कोलकाता येथील साहा इन्स्टिटय़ूट ऑफ न्युक्लीअर फिजिक्सया संस्थेत उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएच.डी अभ्यासक्रमाच्या २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता :
अर्जदारांनी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, लाईफ सायन्सेस यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. जे विद्यार्थी वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या नोंदणी परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. याशिवाय त्यांनी जेईएसटी, सीएमआयआर, यूजीसी, डीबीटी, डीएसटी-इन्स्पायर यासारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड पद्धती :
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी, निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

शिष्यवृत्तीविषयक तपशील: निवड झालेल्या संशोधक उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीत दरमहा १६०० रु.ची फेलोशिप आणि वार्षिक आकस्मित खर्चापोटी २०,००० रु. मिळतील.

अधिक माहिती :
योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी साहा इन्स्टिटय़ूट न्युक्लीअर फिजिक्स, कोलकाताच्या http://www.saha.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१४. पर्यंत पाठवावेत.