News Flash

करिअर क्षितिज : औषधनिर्माण तंत्रज्ञान

रासायनिक तसेच नैसर्गिक घटकांचे पृथक्करण करून त्यांची रासायनिक रचना जाणून घेतली जाते.

डॉ. सिद्धीविनायक बर्वे

जीवतंत्रज्ञान हे आधुनिक शास्त्र मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे तंत्रज्ञान म्हणून विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन दिवसेंदिवस अधिक सुखकर होत आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांबरोबर निरामय आयुष्यासाठी निरनिराळे औषधी घटक शोधण्यासाठी प्राचीन काळापासून माणसाचे प्रयत्न सुरू आहेत. जीवतंत्रज्ञानाने औषधी संशोधन क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले आहे.

आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी दुर्धर रोगांवर मात करणाऱ्या लसी तसेच जीवघेण्या रोगांवर मात करणारी अनेक गुणकारी औषधे निर्माण केली आहेत. मानवी आरोग्य अधिक समृद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक औषधी घटक शोधून काढले आहेत. त्यापैकी काही रासायनिक आहेत तर काही नैसर्गिक घटकांपासून मिळवले जातात. नैसर्गिक घटकांत अर्थातच मोठय़ा प्रमाणात औषधी वनस्पतींपासून निर्माण झालेले घटक अंतर्भूत असतात. अशा नैसर्गिक घटकांना शोधून काढून त्यांची जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने शास्त्रीय चाचणी घेऊन त्यानंतर असे नवे घटक रोगांवरील रामबाण औषधे म्हणून विकसित करणारे शास्त्र म्हणजे औषधनिर्माण शास्त्र.

जगभरात आजही जवळपास ऐंशी टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्या वैद्यकीय उपचारांसाठी वनौषधींवर अवलंबून आहे. भारतातील अनेक प्राचीन उपचारपद्धतीत नैसर्गिक घटकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येतो. आयुर्वेद, युनानी अशा उपचारपद्धतीत प्रामुख्याने वनौषधींचा वापर करण्यात येतो. या उपचारपद्धतींबरोबर पारंपरिक तऱ्हेने चालत आलेले वैद्यकीय उपचारही रोग निवारणासाठी वापरण्यात येतात.

आपल्या प्राचीन ग्रंथांत तसेच पारंपरिक ज्ञानाद्वारे प्रचलित उपचारांत अनेक वनस्पतींचा उल्लेख आढळून येतो. आपल्या देशातील समृद्ध निसर्ग संपदेमुळे भारतात जैवविविधता आढळून येते. या साऱ्या नैसर्गिक घटकांवर संशोधन करून नवीन औषधांचा विकास औषधनिर्माण किंवा बायोप्रॉस्पिक्टिंगद्वारे करण्यात येतो. औषधी संशोधनात रसायनशास्त्र, वनस्पतीज तसेच प्राणीज जीवतंत्रज्ञान तसेच संगणक व क्लिनिकल शास्त्रांचा अंतर्भाव होतो. जीवतंत्रज्ञानाद्वारे औषधनिर्मिती क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील संशोधनाद्वारे नवीन औषधांची निर्मिती करून त्यांच्या पेटंटव्दारे जागतिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळविण्याची भारताला संधी आहे.

जीवघेण्या रोगांवर अत्यंत गुणकारी ठरणारी प्रतिजैविके, लसी तसेच अनेक औषधी घटकांबरोबर जीवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने रासायनिक तसेच नैसर्गिक घटकांच्या संयोगातून प्रयोगशाळेत विकसित झालेले अनेक औषधी घटक औषधी संशोधन तंत्राव्दारे विकसित करण्यात आले आहेत. रासायनिक तसेच नैसर्गिक घटकांचे पृथक्करण करून त्यांची रासायनिक रचना जाणून घेतली जाते. हे औषधी घटक संगणकाव्दारे विशिष्ट सॉफ्टवेअरच्या आधारे नेमक्या कुठल्या रोगांवर गुणकारी आहेत याची चाचपणी केली जाते. या तंत्राद्वारे विशिष्ट रोगांवर कोणते रासायनिक तसेच नैसर्गिक घटक गुणकारी ठरू शकतील याची चाचपणी केली जाते. संगणकीय आज्ञावलींद्वारे रोगकारक घटकांवर कोणते रासायनिक वा नैसर्गिक घटक गुणकारी ठरतील यावरील संशोधनातून अनेक प्रकारची संभाव्य औषधे निर्माण केली जातात. संगणकीय संशोधनातून तयार झालेल्या या औषधांची निर्मिती प्रयोगशाळेत करण्यात येते.

रासायनिकदृष्टय़ा प्रयोगशाळेत सिंथेटिक रसायनशास्त्राद्वारे सामान्य रोगांपासून ते कॅन्सर-एड्ससारख्या भयंकर रोगांवर मात करणारी औषधे निर्माण केली जातात. औषधनिर्मितीची ही संशोधन प्रणाली आहे, ड्रग डिस्कव्हरी किंवा औषधी संशोधन तंत्रज्ञान. हे तंत्र आंतरशाखीय असल्यामुळे या तंत्रज्ञानात रसायनशास्त्र आणि संगणकशास्त्राचाही समावेश होतो. जगभरात औषधी संशोधनाचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार होत असल्याने या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. भारतात संगणकशास्त्राची लक्षणीय प्रगती असल्या कारणाने ड्रग डिस्कव्हरीला येथे पोषक वातावरण आहे.

नसगिक घटकांपासून बायोप्रॉस्पेक्टिंगद्वारे किंवा रासायनिक घटकांपासून ड्रग डिस्कव्हरी तंत्राद्वारे विकसित झालेल्या औषधी घटकांचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी हे औषधी घटक  मानवी वापरासाठी सुरक्षित आहेत किंवा नाहीत याची चाचणी घेतली जाते. औषधी संशोधनातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या औषधी घटकांची तपासणी क्लिनिकल ट्रायल्स म्हणजेच वैद्यकीय चाचण्यांद्वारे करण्यात येते. हे घटक मानवी शरीरासाठी घातक आहेत का, याची तपासणी वैद्यकीय चाचण्यांद्वारे तीन टप्प्यांत केली जाते. सर्वप्रथम मानवी शरीरातील पेशी प्रयोगशाळेत वाढवून त्यावर करण्यात येते. त्यामध्ये औषधी घटक सुरक्षित आढळल्यास दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांवर चाचणी केली जाते. तिथेही सुरक्षित आढळल्यास तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष माणसांवर त्याची चाचणी केली जाते. तीनपैकी कोणत्याही टप्प्यांवर औषधी घटक सुरक्षित नसल्याचे आढळल्यास ते बाद केले जातात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान २-१०वर्षांचा कालावधी लागतो. ही क्लिनिकल रिसर्चचीच प्रक्रिया आहे.

औषधी संशोधनात ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगभरात क्लिनिकल रिसर्चचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. भारतातही या क्षेत्राच्या वाढीसाठी प्रचंड वाव आहे. जीवतंत्रज्ञान उपयोजित शास्त्र आहे. त्यातील औषधी संशोधनातून नवनवीन औषधांची निर्मिती केली जाते. भारतात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींवर संशोधन करून तसेच संगणकाच्या साहाय्याने ड्रग डिस्कव्हरी तंत्राद्वारे औषधी घटकांची निर्मिती करण्यासाठी आपल्या देशात प्रचंड वाव आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात औषधी संशोधनातून निर्माण केल्या जाणाऱ्या औषधांच्या चाचण्यांसाठी क्लिनिकल रिसर्चची आपल्या देशात वाढ होऊ शकते.

लखनऊ येथील सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे प्रमाणित अनेक संस्थांत प्रगत औषधी संशोधन करण्यात येत आहे. देशातील अनेक विद्यापीठे तसेच महाविद्यालयांतून औषधी संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम राबविले जातात.

(लेखक, केळकर शिक्षण संस्थेच्या सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलुंड येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:49 am

Web Title: pharmaceutical technology zws 70
Next Stories
1 नोकरीची संधी
2 यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारताचा इतिहास
3 नोकरीची संधी
Just Now!
X