकल्पिक विषय निवडीमध्ये काही बाबी कटाक्षाने टाळाव्यात. या परीक्षेची नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचेच वैकल्पिक विषय निवडण्यावर भर देऊ नये. तयारी करणारे किंवा एक-दोन परीक्षेचा अनुभव असणारे विद्यार्थी सांगतात, म्हणून अमुक एखादा विषय निवडणे जाणीवपूर्वक टाळावे. विशिष्ट विषय निवडला असता त्यात अधिक गुण मिळू शकतात किंवा मिळत नाहीत, अशा पेरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अमुक एक विषय पदवीला होता या कारणास्तव विषयाची निवड करू नये. तयारी करणारे वरिष्ठ विद्यार्थी असोत वा यशस्वी विद्यार्थी, त्यांच्याकडून आपल्याला स्वारस्य नसलेल्या विषयाचे मार्गदर्शन घेणे शक्यतो टाळावे. कारण वैकल्पिक विषयासाठी डिकोड पद्धतीने मार्गदर्शन करणारा विषयतज्ज्ञ लागतो.
नागरी सेवा परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न दैनंदिन घडामोडींवर आधारलेले असतात. विज्ञान-तंत्रज्ञान आणि वाणिज्य क्षेत्रातील वैकल्पिक विषय निवडणे काही वेळा यशाच्या दृष्टीने धोका पत्करणारी बाब ठरू शकते. कारण अशा विषयामध्ये सातत्याने आणि वेळोवेळी बदल घडून येतात. या विषयांमध्ये नवनवीन संशोधने सुरू असतात. नवेनवे शोध लागतात. या विषयातील दैनंदिन बदलांना आपल्याला सामोरे जाता येत नाही. झालेल्या बदलांची माहिती संपादित करण्याचे स्रोत अवगत नसतात. किंबहुना त्या बदलांवर नजर ठेवण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत सामाजिक शास्त्रांमधील विषय निवडल्यास अधिक लाभ होऊ शकेल.
नागरी सेवा परीक्षेच्या एकूण अभ्यासात वैकल्पिक विषय साध्य नसून साधन आहे हे कदापि विसरू नये. या परीक्षेत यशस्वी होणे हे साध्य मानायला हवे आणि त्यासाठी वैकल्पिक विषयाचा वापर साधन म्हणून करायला हवा. वैकल्पिक विषयाचा आपल्याला आयुष्यभर अभ्यास करायचा नसतो, याचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरते. साधनास साध्य मानले तर अभ्यासाच्या नियोजनात गोंधळ उडू शकतो.
मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बहुविध विषय अंतर्भूत केलेले असतात. या विषयांची तयारी करताना अनेक विषयांची भारतीय संदर्भात का होईना, तोंडओळख असावी लागते. याद्वारे सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची तयारी जशी पुढे जाईल त्या तयारीतूनच कोणता वैकल्पिक विषय निवडायला हवा या निर्णयाप्रत आपण यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीलाच त्याची घाई करण्याची आवश्यकता नाही.
वैकल्पिक विषयाच्या निवडीचे निकष
संबंधित विषयावरील ‘एनसीईआरटी’ची क्रमिक पुस्तके असोत वा प्रमाणित संदर्भ पुस्तके असोत, त्यांचे वाचन करताना संबंधित विषयात आवड निर्माण होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला एखाद्या विषयात गोडी निर्माण होत असेल तर त्या विषयाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. संबंधित विषयातील आवड हा निकष समोर ठेवून त्याआधारे वैकल्पिक विषय निवडावा.
आपल्याला प्रथमदर्शनी आवडलेल्या विषयांचे अभ्यासक्रम, त्यातील घटक, उपघटक न्याहाळून संबंधित विषयाच्या कक्षा रुंदावल्या आहेत अथवा मर्यादित आहेत, या निकषाच्या आधारेही वैकल्पिक विषयाच्या निवडीच्या समीप जाता येते. संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला पेलता येऊ शकतो का, याचाही विचार व्हायला हवा. अभ्यासक्रमासोबत सकृद्दर्शनी आवडलेल्या विषयाचा प्रश्नसंच घेऊन त्या विषयावर मागील पाच-सहा वर्षांत विचारलेले प्रश्न बारकाईने अभ्यासून, प्रश्नांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन वैकल्पिक विषय निवडणे केव्हाही लाभदायकच ठरू शकते.
नागरी सेवा परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यमामध्ये संबंधित वैकल्पिक विषयाची दर्जेदार संदर्भ पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत का? किंवा ती अवगत होतील का? हादेखील निकष लावून वैकल्पिक विषय निवडावा लागतो.
वैकल्पिक विषय निश्चित करताना संबंधित विषयाचे योग्य मार्गदर्शक दीर्घ काळासाठी उपलब्ध आहेत का? ही कसोटी लावून वैकल्पिक विषय निवडणे अधिक सयुक्तिक ठरते. सूर लावताना कुठे चुका होतायेत हे दर्शविण्यासाठी, वेळोवेळी अभ्यासाचे मूल्यमापन ठरविण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध असावे लागतत.
एखाद्या वैकल्पिक विषयाची निवड करताना तो विषय अनिवार्य असलेल्या सामान्य अध्ययन आणि निबंधाच्या किती जवळचा आहे याचाही विचार करावा लागतो. वास्तविक पाहता असा विषय निवडायला हवा, ज्यातील अभ्यासक्रम सामान्य अध्ययनाला पूरक असेल. असा विषय निवडल्यास विद्यार्थ्यांच्या तयारीला लागणारा जास्तीचा वेळ आणि कष्ट वाचवता येतील.
या पाश्र्वभूमीवर सामाजिक शास्त्रांमधील विषयाची निवड अधिक सयुक्तिक ठरते. लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र यांसारखे विषय मुख्य परीक्षेच्या १,७५० गुणांपकी जवळपास १,२०० गुणांपर्यंत अभ्यासक्रमातील घटक-उपघटक कव्हर करताना दिसतात. असे असले तरी या परीक्षेत अनेकांनी इतर विषय घेऊनही यश संपादन केल्याची बरीच उदाहरणे सापडतात. तथापि, उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय यांमध्ये सुवर्णमध्य किंवा समान दुवा साधता आला तर कमी कालावधीत हमखास यशाप्रत पोहोचता येईल.     
    admin@theuniqueacademy.com

lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)